'भाजपसोबत सत्तेत या आणि वाटाही घ्या' ; आठवलेंची ऑफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |

sharad pawar uddhav thcke



मुंबई :
शिवसेनेने भाजपसोबत यावे अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी शिवसेनेला साद घातली आहे. विशेष म्हणजे आठवलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही एनडीएसोबत येण्याचे आवाहन केले. त्यांनी आज 28 सप्टेंबर रोजी अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचार प्रकरणी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले.



“शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढावा आणि भाजपसोबत यावं. शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत यावं आणि सरकार स्थापन करावं,” असं मत रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.रामदास आठवले म्हणाले, “संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचं सरकार बनवावं. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावं. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावं आणि सरकार स्थापन करावं.”



त्याचवेळी त्यांनी शरद पवारांनादेखील एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केले. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावं, असं रामदास आठवले म्हणाले. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल, असं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले. त्या प्रक्रियेत स्थान देण्यात आलं नाही, अशी काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधलं.
@@AUTHORINFO_V1@@