‘एव्हरग्रीन’ रेखा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020
Total Views |
Rekha_1  H x W:





बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या ‘भानुरेखा’ अर्थात अभिनेत्री रेखा यांच्या कलाप्रवासावर लेखाद्वारे टाकलेला दृष्टिक्षेप...


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय असणाऱ्या रेखा यांना १९६०मध्ये आलेल्या ‘सावन भादों’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत पक्के स्थान मिळवून दिले. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये रेखा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. वयाच्या ६५व्या वर्षी ही सौंदर्यवान अभिनेत्री आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. परंतु, चित्रपटसृष्टीत सफल ठरलेल्या रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अतिशय कष्टप्रद होते.


१० ऑक्टोबर, १९५४ रोजी चेन्नईमध्ये भानुरेखा गणेशन यांचा जन्म झाला. रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन हे तामिळ अभिनेते, तर आई पुष्पवल्ली तेलुगू अभिनेत्री. घरची पार्श्वभूमी अभिनयाची असली तरी रेखा यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. चेन्नईमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सहा बहिणी, एक भाऊ असे मोठे कुटुंब असणाऱ्या रेखा यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी रेखा यांना शिक्षण सोडून अर्थार्जनासाठी अभिनय क्षेत्राकडे वळायला लागले. वडील जेमिनी गणेशन यांनी रेखा आणि त्यांची आई पुष्पावल्ली यांना स्वीकारण्यास नकार दिला होता. या सगळ्यामुळे रेखा यांच्या बालमनावर प्रचंड आघात झाला होता. “मी माझ्या वडिलांना पाहिले आहे, मात्र त्यांनी मला कधीच पाहिले नसावे,” असे त्या नेहमी म्हणतात.


वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी ‘रंगुला रत्नम’ या तेलुगू चित्रपटात बालकलाकाराची भूमिका सकारात त्यांनी आपला अभिनयाचा प्रवास सुरु केला. सुरुवातीला हिंदी भाषा अवगत नसल्याने रेखा यांना संवाद साधताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यावेळेस घरापासून लांब असणाऱ्या रेखा यांना आईची खूप आठवण येत असे. इतके कष्ट करूनही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. याच काळात त्यांना प्रचंड मानसिक संघर्षदेखील करावा लागला होता. ‘अभिनेत्री’ होण्यासाठी लागणारे रंगरूप त्यांच्याकडे नव्हते. रंगाने सावळ्या असणाऱ्या रेखा यांना यामुळे अनेकदा हिणवले गेले होते.


आपण शिकावे, मोठे व्हावे, लग्न करून आपल्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगावे, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रेखा यांचे नशीब बालपणी पालटले. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या रेखा यांनी १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सीआयडी ९९९’ या कन्नड चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून नव्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांच्या नायकाची भूमिका राजकुमार यांनी साकारली होती. याच वर्षी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अंजना सफर’ प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटातील काही विवादित दृश्यांमुळे याचे प्रदर्शन रोखले गेले आणि कालांतराने ‘दो शिकारी’ या नावाने या चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावन भादों’ या चित्रपटाने रेखा यांचे जीवन बदलले. या चित्रपटाने रेखा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली. या चित्रपटाने त्यांचे आयुष्य बदलण्यास सुरुवात झाली. याआधी पॉपकॉर्न आणि दूध पिऊन दिवस काढणाऱ्या रेखा यांनी स्वतःकडे अभिनेत्रीच्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली. दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे मेकअप आणि इतर गोष्टींवर काम करण्यास सुरुवात केली. ‘घर’ चित्रपटातील रेखा यांच्या नव्या लूकने अवघी रसिकसृष्टी मोहित झाली.


चित्रपटांप्रमाणेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील नेहमीच चर्चेत राहिले. सुखी कुटुंबाची स्वप्ने पाहणाऱ्या रेखा यांनी १९९० साली व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या आठवड्याभरातच त्यांना पती मुकेश हे नैराश्यग्रस्त असून, त्यांची औषधे सुरु असल्याची बाब समोर आली. सगळी परिस्थिती सावरत असताना त्यांच्या संसारात खटके उडू लागले. लग्नाच्या सहा महिन्यांत त्यांना घटस्फोटाची नोटीस पाठविण्यात आली. एके दिवशी त्या बाहेर असताना मुकेश यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकारानंतर रेखा यांना खूप दुषणे दिली गेली. मात्र, या सगळ्यावर मात करत त्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडल्या आणि पुन्हा एकदा नव्याने काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांचे नाव अनेक मोठ्या कलाकारांशी जोडले गेले. मात्र, अफवा म्हणत त्यांनी या सगळ्या वार्तांना पिटाळून लावले.


४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास १८०हून अधिक चित्रपटांत काम केले. ‘उमराव जान’, ‘खुबसूरत’, ‘सिलसिला’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खून भरी मांग’, ‘खिलाडियों का खिलाडी’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. ‘उमराव जान’ चित्रपटातील बहारदार अभिनयासाठी त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्कारा’सह, राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले. ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘खून भरी मांग’ या चित्रपटांसाठीदेखील त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्कार’ देण्यात आला होता. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी कुठल्याही भूमिकेस नकार दिला नाही. मुख्य नायिकेसह, दुय्यम व्यक्तिरेखा आणि खलनायिकादेखील त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल २०१० मध्ये ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले.




@@AUTHORINFO_V1@@