स्त्रियांमधील हृदयविकाराचे वेगळेपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |


Heart Attack_1  


आज जागतिक हृदय दिनानिमित्त आपण स्त्रियांमधील हृदयविकाराचे वेगळेपण आणि या आजाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे का आहे, हे जाणून घेऊया.


‘हृदयविकार’ हा शब्द कोरोनरी आर्टरींचा आजार, हृदयातील दोष, जन्मापासून असलेले हृदयदोष, हृदयविकाराचा झटका अशा हृदयाच्या विविध प्रकारच्या स्थितींसंदर्भात वापरला जातो. हृदयविकार हा पुरुषांचा आजार असल्याचा एक सार्वत्रिक समज आहे. पण, प्रत्यक्षात स्त्रियांमध्येही हृदयविकार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. गेल्या काही वर्षांमध्येबद्दल जागरुकता वाढविण्याचे आणि चर्चा घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले जाऊनही अद्याप केवळ अर्ध्या महिलांनी (४६ टक्के) पहिल्या क्रमांकाचा जीवघेणा आजार म्हणून हृदयविकाराची दखल घेतल्याचे, त्याचे गांभीर्य ओळखल्याचे दिसते.


हृदयविकाराची स्त्रियांना जाणवणारी लक्षणे ही बरेचदा पुरुषांपेक्षा वेगळी असतात आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्युमुखी पडण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक असते. इथे हेही नमूद करायला हवे की, अ‍ॅण्टिकॉग्युलन्ट्सचा (रक्तामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून दिली जाणारी औषधे) किंवा अगदी हृदयाशी संबंधित काही विशिष्ट वैद्यकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर, त्यांचाही स्त्रियांवर होणारा परिणामही पुरुषांपेक्षा वेगळा असतो. स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रोजेन त्यांचे हृदयविकारापासून संरक्षण करते असे सरसकट मानले जाते. मात्र, त्यातही आता तथ्य उरलेले नाही.
स्त्रिया व पुरुषांमधील हृदयविकारामध्ये फरक केल्यामुळे लक्षणांकडे लक्ष जाण्यास मदत होईल व लवकरात लवकर निदान होऊऩ आजाराचा प्रतिबंध करणे शक्य होईल. हा फरक स्पष्टपणे लक्षात आणून देणारे काही मुद्दे पुढीलप्रमाणे:


एस्ट्रोजेन : रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रियांच्या शरीरात असणार्‍या एस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे शरीरातील एचडीएल (चांगले) कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याने व एलडीएल (वाईट) कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. रजोनिवृत्तीनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल साठण्याचे प्रमाण जास्त असते. ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढल्यानेही स्त्रियांमधील कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा (CVD) धोका वाढतो. एचडीएलची खालावलेली पातळी आणि ट्रायग्लिसराइट्सची वाढलेली पातळी यांमुळे 65 वर्षांच्या पुढील वयातील स्त्रियांना हृदयविकारामुळे मृत्यू येण्याचा धोका अधिक असतो.


मधुमेह : मधुमेही स्त्रियांना बरेचदा स्थूलत्व, कॉलेस्ट्रोलची वाढलेली पातळी आणि उच्च रक्तदाब या समस्याही असतात व त्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिकच वाढतो. हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या स्त्रियांना मधुमेहाचा त्रासही असल्याचे आढळून आले आहे, आणि असे असल्याने त्यांना दुसर्‍यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने वाढतो, तसेच हृदय निकामी होण्याचा धोकाही असतो.
लक्षणांमधील भेद : हृदयविकाराची समस्या असलेल्या स्त्रियांमध्ये हा आजार हृदयाच्या आकाराने लहान रक्तवाहिन्यांमध्ये आढळून येतो. याला ‘मायक्रोव्हॅस्क्युलर’ आजार असेही म्हटले जाते - जो ओळखून त्यावर तत्परतेने उपचार करणे गरजेचे असते. पुरुषांमध्ये छातीवर असह्य भार येऊन वेदना होण्यासारखे लक्षण हृदयविकाराशी ठळकपणे जोडले गेलेले दिसून येते. स्त्रियांना मात्र पुढील लक्षणे जाणविण्याची शक्यता अधिक असते. हृदयविकार असलेल्या स्त्रियांमध्ये मात्र छातीमध्ये थोड्या प्रमाणात जाणवणार्‍या अस्वस्थतेच्या रूपात ही लक्षणे दिसून येतात.


- धाप लागणे
- थकवा
- अपचन किंवा मळमळणे
- पाठ, खांदे किंवा मानदुखी


चाचण्या : ‘मायक्रोव्हॅस्क्युलर’ आजारांचे निदान करण्यासाठी अ‍ॅन्जिओग्राम्स तितकेसे परिणामकारक ठरत नाहीत. स्त्रियांमध्ये ‘स्ट्रेस टेस्ट’ चुकून ‘पॉझिटिव्ह’ येण्याचा प्रकारही अधिकवेळा घडताना दिसतो. स्त्रियांमध्ये ‘स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी’ शक्यताही अधिक असते व त्यांच्या कोरोनरी आणि रेडिअल आर्टरीजचा आकार तुलनेने लहान असतो. त्यामुळे हृदयावर रेडिअल आर्टरीजमार्गे उपचार प्रक्रिया पार पाडल्यानंतर केलेल्या रेडिअल आर्टरींना आकडी येण्याची शक्यता स्त्रियांच्या बाबतीत अधिक असते. प्रीझर्व्हड लेफ्ट व्हेन्ट्रिकल इजेक्शन फ्रॅक्शनमुळे (या स्थितीमध्ये हृदयाचा डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यामध्ये रक्त पूर्णपणे भरले जात नाही. परिणामी हृदयाकडून शरीराकडे प्रवाहित होणार्‍या रक्ताचे प्रमाण कमी असते) हृदय निकामी होण्याचा प्रकार स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.
४०-५० वयोगटातील स्त्रियांना अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे वर नमूद करण्यात आले आहे. मात्र, आजघडीला हृदयविकाराचा झटका आलेल्या स्त्री-रुग्णांपैकी सुमारे १० टक्के ते १५ टक्के रुग्ण हे २५ ते ३५ वर्षे वयोगटातील असल्याचे आकडेवारीतून असे दिसून आले आहे! याची काही कारणे पुढीलप्रमाणे.


- बैठ्या जीवनशैलीचा अंगीकार


- कुटुंबामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा पूर्वेतिहास असणे हे आजही पहिल्या क्रमांकाचे कारण आहे.


- ताणतणाव


- धुम्रपान


- घरात आणि बाहेरही आढळणारे वायुप्रदूषण हेही महत्त्वाचे कारण आहे.


पुढील उपाय केल्यास स्त्रिया आपल्याला असलेला हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.


- अधिक सक्रिय राहा : दिवसभरातून किमान अर्ध्या तासासाठी मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा.


- सकस आहार घ्या : हृदयाच्या दृष्टीने चांगल्या आहारामध्ये फळे आणि भाज्या, अखंड धान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश असतो. त्याचबरोबर सोडियमचे सेवन कमी करा आणि ज्यांच्यामुळे ट्रान्स फॅट्स शरीरात जातील असे पदार्थ खाणे टाळा.


- धुम्रपान टाळा : स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता धुम्रपानामुळे दुपटीने वाढते, तेव्हा सिगारेटला तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा!


- मनावरील ताण कमी करा : दीर्घकाळापासून मनावर असलेला ताण तसेच नैराश्य यांच्यामुळे हृदयविकाराचा झटका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी व्यावसायिकांची मदत घ्या, मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी बोला. ध्यानधारणा आणि योगासनांसारख्या मनावरील ताण कमी करणार्‍या तंत्रांचा वापर करा, पुरेशी झोप घ्या आणि आपल्या प्रियजनांशी बोला.


स्त्रियांमधील हृदयविकाराचे निदान लवकर होत नाही, याचे कारण मुळात स्त्रिया आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या गरजांचा अधिक विचार करतात. पण, लक्षात ठेवा, स्त्रियांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचा धोका हा स्तनांच्या कर्करोगामुळे येणार्‍या मृत्यूच्या धोक्याहूनही अधिक असतो. तेव्हा आपल्या संपूर्ण आरोग्याकडे लक्ष द्या, लवकरात लवकर हृदयाच्या नियमित तपासण्या करून घ्यायला सुरुवात करा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या वार्षिक तपासण्या करून घेण्यासाठी वेळ निश्चित करा.

- डॉ. झाकिया खान

(लेखिका इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण
येथे सीनिअर कन्सल्टन्ट आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@