पौराहित्य धर्मसंस्कार सगळ्यांसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020   
Total Views |


Mukundrao Khoche_1 &

मळलेल्या वाटेवरून न जाता, धर्मक्षेत्रामध्येही सर्व समाजाला समान संधी उपलब्ध करून देणारे नाशिकचे मुकुंदराव खोचे गुरुजी. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...


पौराहित्य हे कैक कालानुसार पुरोहितांचे कार्य आहे. तुम्ही इतरांना पौराहित्य शिकवणारे कोण? समाजधर्म संकेताचे उल्लंघन करत आहात.त्या काही धर्ममार्तंडांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्या सर्व धर्ममार्तंडांना मुकुंद खोचे म्हणाले, “पौराहित्य हे सर्व समाजाने शिकायला हवे, त्यातही दुर्दैवाने समाजाच्या उतरंडीवर असणार्‍या अंत्यजांनी पौराहित्य शिकले, तर त्या अंत्यजांसोबतच समाज आणि धर्माचेही रक्षण आणि कल्याण होणार आहे.” कित्येक भेटीगाठींतून शेवटी मुकुंद यांची भूमिका सर्वांना समजली आणि तिचे कालातीत महत्त्वही समजले.


 
त्यावेळी मुकुंद करवीरपीठाच्या शंकराचार्यांनाही भेटले. शंकराचार्य म्हणाले की, “तळागाळातील लोकांनाही वेदशास्त्र शिकण्याचा, पौराहित्य करण्याचा हक्क, अधिकार आहे आणि त्यांना ते शिकवण्याचे काम धर्माचेच!” या कार्यासाठी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी तसेच संस्कृत भारतीचे च. मु. कृष्णशास्त्री, नाशिकमधील अनेक ब्राह्मण अधिकारी वर्गाने मुकुंद यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली. आज रा. स्व. संघातर्फे चालवल्या जाणार्‍या या पौराहित्य अभ्यासवर्गातून ६५० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यापैकी ३५०हून अधिक विद्यार्थ्यांनी पौराहित्य सुरू केले आहे. या पौराहित्य वर्गाचे शिक्षक म्हणून मुकुंद खोचे कार्य करतात. मुकुंद यांनी धर्मांतर केलेल्या कितीतरी जणांना पुन्हा स्वधर्मात आणले आहे. संस्कृतवर त्यांचे प्रावीण्य आणि प्रेमही. प्रेम इतके की, त्यांच्या घरामध्ये संस्कृतच बोलले जाते. बालवयापासूनच ते संघ स्वयंसेवक असल्याने ‘सब समाज को साथ लिये’चा मंत्र त्यांनी धर्मकार्यातही अवलंबला आहे. मुकुंद यांच्या आयुष्याचा मागोवा घेताना वाटते की, जातीने आणि कर्मानेही ब्राह्मण असलेल्या या व्यक्तीने पारंपरिक रूढी-संकेत न जुमानता, आयुष्यात संस्कृत प्रचाराचा आणि पौराहित्य प्रशिक्षणाचा हा मार्ग निवडला असेल, तर त्याचे उत्तर त्यांच्या भूतकाळात सापडते.


 
मूळच्या औरंगाबादचे खोचे घराण्यातले दत्तात्रेय खोचे विद्याभ्यासासाठी नाशिकला आले. अतिशय खडतर आयुष्य काढत, माधुकरी मागत, प्रचंड अभ्यास आणि व्यासंगाने त्यांनी नाशिकमध्ये विद्वान ब्राह्मण म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यावेळी आणि आजही नाशिकमध्ये शौचे घराणे हे ब्राह्मण अधिकारी घराणे. त्या घराण्यातील निर्मला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पहाटे उठणे, वेदाभ्यास करणे, नंतर पौराहित्याचे काम करणे, सायंकाळी घरी येणे, असा दत्तात्रेय यांचा दिनक्रम. त्यांच्या घरी वेदाभ्यासाठी विद्यार्थीही असत; अर्थात विद्यादान अर्थकामासाठी नाही हा धर्मसंकल्प असल्याने एक कवडीही न घेता ते मुलांना पौराहित्य, वेद-उपनिषद, पूजापाठ शिकवीत. छोटे गुरुकुलचे होते ते. घर म्हणावे तर किती मोठे? दहा बाय बाराचे घर आणि त्या घरात राहायला माणसे किती? तर दत्तात्रेय, निर्मला, त्यांची चार अपत्ये आणि इतर अनेक भाऊ-बहिणी त्यांचा कुटुंब कबिला मिळून एकूण 34 जण. आज विचारही करवत नाही. पौराहित्यातून दत्तात्रेय यांना काय अर्थार्जन होत असेल? पण, आपण जसे शिकलो तसे आपले भाऊ-बहीण इतर नातेवाईक शिकावेत म्हणून दत्तात्रेय यांनी या सगळ्यांना नाशिकला बोलावून घेतले होते. दत्तात्रेय यांच्या मुलाबाळांसकट त्यातले कित्येक जण वार लावून जेवत असत. पण, शिक्षण संस्कार कुणी सोडले नाहीत. अशा वातावरणातच मुकुंद वाढत होते. त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी एक घटना म्हणजे घर, वस्ती आजूबाजूला सगळे ब्राह्मण असल्याने सोवळे आवळे होतेच. काही दशकांपूर्वी म्हणजे मुकुंद लहान असताना शौचालयाचा मैला साफ करण्यासाठी जी व्यक्ती येई, ती डोक्यावर मैला वाहून नेई. त्यावेळी एके दिवशी सकाळी सोवळे नेसून दत्तात्रेय पौराहित्यासाठी बाहेर पडले. समोरून मैल्याची टोपली घेऊन ती स्त्री येत होती. अचानक ती जोरात किंचाळली. दत्तात्रेय यांनी पाहिले. तिच्या अनवाणी पायात काच रुतली होती. रक्त वाहत होते. पण, डोक्यावरची मैल्याची टोपली ती खाली ठेवू शकत नव्हती. तिला पाऊलही टाकता येत नव्हते. सोवळ्यातले दत्तात्रेय त्वरेने पुढे गेले, मैल्याची टोपली खाली उतरवली. निर्मला यांना बोलावले. निर्मलांनी त्या महिलेच्या पायातली काच काढली. तिच्यात हळद भरली आणि शाल फाडून ती तिच्या पायाला बांधली; अर्थात आता काळ बदलला आहे, म्हणून या घटनेचे महत्त्व कळत नाही. पण, ४० वर्षांपूर्वी ही अतिअपवादात्मक घटना होती. ही घटना नुकतीच मुंज झालेल्या मुकुंद यांना मानवतेचा धडा देऊन गेली. आज मुकुंद खोचे हे पौराहित्य क्षेत्र, धर्मसमाजक्षेत्र यामध्ये अग्रेसर आहेत. तेच का? त्यांचे बंधू न्यायाधीश आहेत तर त्यांच्या भगिनी विजया रहाटकर यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. मुकुंद म्हणतात, “पूर्वजन्माचे संचित असावे की, मला धर्मकार्याची संधी मिळाली. यापुढेही धर्मकार्य आणि संस्कृत संवर्धनासाठीच व्यतीत करायचे आहे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@