हॉटेल सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची 'ऑर्डर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |
Uddhav Thackery_1 &n
 
 
 


रत्नागिरीत परवानगी मिळत नाही तोपर्यंत हॉटेल बाहेर असणार लाल झेंडा 

मुंबई : राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. त्यानंतर हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
 
 
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक सरकार सोबत आहेत. याचे समाधान वाटते. कोरोनावर लस उपलब्ध न झाल्याने सावधगिरी बाळगण्याची पद्धती कायम आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते एकेक सुरु करत आहोत."
 
 
 
राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
 
 
आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
 
 
मार्गदर्शक तत्वे अंतिम करा
 
या विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे गंभीर असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, "एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची 'रेसिपी' आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचे सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
 

अद्याप निर्णय नाही !
 
सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट पुन्हा सुरू होण्यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
जोपर्यंत परवानगी नाही तोपर्यंत हॉटेल बाहेर फडकणार लाल निशाण
 
हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी रविवारी पर्यटन दिनी हॉटेल्सवर लाल झेंडा फडकविला. याद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळेपर्यंत हा झेंडा हॉटेल्सच्या बाहेर फडकत ठेवण्यात येणार आहे. हॉटेल असोसिएशनचे सुनील देसाई, रवींद्र घोसाळकर, उदय लोध यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


@@AUTHORINFO_V1@@