मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020
Total Views |

uddhav thackeray_1 &


एखाद्या शिवसैनिकाला जखम झाली तर आपण धावून जाता! इथे तर लाखो मतदार जनता जनार्दन आहेत ते शिवसैनिकांपेक्षाही महत्त्वाचे आहेत! आपला पक्ष वाढविण्याकरिता तरी आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही? मला पूर्ण खात्री आहे. आपण आम्हाला ‘आयसीयू’च्या निकषांप्रमाणे व सर्व रुग्णांना कोरोनाच्या उपचाराकरिता कमीत कमी ५० डॉक्टर्स फिजिशियन नियुक्त करा! आणि १५०परिचारिकांच्या जागा भरा, सर!


प्रति,
मान. नाम. उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.
स.न.वि.वि.
आज चंद्रपूर जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रातच कोरोना महामारीची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. आपण रोज कोरोनाबाबतची माहिती घेत असालच. आपण आमचे तारणहार, मायबाप, सरकार आहात. आम्ही आमचे गार्‍हाणे आपणाकडे नाही तर कुठे मांडणार! साहेब, आपण दयाळू आहात, इमोशनल आहात, तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र आहात, तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करणार नाही तर कुणाकडे करणार? आज देवाला साकडं घालावं तर मंदिर बंद आहे! आपण म्हणाल, मनापासून देवाला आळवा तो धावत येईल! तुमचं बरोबर आहे सर! परंतु, इथे आवाज देऊन विनवणी करून कोणी लोकप्रतिनिधी धावून येत नाही तर देव कसा येईल! त्याला तर आपण बंधनात ठेवले आहे! त्यामुळे आता देवापलीकडे आपणच आमचे आधारस्तंभ आहात! आपण चंद्रपूरला येऊन आमचे गार्‍हाणे ऐकावे, असे मी मुळीच म्हणणार नाही. परंतु, मातोश्रीत बसून माझे पत्र वाचून आपण कारवाईचे आदेश दिले तरी आम्हाला आनंद होईल. परंतु, कृपया माझे पत्र वाचा, सॅनिटाईझ करून वाचा! पण, वाचा! तेवढ्यानेच आम्हाला, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्ह्याकडे आपले लक्ष आहे, असा जनतेचा विश्वास बसेल व ते तुमच्यावर नाराज होणार नाहीत.


साहेब, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २० ते २५ टक्के अतितीव्र रुग्णांची संख्या व एकूण वैद्यकीय तयारी यात कुठेच ताळमेळ नाही! कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे! मी, असे म्हणणार नाही की, देशापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्ती आहे व मृत्यूची संख्यासुद्धा देशात १.५ टक्के आहे तर महाराष्ट्रात २.५ टक्के आहे. यात आपला काय दोष! आपण जनतेला आवर्जून आवाहन करता, टीव्ही चॅनेलवरही सांगता, “मास्क लावा, दोघांमध्ये अंतर ठेवा, कामाशिवाय बाहेर पडू नका, हात धुवा, सॅनिटायझर वापरा.” पण, जनता ऐकेल तर ना? त्यात आपला काय दोष! परंतु, तुम्हाला म्हणून सांगते, रोजच्या कोरोनावाढीच्या संख्येने व रोजच्या वाढत्या मृत्यूने जनता भडकलेली आहे! सडकेवर उतरण्याच्या, आंदोलन, धरणे करण्याच्या विचारात आहे, हे व्हायच्या आत व्यवस्था करा! साहेब, मे २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता. दि. २० सप्टेंबर, २०२० पर्यंत सात हजार ८१६ कोरोना रुग्ण झाले. पाच महिन्यांत एवढी संख्या! परंतु, त्यात आपला काय दोष? आपण तर कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहात, हो ना साहेब! आज जिल्ह्यात जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये ५०० बेडची व्यवस्था आहे. तिथे फिजिशियन डॉक्टर्स सात होते, तीन डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आता तिथे केवळ चार फिजिशियन आहेत. आता मला सांगा, ‘आयसीयू’त १०० रुग्ण, ऑक्सिजन हवे असणारे कोरोना रुग्ण ८२, व्हेंटिलेटर ८७, अ‍ॅनास्थिशिया देणारे चार आणि (मंजूर परिचारिका संख्या ३७५) प्रत्यक्षात ७३ परिचारिका कामात म्हणजे रुजू!

मला सांगा, खरंच ही व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था पुरेशी आहे का? त्यात तुमचा काही दोष नाही! पण, आपला ‘आयसीयू’चा डॉक्टर व परिचारिकांसाठी निकष काय आहे? तर ५० ‘आयसीयू’ रुग्णांमागे किमान दहा डॉक्टर व १६ परिचारिका एका शिफ्टमध्ये हव्या, अशा तीन शिफ्ट असतात, मग हे चार डॉक्टर्स १०० ‘आयसीयू’ रुग्णांना काय सेवा देतील. जनरल ४०० बेड, त्यातही ऑक्सिजनचे रुग्ण ८२, सामान्य रुग्णालयातले क्लास वन फिजिशियन तीन व १३ क्लास दोनची मदत त्यांना आहेच, तरी आपण सांगा सर! ही व्यवस्था योग्य आहे का? आपण डॉक्टर्स व परिचारिकांच्या पोस्ट भरल्या असत्या तर? आपण एवढे निष्ठूर नाही. पण, कदाचित आपल्याकडे मागणी पत्र नसेल किंवा आपल्यापर्यंत मागणीपत्र आलं नसेल? आपण पत्र मिळाल्याबरोबर कारवाई केलीच असती! मला पूर्ण खात्री आहे! एखाद्या शिवसैनिकाला जखम झाली तर आपण धावून जाता! इथे तर लाखो मतदार जनता जनार्दन आहेत, ते शिवसैनिकांपेक्षाही महत्त्वाचे आहेत! आपला पक्ष वाढविण्याकरिता तरी आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही? मला पूर्ण खात्री आहे. आपण आम्हाला ‘आयसीयू’च्या निकषांप्रमाणे व सर्व रुग्णांना कोरोनाच्या उपचाराकरिता कमीत कमी ५० डॉक्टर्स फिजिशियन नियुक्त करा! आणि १५० परिचारिकांच्या जागा भरा सर!


आज चंद्रपुरातील खासगी दवाखाने व शासकीय दवाखाने मिळून तीन हजार ७७० एकूण बेड आहेत. त्यांत ‘आयसीयू’ ९० बेड व ऑक्सिजन बेड ८२ आहेत. यातही ‘आयसीयू’च्या रुग्णाला १४ दिवस उपचार द्यायचे. हे जरी खरं असले तरी सात हजार ८१६ कोरोनाबाधितांची संख्या आहे. त्यातले २० टक्के जरी अतितीव्र व ऑक्सिजन आवश्यक असलेले रुग्ण धरले तरी एक हजार ५६३ रुग्णांना आपण कसा न्याय देणार! ही सगळी व्यवस्था खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालय धरूनही निम्मी होत नाही! साहेब, त्यामुळे मृत्यू सोपा झाला आहे! आज रुग्णालयात वेटिंगवर असताना आता स्मशानघाटात वेटिंगलिस्ट लागली! कोरोना रोगापेक्षा उपचार व मरण महाग झाले! आता तर खासगी दवाखान्यावाल्यांनी कोरोना रुग्णांना सेवा द्यावयाचे बंद करण्याचे आवाहन केले, ते जर झाले तर गरिबांचे हाल *** खाणार नाही! आज राज्यात दोन हजार ५००वर खासगी रुग्णालये कोरोनाबाधितांना सेवा देत आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपल्याला माहीत आहे, आपण त्यावर विचारही करीत असाल! साहेब, कृपया निर्णय लवकर घ्या, एवढीच आपणाला आम्ही विनंती करतो! आपणच त्यांच्याशी अ‍ॅग्रिमेंट केलं ते पाच महिन्यात दिलं नाही, त्यांना विमा कवच नाही हे त्यांचे दुखणे आहे.


साहेब! आयसोलेशनमध्ये आपण रुग्णाला घरी ठेवण्याची परवानगी दिली. परंतु, चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून ७० ग्रामीण भागात पसरलेला आहे. त्यांच्याकडे एक झोपडं आहे. एका एका खोलीत दहा, दहा लोकं झोपतात, त्यांचा विचार करा? आज मरणार्‍यांमध्ये त्यांचीच संख्या जास्ती आहे. गरिबांना कोरोनाच्या प्रादुर्भावाने मरण स्वस्त केले आहे. आज मरणार्‍यांमध्ये २० ते ४० पेक्षा ऐन उमेदीतले ४० ते ६०मध्ये ४८ रुग्ण आहेत. हा आकडा दि. १४ सप्टेंबर, २०२०चा आहे. यात आणखी भर पडली आहे! गरीब ना पैसा खर्च करू शकत, ना दुसर्‍यासमोर रडू शकत! गरीब असेल पण लाचार नाही! पैसा नसेल पण स्वाभिमानी आहे. तो कुणाकडे भीक मागणार नाही. असा माझा ग्रामीण भागातील माणूस! बैल आजारी पडला तर बायकोच्या गळ्यातलं डोरलं विकून त्याला वाचवतो. परंतु, त्याच्यावर मरणाची वेळ आली तर मायबाप सरकारही वाचवित नाही. श्रीमंताकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे त्याची सोय मोठ्या दवाखान्यात होते. परंतु, गरिबांसाठी तर सरकारी रुग्णालयच आहे. त्यामुळे त्याचे जीवन हे, ‘भोगिलो मी दु:ख त्याला! सुख म्हणावे लागते॥’ एवढेच आहे. आपण गरिबांच्या भावना, त्याची जगण्याची धडपड, आपल्या आधाराची अपेक्षा व मदतीचा हात आज तो अपेक्षित आहे. एवढे तरी करा? नाहीतर ग्रामीण जनता आपणाला माफ करणार नाही! सत्तेच्या खुर्चीवर बसणार्‍यांपेक्षा सत्तेच्या खुर्चीवर बसविणार्‍यांची किंमत जास्त असते, हे लक्षात घ्या.
धन्यवाद!

- शोभाताई फडणवीस

आपल्या पत्राच्या उत्तराच्या प्रतीक्षेत...!
@@AUTHORINFO_V1@@