व्हिव्हियन परत येते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2020
Total Views |

girl _1  H x W:


हार्टलीने खिशातून दहा डॉलर्स काढून त्याला दिले. तो निघून गेला. कार्यालयाला कुलूप लावून हार्टली त्या पत्त्यावर चालत निघाला. पत्ता जवळचाच होता. झटकन सापडला. त्याला हवी असलेली मुलगी, व्हिव्हियन - चौथ्या मजल्यावर राहाते. त्याने खिशातून पत्त्याचा कागद काढून पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि एक दीर्घ श्वास घेऊन एकेक मजला चढायला सुरुवात केली.



संध्याकाळची वेळ होती. ‘रॉबिन्स अ‍ॅण्ड हार्टली ब्रोकर्स’चं कार्यालय बंद झालं होतं. सर्व कर्मचारी आणि एक भागीदार रॉबिन्स (वय वर्षे ५०) घरी निघून गेले होते. दुसरा भागीदार हार्टली (वय वर्षे ३०) निघण्याच्या तयारीत होता. कोणाची तरी वाट बघत होता. तेवढ्यात साध्या वेषातल्या गुप्त पोलीस अधिकार्‍यासारखा बांधा आणि चेहरामोहरा असलेला एक इसम आला. हार्टलीला अभिवादन करून त्याने खिशातून एक चिठ्ठी काढून दिली.

‘’तिचा पत्ता सापडला. तिच्यावर इथून पुढे पाळत ठेवायची आहे का?”
“नाही. तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत?”

“दहा डॉलर्स.”

हार्टलीने खिशातून दहा डॉलर्स काढून त्याला दिले. तो निघून गेला. कार्यालयाला कुलूप लावून हार्टली त्या पत्त्यावर चालत निघाला. पत्ता जवळचाच होता. झटकन सापडला. त्याला हवी असलेली मुलगी, व्हिव्हियन - चौथ्या मजल्यावर राहाते. त्याने खिशातून पत्त्याचा कागद काढून पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि एक दीर्घ श्वास घेऊन एकेक मजला चढायला सुरुवात केली.
चौथ्या मजल्यावरच्या पहिल्याच खोलीचं दार उघडं होतं आणि गॅलरीत व्हिव्हियन उभी होती. त्याला पाहून तिनं एक बळजबरीचं स्मित केलं आणि त्याला आत बोलावलं. बसायला खुर्ची दिली. खुर्चीवर बसल्यावर त्याने खिशातून रुमाल काढून प्रथम घाम पुसला. तिने दिलेलं पाणी प्राशन केलं. मग तिला म्हणाला, “तू रागानं घर सोडून गेलीस आणि दोन दिवसांत आयुष्याचा कंटाळा आला. बाहेर नाश्ता घेण्याचा, जेवण्याचा उबग आला. तुझ्याशिवाय घराचा उकिरडा झाला आहे. सगळ्या वस्तू इतस्ततः विखुरल्या आहेत. एक चीज पटकन मिळेल तर शपथ. काल एका डिटेक्टिव्ह एजन्सीला तुझा पत्ता शोधण्याचं काम दिलं. आज तुझा पत्ता समजला. त्याबरोबर लगेच इथं आलो.”

ती काहीच बोलली नाही. चेहर्‍यावर घुस्सा अजून रेंगाळत होता आणि हार्टली आपल्याला शोधत शरण आल्याचा आनंद तिने मनात लपवून ठेवला होता.

“परवा जे झालं ते विसरून जा, असं पुन्हा होणार नाही.” तो म्हणाला.

“हं!”

“अजून तुझा राग गेला नाही का?”

“ती महामाया, एलोईज, तिचं काय?”
 
“तिला तेव्हाच घराबाहेर काढली. मुळात तिला त्या दिवशी बोलावलं हीच माझी चूक झाली. पण, आता ती चूक पुन्हा होणार नाही. आता पुन्हा ती रस्त्यात दिसली तरी तिच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. तीच काय, तुला शपथेवर सांगतो, आता कोणत्याही मुलीकडे मी नुसतं पाहिलं तरी तू मला हवी ती शिक्षा दे.”

काही क्षण तिने विचार केल्यासारखं केलं, मग मंद स्मितहास्य करीत ती म्हणाली, “मी परत येतेय.”

“तुला बॅग भरायला मी मदत करतो,” तो आनंदाने उद्गारला.

“त्याची गरज नाही. माझा पत्ता शोधायचं काम तुम्ही ज्या एजन्सीला दिलं, त्या एजन्सीनं ते काम सोपवलेला कर्मचारी माझा लांबचा नातेवाईक निघाला. तुम्ही येण्याच्या आधी पाच मिनिटे तो येऊन गेला होता. तुम्ही येणार हे मला वाटलंच होतं.”
तिने आत जाऊन थोडंसं प्रसाधन केलं. नवे कपडे परिधान केले. आपली बॅग घेतली. दोघे खोलीतून बाहेर पडले. चार मजले उतरले. रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी कॅब केली आणि घराकडे निघाले. वाटेत एका ठिकाणी कॅब थांबवून हार्टलीने पुष्पगुच्छ घेतला. घरापाशी कॅब आल्यावर दोघे बाहेर पडले. कॅबचे पैसे चुकते केल्यावर हार्टली तिला म्हणाला,

“तू काही क्षण बाहेर थांब. मी आत जातो. हा पुष्पगुच्छ घेऊन सगळे दारात येतो. मग तू राणीप्रमाणे घरात प्रवेश करशील, तेव्हा तुझं स्वागत करून हा पुष्पगुच्छ तुझ्या हातात देतो.”

आता मात्र व्हिव्हियन मनापासून हसली. तिची कळी खुलली. हार्टली आत गेला. आत एक पंचविशीतली स्त्री आणि तिची आई होत्या. पंचविशीतली स्त्री हार्टलीची बायको होती. दुसरी स्त्री; अर्थातच सासू होती.

“काय झालं?” बायकोनं विचारलं.
“काम फत्ते. ती बाहेर उभी आहे. तिची फक्त एकच अट आहे. इथून पुढं एलोईज या घराच्या आसपासदेखील दिसता कामा नये.”

“पगार वाढवण्याबद्दल ती काही बोलली?” सासूनं प्रश्न केला.
 
“नाही.”

“झकास! दोन दिवस हॉटेलात जेवून कंटाळा आला होता. आता तिच्या हातचं जेवू या.”

तिघे दारात आले. डौलानं पावलं टाकीत व्हिव्हियन आत आली. हार्टलीनं तिला पुष्पगुच्छ दिला आणि तिघांनी मनापासून आपल्या स्वयंपाकिणीच्या पुनरागमनाचं स्वागत केलं.


-विजय तरवडे
(‘गर्ल’ या कथेवर आधारित)
@@AUTHORINFO_V1@@