सिंधुदुर्गातील धामापूर तलावामुळे महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020   
Total Views |

dragonfly _1  H

 


धामापूर पाणथळ परिसरातून महाराष्ट्रासाठी नव्या दोन प्रजातींची नोंद

मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाने महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत दोन प्रजातींची भर घातली आहे. महाराष्ट्रात प्रथमच चतुरांच्या 'सफायर आईड स्प्रेडविंग' आणि 'रेस्टलेस डेमन'च्या उपप्रजातीची धामापूरमधून नोंद करण्यात आली. शिवाय या दोन प्रजातींचा वावर पहिल्यादांच पश्चिम घाटाच्या उत्तरेकडून नोंदविण्यात आला आहे. धामापूर आणि ठाकूरवाडी पाणथळ तलाव परिसरातील जैवविविधतेची नोंद करणारा शास्त्रीय शोध निबंध नुकताच प्रसिद्ध झाला. त्यातून ही माहिती समोर आली.

 


 
 
गोड्या पाण्यातील अधिवासात चतुर हे पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे कीटक आहेत. पश्चिम घाटात साधारण १९३ प्रजातीचे चतुर आणि टाचण्या आढळतात. त्यामधील ४० टक्के प्रजाती या केवळ पश्चिम घाटात आढळतात म्हणजेच त्या पश्चिम घाटाच्या प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. महाराष्ट्रात आजवर चतुरांच्या १३४ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये आता दोन प्रजातींची भर पडली आहे. मालवण तालुक्यातील धामापूर तलाव जैवविविधतेने समृद्ध पाणथळ परिसर आहे. येथून या दोन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
 

(धामापूर तलाव) 
dragonfly _1  H 
 

 

धामापूर तलावाच्या जैवविविधतेची नोंद करणारा शोध निबंध शनिवारी 'जर्नल आॅफ थ्रेण्टेंड टॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये प्रसिद्ध झाला. यामध्ये धामापूर तलाव आणि आसपासच्या परिसरातून चतुरांच्या ६१, फुलपाखरांच्या ५१, उभयसृपांच्या १७, पक्ष्यांच्या ९० आणि सस्तन प्राण्यांच्या चार प्रजातींच्या अधिवासाची नोंंद प्रसिद्ध झाली. नेहा मुजूमदार, डाॅ. दत्तप्रसाद सावंत, अमिला सुमनपाला, पराग रांगणेकर आणि पंकड कोपर्डे या संशोधकांनी शोध निबंधासाठी काम केले. महाराष्ट्रात प्रथमच धामापूर तलाव परिसरातून 'लेस्टेस प्रीमोर्सस' म्हणजेच 'सफायर आईड स्प्रेडविंग' आणि 'इन्डोथेमिस लिंबाटा सिता' या 'रेस्टलेस डेमन' चतुराच्या उपप्रजातीची नोंद झाल्याची माहिती संशोधक डाॅ. दत्तप्रसाद सावंत यांनी दिली. या नोंदीमुळे महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत दोन प्रजातींची भर पडल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागामधून या दोन प्रजातींची प्रथमच नोंद केल्याचेही, सावंत म्हणाले.

 



आॅक्टोबर, २०१९ मध्ये धामापूर गावात सहावी 'डॅगनफ्लाय साऊश एशिया' बैठक पार पडली होती. यावेळी सर्वेक्षणादरम्यान संशोधकांच्या निदर्शनास 'गायनाकांथा खासीयका' आणि 'प्लॅटिलेस्टेस प्लॅटिस्टायलस' हे चतुरही आले. मात्र, त्यांची नेमकी ओळख पटविण्यासाठी संशोधकांना त्यांच्या नमुन्यांची आवश्यकता आहे. या नमुन्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटल्यास महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत या दोन प्रजातींची भर पडेल.

 


@@AUTHORINFO_V1@@