ओबीसी नेते छत्रपती संभाजीराजेंच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

sabhajiraje_1  


मुंबई :
 ओबीसी नेत्यांनी आज मुंबईत छत्रपती संभाजीराजें भेट घेतली. “ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल,” असा शब्द ओबीसी समाजातील नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिला. मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढू नये यासाठी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.

 


“छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतले. शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. माझी पहिल्या दिवशी पासून हीच भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आज ओबीसी समाजाचे नेते माझ्याकडे भेटायला आले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द दिला. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली त्याचा मला आनंद आहे,” असे संभाजीराजे म्हणाले.


“ओबीसी आणि मराठा समाजातील लोकांनी एकत्र येत यावर मार्ग कसा काढता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावा. तसेच सकल मराठा समाजाच्या लोकांसोबत मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार आहे. त्यावेळी ओबीसी समाजातील लोकांना सोबत घेऊन मार्ग काढण्याबाबत मार्ग सुचवणार आहे,” असेही संभाजीराजेंनी सांगितले. “मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु”, असा इशारा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी दिला. जर लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू, अशी भूमिका ओबीसी संघर्ष सेनेने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली होती.
@@AUTHORINFO_V1@@