उद्योगक्षेत्रातला ‘जॉयकस’चा ‘विजय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020   
Total Views |
Joykas_1  H x W






एटीएमच्या रांगेत तो उभा होता. बाजूलाच नवीन केकशॉप सुरु झाल्याचे त्याने पाहिले. आपण पेस्ट्रीज खायला केक शॉपमध्ये जातो, तसाच तोसुद्धा गेला. त्याला पेस्ट्रीची चव आवडली. पुन्हा तो त्या केकशॉपमध्ये गेला. यावेळेस त्याने पेस्ट्रीच्या चवीचं त्या मालकासमोर कौतुक केलं. तो मालक स्वत:च केक तयार करणारा बेकर आहे, हे कळल्यावर या तरुणाने त्याला चक्क बिझनेसची ऑफर दिली. यातूनच सुरु झाला ‘जॉयकस’ केकचा प्रवास. साध्या पेस्ट्रीजपासून ते सेलिब्रिटी केकपर्यंत प्रवास करणार्‍या ‘जॉयकस’ केकचा प्रवासी अर्थात संचालक म्हणजे विजय कसबे हा तरुण उद्योजक होय.


अलीकडच्या काळात मराठी तरुणांमध्ये उद्योजक होण्याची इच्छा प्रबळ झालेली आहे. या इच्छेतून अनेक तरुण उद्योजक घडत आहेत. खरंतर विजयचे आजोबा विठ्ठल राजाराम कसबे हे एक उद्योजकच होते. ९०च्या दशकात त्यांचा फिनाईल तयार करण्याचा छोटासा घरगुती उद्योग होता. काही कारणास्तव हा उद्योग पुढे गेलाच नाही. मात्र, उद्योगाचं बाळकडू नकळत विजयला मिळालं होतं. विजयचे बाबा चांगदेव कसबे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत, तर आई जया या गृहिणी आहेत. विजयचं बालपण विक्रोळीच्या टागोर नगरमध्ये गेलं. विक्रोळीच्या प्रसिद्ध विद्यामंदिरमध्ये दहावीपर्यंत तो शिकला. विकास कॉलेजमधूनच तो विज्ञान शाखेतून बारावी झाला. पुढे त्याने इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. दुसर्‍या वर्षात शिकत असताना त्याने कॉलेज मध्येच सोडलं. इंजिनिअरिंगमधलं त्याचं स्वारस्यच जणू संपलं होतं. त्यानंतर पदवी पाहिजे म्हणून त्याने रात्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तिथे तो बी.कॉम झाला.


आपल्या शिक्षणाचा आर्थिक भार कुटुंबीयांवर नको, म्हणून विजय एका ‘बीपीओ’मध्ये काम करु लागला. हे काम करता करता त्याने अंधेरीच्या एका संस्थेतून ‘फॅशन रिटेल मॅनेजमेंट’चा डिप्लोमा प्राप्त केला. तिथे त्याला प्लेसमेंट मिळाली. एका नामांकित मॉलमध्ये शॉप असिस्टंट म्हणून विजय नोकरीस लागला. त्यानंतर एका कॉर्पोरेट कंपनीत तो नाईट शिफ्ट करु लागला. ‘फॅशन रिटेल मॅनेजमेंट’चा डिप्लोमा मिळवल्यावर स्वत:चं काहीतरी सुरु करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मॉलमध्ये त्याला ‘शॉप मॅनेजमेंट’चा अनुभव मिळाला. त्यातूनच त्याच्या डोक्यात स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित करण्याची ‘आयडिया’ आली. त्यातून आकारास आले ‘जॉयकस क्लोदिंग.’(क्लोथिंग) या ‘जॉयकस क्लोदिंग’चं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक अशी त्यांच्या उत्पादनाची रचना असते. शेतकरी आणि सैनिक या आपल्या देशाच्या खर्‍या नायकांना ‘जॉयकस’च्या भावना समर्पित केलेल्या आहेत. सध्या मुंबई, पुणे, नाशिक येथे ‘जॉयकस’ची उत्पादने सहज मिळतात. ‘मिस गोवा इंटरनॅशनल’ ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच गोव्यामध्ये भरली होती. ‘क्लोदिंग पार्टनर’ म्हणून ‘जॉयकस’ला या सौंदर्यस्पर्धेच्या आयोजकांनी विचारणा केली होती. विजयने त्यास होकार दिला. संपूर्ण गोव्यात सगळीकडे या सौंदर्यस्पर्धेच्या होर्डिंग्जवर ‘जॉयकस’चा लोगो दिमाखात झळकत होता. “या आधी मी कधीच गोव्याला गेलो नव्हतो, पण या सौंदर्यस्पर्धेच्या निमित्ताने मी गोव्यात पहिल्यांदा आलो. विशेष म्हणजे, माझ्या येण्या अगोदर ‘जॉयकस’चा लोगो होर्डिंग्जच्या माध्यमातून गोव्यामध्ये वावरत होता. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता,” असे विजय म्हणतो.


एकदा विजय एटीएमच्या रांगेत उभा होता. बाजूलाच नवीन केकशॉप सुरु झालेले. बघुया तरी काय आहे, म्हणून विजय आत गेला. पेस्ट्री खाल्ली. त्याला चविष्ट लागली. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा गेला. पेस्ट्री खाल्ल्यानंतर त्याने त्या मालकास पेस्ट्री चविष्ट असल्याचे आवर्जून सांगितले. नेमका तो मालकच बेकर निघाला. विजयच्या मनात काय आले माहीत नाही. पाच मिनिटांत परत येतो म्हणून तो गेला. थोड्या वेळात पुन्हा आला. त्याने त्या केकशॉपच्या मालकास थेट व्यवसाय करण्याची ऑफर दिली. त्यातूनच जन्मास आले ‘जॉयकस केक्स.’ एक नवीन उद्योग सुरु झाला. कांजूरमार्गमध्ये नवीन केकशॉप सुरु केले. दुर्दैवाने काही तांत्रिक कारणास्तव काही महिन्यांतच ते बंद करावे लागले. यानंतर विजयने वेबसाईट बनविण्याचा निर्णय घेतला. ज्यावरुन ऑनलाईन केक्स विकले जाऊ शकतात. त्याने सॉफ्टवेअर बनविणार्‍या आपल्या मित्राकडून, प्रथमेशकडून ही ई-कॉमर्स वेबसाईट बनवून घेतली.


या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे जी व्यक्ती केक तयार करते, तिला ही वेबसाईट आपल्या केकसाठी मंच उपलब्ध करुन देते. या मंचावरुन कोणीही आपल्या केकची जाहिरात करुन आपला केक विकू शकतात. सोबत जर कोणाला केक बनवायचा शिकायचं असेल, तर त्यापद्धतीचे प्रशिक्षण वर्गदेखील येथे होतात. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ‘कस्टमाईझ्ड केक’ येथे तयार होतात. त्याचप्रमाणे जर कोणाला काही शंका असतील, तर त्याचं निरसन करण्यासाठी ग्राहक सुविधा संपर्क क्रमांकदेखील दिलेला आहे. ‘जॉयकस’ यासोबत एक अनोखी सेवासुद्धा देते. आपण आपल्या प्रियजनांना सेलिब्रिटीच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम कलाकार अभिजित खांडकेकर, धनश्री कडगावकर, भाग्यश्री मोटे, शर्मिला राजाराम शिंदे आणि अन्य कलाकार स्वत: या शुभेच्छा ‘जॉयकस’च्या माध्यमातून देतात. केकचं अनोखं विश्व एकाच छताखाली देणारी https://joykascakes.com/ ही पहिलीच वेबसाईट असावी.


“या संपूर्ण ‘जॉयकस’च्या प्रवासात माझं कुटुंब, मित्रपरिवार आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा मी ऋणी आहे, ज्यांनी माझ्यावर अतूट विश्वास दाखविला. माझा मावसभाऊ विशाल म्हस्के याच्याशिवाय ‘जॉयकस’चा विचार पूर्णच होऊ शकत नाही. त्याने ‘जॉयकस’च्या प्रत्येक चढ-उतारामध्ये माझी नि:स्वार्थपणे साथ दिली. त्याचा खंबीर पाठिंबा मला नेहमीच प्रेरणा देत राहिला,” असे सांगताना ‘जॉयकस’ उद्योगसमूहाचे संचालक विजय कसबे भावूक होतात.


‘जॉयकस क्लोदिंग’ नंतर ‘जॉयकस केक्स’ अशा प्रकारे ‘जॉयकस’ उद्योगसमूह एकेक पाऊल उद्योगक्षेत्रात भक्कमपणे रोवत आहे. उद्योगजगतातला ‘जॉयकस’चा ‘विजय’ वाखाणण्यासारखा आहे.



@@AUTHORINFO_V1@@