अखेर मिरची झोंबलीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |


Shahid Afridi_1 &nbs



‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेला संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धर्तीवर सुरुवात होणार आणि भारताचा पारंपरिक कट्टर शत्रू पाकिस्तानला यामुळे मिरची झोंबणार, हा तमाम भारतीय क्रिकेटपटूंचा आशावाद अखेर खरा ठरला आहे. युएईच्या धर्तीवर ही जगप्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा होत असूनदेखील पाकिस्तानच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळणे म्हणजे हे त्यांच्यासाठी खूप नुकसानदायक असल्याची कबुली खुद्द पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने दिली. माजी खेळाडूने ही कबुली देणे म्हणजे, पाकिस्तानने ही मिरची झोंबल्याची दिलेली कबुलीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, ‘आयपीएल’मध्ये जगभरातील लहान-मोठ्या देशांतील अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. कोट्यवधींची कमाई करत अनेक खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत आहेत. या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव घेत अनेक खेळाडू आपले भविष्य घडवत आहेत. क्रिकेटचे अस्तित्व टिकविण्याची धडपड करणार्‍या देशांतील खेळाडूही या स्पर्धेत कोट्यवधींच्या घरात कमाई करत आहेत. युएईमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या या कुंभमेळ्यात जगभरातील खेळाडूंची भरभराट होत आहे. मात्र, काही केल्या पाकिस्तानला यात सामील होता येत नसल्यामुळे शत्रूराष्ट्राचा जळफळाट होणे अगदी साहजिक आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यास ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (आयसीसी) बंदी घातल्यामुळे पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून युएईमध्येच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत आहे. त्यामुळे युएईमधील मैदाने पाकिस्तानसाठी ‘होम ग्राऊंड’ बनली आहेत. आपल्या घरच्या मैदानांवर जगभरातील खेळाडू कोट्यवधीच्या घरात कमाई करतात. मात्र, आपल्याला यापासून वंचित राहावे लागते, हे सहन होत नसल्यानेच अखेर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी मिरची झोंबल्याची आता कबुली देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताविरोधात नेहमी गरळ ओकणार्‍या या खेळाडूने यंदाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय क्रिकेट चाहत्यांचे कौतुकही केले आहे. आपल्याला “‘आझाद काश्मीर’च्या संघाचे कर्णधार व्हायचे आहे,” असे विधान करणार्‍या या आफ्रिदीला नेमके आताच भारताची स्तुती करण्याची सुबुद्धी सुचली, याचादेखील विचार होणे गरजेचा आहे.
 
 
दोष स्वतःचा; लादणं दुसर्‍यावर!
 
 


पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय क्रिकेट चाहत्यांचे कौतुक करताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवरही आरोप केले. “जोपर्यंत नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार केंद्रात सत्तेत आहे, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकांचे आयोजन कधीही होऊ शकत नाही,” असे आफ्रिदी बोलून मोकळा झाला. मात्र, आफ्रिदीने असे बोलून पुन्हा एकदा स्वतःच्या मूर्खत्वाचे प्रमाणपत्रच सर्वांसमोर सादर केले, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरू नये. कारण, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका न होण्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. २००९ साली लाहोर येथे श्रीलंकेच्या खेळाडूंवर बसमध्ये झालेला दहशतवादी हल्ला पाहता ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (आयसीसी) सुरक्षेच्या कारणात्सव पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. या प्रकारानंतर जवळपास आठ वर्षे पाकिस्तानमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय मालिकांचे आयोजन झाले नाही. सर्व मैदाने ओस पडू लागली. मालिकांचे आयोजन न झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थिक चणचण जाणवू लागली. अनेक देशांनी पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिक डबघाईला आले. आपली आर्थिक घडी सावरण्यासाठी भारताने क्रिकेट मालिकांचे आयोजन करण्याची मागणी पाकिस्तानने केली. यासाठी विविध स्तरांतून प्रयत्न झाले. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. करारानुसार मालिका न झाल्याने पाकिस्तानने भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा नेला. मात्र, पाकिस्तानलाच १०० कोटींचा दंड ठोठावल्याने पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली. भारताप्रमाणेच इतर काही देशांनीही मालिका खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. अनेक क्रिकेट खेळाडूंना मानधन मिळणेही बंद होऊ लागले. ‘आयपीएल’मध्येही पाकिस्तानी खेळाडूंची एन्ट्री बंद झाल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिकांचे आयोजन न होण्यात कोणत्याही सरकारचा नव्हे, तर तुम्ही पोसलेला दहशतवादच कारणीभूत आहे. तेव्हा आफ्रिदीने आधी यासाठी सरकारला नव्हे, तर स्वतःच्या देशातील स्फोटक दहशतवादास कारणीभूत ठरवले पाहिजे, हाच खरा शहाणपणा!
 

- रामचंद्र नाईक

 
@@AUTHORINFO_V1@@