नक्षली-मिशनर्‍यांनी लावलेली आग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |


Naxali_1  H x W



शिक्षक भरतीवरून गेल्या पाच दिवसांपासून धुमसणार्‍या राजस्थानला पेटवण्यात नक्षली-मिशनरी शक्तींचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे, संविधानाला धाब्यावर बसवणार्‍या झारखंडमधील पत्थलगढी चळवळीपर्यंत राजस्थानमधील जाळपोळीचे धागेदोरे असल्याचेही समोर आले.



तृतीय श्रेणी शिक्षक भरती परीक्षा-२०१८ अंतर्गत अनुसूचित जमाती क्षेत्रातील खुल्या वर्गातील एक हजार १६७ पदांवर एससी/ओबीसी/जनरलऐवजी एसटी उमेदवारांच्या भरतीच्या मागणीवरून राजस्थान धुमसत असल्याचे दिसते. गुरुवारी राजस्थानच्या उदयपूर, डुंगरपूर तसेच बांसवाडा, प्रतापगढ आदी अनुसूचित जमाती-आदिवासी बहुल प्रदेशातून हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आणि गेले पाच दिवस इथे जाळपोळ, दगडफेकीमुळे अराजक माजले. वस्तुतः मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राज्याच्या गृहमंत्रालयाने इथली कायदा-व्यवस्था राखणे आवश्यक होते. पण, त्यांच्या सरकारनेही आंदोलकांपुढे हात टेकले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे ‘रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’च्या (आरएएफ) तुकड्यांची मागणी केली. दरम्यान, राजस्थानात कायद्याच्या राज्याचे धिंडवडे निघत असताना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मात्र त्याची फारशी दखल घेतली नाही. उलट विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या शेतकरी विधेयकांसंदर्भातील निदर्शने दाखवण्याला किंवा छापण्यालाच त्यांनी प्राधान्य दिले. दुसर्‍या बाजूला राजस्थानमध्ये इतका भीषण प्रकार होत असताना पोलिसांनी दिलेली माहिती किंवा खुलासा मात्र धक्कादायक आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार झारखंडमधून आलेल्या विशिष्ट विचारधारेच्या गटांनी राज्याच्या दक्षिण भागातील आदिवासी भागात हिंसा भडकावली. आता हे विशिष्ट विचारधारेचे गट म्हणजे कोण? तर गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार उदयपूर, डुंगरपूर, बांसवाडा आणि प्रतापगढ येथील आदिवासी युवकांना नक्षली विचारांशी जोडण्याचे सुनियोजित काम करण्यात येत आहे. झारखंडच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्यातील आदिवासी क्षेत्रात कार्यरत संस्था-संघटना व लोक राजस्थानातही हातपाय पसरण्याच्या प्रयत्नात असून आताच्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते. मेवाडला आपल्या नक्षली विचारांचा अड्डा तयार करण्याचे या सर्वांचे षड्यंत्र असून यात झारखंडमधील पत्थलगढी चळवळीशी संबंधित लोकदेखील आहेत. पत्थलगढीनामक व्यवस्थाविरोधी चळवळीमुळे झारखंडमधील ख्रिस्ती-आदिवासी परस्परसंबंध उजेडात आले होते. पत्थलगढी चळवळ चालवणारे लोक देशाचे संविधान व कायदा मानत नाहीत, तर ते स्वतःला यापेक्षा वेगळे किंवा स्वतंत्र मानतात. तेच लोक राजस्थानातही सक्रिय झाल्याचे म्हणता येते.


 
दरम्यान, राजस्थान असो किंवा अन्य कोणतेही ठिकाण, तिथे एकाएकी हिंसाचार पसरवता येत नाही, तर त्याची तयारी कित्येक वर्षे, महिने आधीपासून केली जाते. गेल्या काही वर्षांत देशातील नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राजस्थान वगळता अन्य राज्यांची नावे सातत्याने आली. पण, याचा अर्थ राजस्थानसारख्या फारसा जंगलप्रदेश नसलेल्या राज्यात नक्षलवादी कार्यरत नव्हते का? तर तसे नव्हे, ते बर्‍याच वर्षांपासून राजस्थानमध्ये आपल्या कारवाया करत आहेत. उदाहरणार्थ, २००७ साली तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी राजस्थानमधील नक्षलवादी कसे काम करतात, यासंबंधी माहिती दिली होती. त्यानुसार, नक्षलवाद्यांनी जंगलप्रदेशातील व्यक्तींशी आधी संपर्क साधला, तिथे आपले हस्तक पेरले, हळूहळू आपल्या विचारांचा प्रसार सुरू केला आणि जे लोक आपल्याशी जोडले गेले, त्यांच्या बैठका आयोजित केल्या. बैठकांनंतर पुढची पायरी आम्ही जनतेच्या भल्यासाठी आंदोलन करत आहोत, हे दाखवून देण्याची असते आणि तेच इथेही झाले. तसेच आंदोलन व चळवळीच्या माध्यमातून कायदा-व्यवस्थेसमोर अडीअडचणी, समस्या निर्माण करण्याचे कामही नक्षलवाद्यांनी नेहमीप्रमाणेच केले. आदिवासी व जंगल प्रदेश त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतो व तसे इथेही झाले. सोबतच नक्षल्यांच्या कारवायांना पूरक ठरतील अशा फ्रंटल ऑर्गनायझेशन्स’ची स्थापना शहरी भागात करण्यात आली, जेणेकरून पांढरपेशा, बुद्धिजीवी वगैरे वर्गातून त्यांचा बचाव करता येईल. दरम्यान, राजस्थानात आता सुरू असलेल्या आंदोलनाशी झारखंडचा वा पत्थलगढीचा संबंध जोडला जात असला तरी त्याचा इतिहासदेखील १२-१३ वर्षे जुना आहे. म्हणजे तेव्हापासून इथे झारखंडमधील नक्षलवादी येत-जात होते. राजस्थानच्या आदिवासीबहुल भागातील कितीतरी लोकांना विश्वासात घेऊन झारखंडमधील चिंतन शिबिरात नेले गेले. चिंतन शिबीर म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून ‘ब्रेन वॉश’ करण्याची जागा. इथे नक्षल चळवळीतील म्होरके किंवा वरिष्ठ नक्षली नव्यांना आपल्या विचारांची, कार्यपद्धतीची, आगामी कारवायांची व त्या कशाप्रकारे राबवायच्या याबाबतची माहिती-प्रशिक्षण देतात. असे राजस्थानमधून झारखंडला नेलेल्या लोकांबाबतही झाले आणि २००८-०९ दरम्यान या घटना घडल्याचे सांगितले जाते. म्हणूनच, आताचा शिक्षक भरतीवरून उसळलेला हिंसाचार एकाएकी झालेला नसून त्याची मुळे इतकी वर्षे मागे जातात किंवा इतकी वर्षे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी शिक्षक भरतीचे निमित्त करून आपला रक्तरंजित खेळ सुरू केल्याचे दिसते.


 
भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनीदेखील पोलिसांच्या व गुप्तचर संस्थांच्या अहवालाला पूरक विधान करत आताच्या हिंसाचारात झारखंडसह अन्य राज्यांतील आदिवासी क्षेत्रात काम करणारे व चिथावणी देणारे लोक, धर्मांतरित ख्रिश्चन आणि मिशनरी सामील असल्याचे म्हटले. डाव्या विचारांतून उत्पन्न झालेल्या नक्षलवाद्यांनी आणि मिशनर्‍यांनी एकमेकांशी हातमिळवणी करून आदिवासी बांधवांना, तुमचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सांगून त्यांना सरकारविरोधात भडकावल्याचे अनेकदा समोर आले. आताच्या घटनेवरून मात्र, देशातील विविध राज्यात पसरलेल्या आदिवासी भागांना आपल्या विषारी विचारांनी नासवणार्‍या नक्षली व मिशनर्‍यांनी राजस्थानातही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार माजवल्याचे दिसते; अर्थात नक्षल्यांची ही कार्यपद्धतीच झाली आहे, जिथे जिथे जे काही सुरळीत सुरू असेल, त्याला सुरुंग लावायचा आणि एखाद्या घटकावर तो वंचित, शोषित, अत्याचारग्रस्त असल्याचे ठसवून देशाच्या, कायद्याच्या, संविधानाच्या विरोधात उभे करायचे. त्याला मागील ७० वर्षांत देशभरातील काँग्रेस सरकारांनीही फारसा पायबंद घातल्याचे दिसत नाही. उलट नक्षली वा विघातक मिशनर्‍यांविरोधात कारवाई केली तर बोंबाबोंब करण्याचा मार्गच त्या पक्षाने व त्याच्या नेते-कार्यकर्त्यांनी किंवा पाळीव विचारवंत-बुद्धिजीवींनी पत्करल्याचे दिसते. आता राजस्थानात पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर आले, तर ही मंडळी आणखी मोकाट झाल्याचे चालू हिंसाचारावरून निदर्शनास येते. पण, शेतकर्‍यांच्या नावाखाली विरोधी पक्षांनी चालवलेल्या आंदोलनाला राहुल गांधी जसे समर्थन देतात व भाजप सरकारला अपयशी ठरवतात, त्यांना आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या राजस्थानातील गहलोत सरकारचे अपयश मात्र दिसत नाही. त्यामुळे शेतकरी विधेयकांवरून निराधार विरोध करण्यापेक्षा राहुल गांधींनी जरा आपल्या पक्षाची सरकारे काय आणि कसा कारभार करतात, त्याकडेही लक्ष द्यावे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@