सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय भ्रष्टाचार होईल का ? : अतुल भातखळकर

    03-Sep-2020
Total Views |

atul bhatkhalkar_1 &




नवी मुंबई :
सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपी निष्पन्न झाले असून कर्नाटकमधून तीन जणांना नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी दिली आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपने राज्यसरकारवर टीका केली आहे. धान्य वाटपाची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची होती. पण धान्य वाटप करण्याऐवजी हडप केले. सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हा भ्रष्टाचार होईल काय? असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.




दरम्यान, कर्नाटक, हरियाणा,चंदीगड आणि महाराष्ट्र या राज्यातून हा रेशनिंगचा तांदूळ आणण्यात आला होता. आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने २७० मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे. तसेच गेल्या आठ महिन्यात ३२,८२७ मेट्रीक टन तांदूळ या दक्षिण आफ्रीकन देशात निर्यात केला आहे. याची किंमत ८० कोटी च्या घरात आहे. यावरूनच अतुल भातखळकरांनी राज्यातील महाविकासआघडी सरकारवर टीकास्त्र सोडले. ट्विट करत ते म्हणतात, धान्य वाटपाची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची होती. पण धान्य वाटप करण्याऐवजी हडप केले. सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हा भ्रष्टाचार होईल काय ? असा सवाल त्यांनी केला. तसेच हे तर भामट्यांचे सरकार असे म्हणत त्यांनी सरकारचा समाचार घेतला.




केंद्र सरकार गरीबांसाठी पाठवत असलेला तांदूळ ही टोळी रेशनिंग दुकानातून मिळवत असे. कोरोना काळात बायोमेट्रीक पद्धत बंद केली, तसेच कोरोनाकाळात जास्त तांदूळ देखील वाटण्यासाठी पाठवण्यात आला होता. हा सर्व तांदूळ काळाबाजार करून महाराष्ट्रातील गोडाऊनमध्ये आणला जात होता आणि नंतर दुसऱ्या गोणीमध्ये भरून तो आफ्रीकन देशात निर्यात केला जात होता.नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पनवेल पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टीकमधून तांदूळ जप्त केला. त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फूड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूरमधून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनी मधून तब्बल ९१,१२,०४६ रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे.आत्तापर्यंत आरोपींनी अफ्रिकन देशात गेल्या ८ महिन्यात ३१ हजार ८२७ मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.