मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |


Parker_1  H x W



बरेचदा इतरांचे विचार, बोलणे अथवा त्यांची कृती आपल्या मनात, आयुष्यात अतिक्रमण करुन आपल्यातील ऊर्जा, सकारात्मकतेला उद्ध्वस्त करु पाहते. पण, हे सगळे होते, कारण आपण त्यांना कळत-नकळत आपल्याच आयुष्याच्या अंगणात डोकावण्याची संधी देत असतो. तेव्हा, असे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, याचा विचार करुन आसवं गाळण्यापेक्षा ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं’ असा बिनधास्त विचार एकदा करुन तर पाहा...


आपल्याला इतर लोकांपासून अनेक वेळा त्रास होतो. बरेच जण असं सांगतात की, ‘अरे माझी स्वतःची अशी काहीच समस्या नाही. पण, लोकच समस्या निर्माण करतात माझ्या आयुष्यात.’ हा तसा सर्वसामान्य विषय आहे. आपल्या अवतीभवती अशा इतक्या गोष्टी घडत असतात की, ज्याचा शिरकाव आपल्या आयुष्यात होत राहतो. कळत-नकळत या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यातसुद्धा नको त्या उचापती होत राहतात. त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा आपल्यालाही नकारात्मकतेच्या भोवर्‍यात नेऊन सोडले आणि कितीही प्रयत्न केले, तरी आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. हे असं का होतं? इतर लोकं आपल्या आयुष्यात असा धुमाकूळ कसा घालू शकतात? मुळात आपण तो त्यांना का घालू देतो, ही बाब जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी आपल्या आजूबाजूला असणार्‍या व्यक्तीचा ‘मूड’ जरी खराब असला तरी आपल्याला आपली घडी विस्कटली आहे असे वाटते किंवा एखाद्याने आपल्यावर टीका केली, तरी आपली दुनिया कोसळल्यासारखे आपल्याला वाटते. आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला जाणवेल की, आपणच आपल्या भावनांवर व विचारांवर दुसर्‍या लोकांना एक प्रकारचा विघातक पगडा टाकायला संधी देतो. आपल्या आयुष्यावर असा विघातक प्रभाव टाकण्याची संधी आपण लोकांना दिली, तर आपल्या संभाव्य विकासाची संधी आपण गमावून बसतो. दुसर्‍याने आपले नैतिक खच्चीकरण किती करावे, याला मर्यादाही आपणच घालू शकतो. तथापि, बर्‍याच वेळा लोकांच्या हातात आपण आपल्या भावनिक आणि वैचारिक प्रक्रियेवर हावी होण्याची संधी कशी नकळत आणि अलगद देतो, हे समजावून घ्यायला हवे. बर्‍याच वेळा हे कसे घडते, याची जाणीवसुद्धा आपल्याला नसते.


सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे एक अवकाश असते. हे अवकाश त्या व्यक्तीची अस्मिता असते. त्यात त्यांच्या अस्तित्वाचे सार असते, चैतन्य असते. आत्म्याचा एकांत असतो. त्या अवकाशात ती व्यक्ती केवळ स्वतःबरोबर निवास करत असते. या स्वतःच्या अवकाशात कुणी प्रवेश करावा आणि न करावा, हे ती व्यक्तीच ठरवित असते. बर्‍याचवेळा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावनांत वाहत जाते, दुसर्‍यांच्या विचारात विचार करायला लागते किंवा वागायला लागते, तेव्हा तिच्या त्या व्यक्तिगत अवकाशात इतरांचा प्रवेश होऊ लागतो. आपली ऊर्जा जेव्हा दुसरे लोक वापरायला लागतात, तेव्हा आपण खूपच चिडतो. आपली वेळ, आपले स्वत्व आणि सत्त्व या सगळ्यांमध्ये आपल्याला कुणा ना कुणाचा तरी शिरकाव झालेला दिसतो. अशावेळी पुन्हा एकदा आपल्याला अस्तित्वाच्या सीमा ठरवायला लागतात. या सीमा शारीरिक असतील, भावनिक असतील वा तात्त्विक असतील. त्या हद्दीच्या आत इतर कोणी येऊ नये, हे आपणच ठरवायचे असते. अगदी साधी गोष्ट जी आपल्या दैनंदिन जीवनात घडत असते. आपल्याला कोणी तरी फोन करतो. या व्यक्तीला आपल्याला खूप वेळ द्यायचा नसतो. पण, नंतर लक्षात येतं की, या व्यक्तीने सरळ सरळ आपला भरपूर वेळ घेतला आहे आणि तोसुद्धा काही महत्त्वाचे कारण नसताना! मग आपण काय करतो? स्वत:वरच चिडतो. फणफणतो. अशा तर्‍हेने आपण बर्‍याच लोकांना आपल्या अस्तित्वामध्ये संचार करायला देतो.

काही वेळा लोकांना आपण आवडत नाही वा आपली निवड वा पसंती आवडत नाही. पण, या गोष्टी आपल्याला मात्र रुचत नाहीत. अर्थात, त्या लोकांनी त्यांच्या मतस्वातंत्र्याचा व्यवस्थित आनंद घेतला. त्यांनी तो घ्यावाही, यात आपल्याला काही आक्षेप असण्याची गरज नाही. तथापि, त्यांच्या आपल्याबद्दलच्या या अभिप्रायामुळे आपल्यावर काही गंभीर परिणाम होत नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. दुसर्‍याच्या अभिप्रायामुळे वा त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं आहे, या विचारांनी आपण स्वत:बद्दल निराश होणं तरी टाळायला पाहिजे नाही का? कारण, दुसर्‍या माणसांच्या विचारांना फारच महत्त्व दिलं, तर आपण त्या व्यक्तीच्या हातात आपल्यावर दबदबा निर्माण करायचा अधिकार देतो, त्यांच्या अभिप्रायात आपल्या भल्याचे असेल, तर ते जरुर स्वीकारावे. पण, आपल्याला हादरविण्याची ‘पॉवर’ त्यांना देणे उपयोगी नाही. साधं वाक्य पाहा ना, ‘अगं तुला अजून चांगलं जमलं असतं.या एका वाक्याने बर्‍याच जणांना आपण काही नीट जमवलं नाही, याची खंत वाटायला लागते. त्यांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. अशा पद्धतीने दुसर्‍यांच्या मतांना आपल्या अस्तित्वावर हुकमत गाजविण्यास देणे योग्यच नाही. असंही होतं की, इतरांनी आपल्याला भावनिकदृष्ट्या भडकवले की, आपण आपले बोल वा कृती मागे घेतो. आपल्याला पश्चाताप वाटतो. कित्येक वेळा आपण बरोबर असतो. खरे असतो. पण, दुसर्‍याला दुखावले या भावनेने मागे वळतो. तेव्हाच आपण दुसर्‍यांना आपल्यावर वर्चस्व सिद्ध करायचा फुकाचा अधिकार देतो. अशा पद्धतीने बरेचजण आयुष्यात वारंवार पराभूत होतात. आपण आपली शक्ती आणि सामर्थ्य सावध न राहिल्याने गमावत जातो. (क्रमश:)
 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@