गोमांस तस्करी करताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रंगेहात अटक

    27-Sep-2020
Total Views |



Exclu_1  H x W:


बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने समोर आणला धक्कादायक प्रकार


विशेष वृत्त (सोमेश कोलगे): महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्याच पदाधिकारी-कार्यकर्त्यांना गोमांस तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या एका सक्रीय कार्यकर्त्याने दाखविलेल्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर येऊ शकला. शनिवारी डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शनिवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी दोन इसम एका व्हैगनआर गाडी क्र. MH 05 DH 2842 मधून पांढऱ्या व काळ्या पिशवीचे गठडे दुसऱ्या डस्टर गाडीत ठेवत होते. या दोघांची नावे जॉय मैथ्यू (४२) आणि बिजू सिटी राजन (३८) असून दोघेही कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते असल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील तपोवन बिल्डींगच्या शेजारील बंद रोड सर्व्हे नं. ८१(१) येथे हा प्रकार सुरु होता. बजरंग दल कार्यकर्त्याने जवळ जाऊन पाहिले असता तिथे दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने त्यांच्याकडे कसले मांस आहे, याविषयी विचारणा केली. त्यातून वाद सुरु झाल्यावर बजरंग दल कार्यकर्त्याने त्यांना तिथेच थांबण्यास सांगून मानपाडा पोलीस ठाण्यात फोन केला. आपण अडकणार हे लक्षात आल्याबरोबर डस्टर गाडी व त्यातील इसम पळून गेले. इतर दोघांना बजरंग दल कार्यकर्त्याने पळ काढू दिला नाही. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गोमांस आहे कि नाही, याची खातरजमा करण्यासाठी कल्याण डोंबिवलीचे पशुधनविकास अधिकारी सुभाष जाधव यांनाही बोलावले. संबंधित कॉंग्रेस कार्यकर्ते गोमांसाची तस्करी करीत होते याची खात्री पटल्यावर त्यांना अटक करून संध्याकाळी सव्वाआठच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. व्हेगनआर गाडी आणि त्यातील दोन्ही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना गोमांस बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


Exclu1_1  H x W

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार , जॉय मैथ्यू कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव या पदावर आहेत. तसेच त्यांचा कॉंग्रेस पक्षाच्या बैनरवरील फोटो पडताळून संबंधित व्यक्तिच याप्रकरणातील आरोपी असल्याची माहिती तक्रारदाराने ‘मुंबई तरुण भारत’ ला दिली आहे.



cong_1  H x W:




अटक झाल्यानंतर जॉय मैथ्यू यांनी आपण कॉंग्रेस पदाधिकारी असल्याचे सांगत राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला, असे पोलीस ठाण्यातील प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. डोंबिवलीतील कॉंग्रेसचे बडे कार्यकर्ते रवी पाटील पोलीस ठाण्यात आले होते, अशीही माहिती मिळाली आहे. दुसरा आरोपी बिजू सिटी राजन हादेखील कॉंग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्याविषयी खात्रीशीर माहिती हाती लागलेली नाही. सध्या दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. 


Exclu2_1  H x W

तक्रारदाराला आरोपींनी धमकी दिली मात्र त्यांना कोणतेही पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.