आर्यांचा ‘वंश’: मिथ्य आणि तथ्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2020
Total Views |

arya_1  H x W:


मागच्या काही लेखांपासून आपण ‘आर्यवंश’ या संकल्पनेत कितपत तथ्य आहे, हे पाहत आहोत. यामध्ये मानवी हाडांची आणि डोक्याच्या कवटीची मोजमापे, केसांचे काटछेद, मानवी शरीरातली जनुके, अर्थात Genomes या सर्वांचा आढावा घेतला. यांपैकी कुठलीच गोष्ट ‘आर्य’ नावाच्या एखाद्या ‘वंशाचे’ अस्तित्व सिद्ध करत नाही. तसेच अशा कुठल्याही एखाद्या वंशाचे लोक मध्य आशिया किंवा युरोपातून भारतात स्थलांतर करून आले आणि कायमचे स्थायिक झाले, हेसुद्धा यातून सिद्ध होत नाही. अशी स्थलांतरे तर दूरच राहोत, उलट भारतातल्या आजच्या लोकांचे प्राचीन पूर्वजसुद्धा गेल्या किमान ६० हजार वर्षांपासून भारतातच राहत होते, हे मात्र नक्की सिद्ध होते, तर मग यातून शेवटी एकच प्रश्न पुढे येतो, तो म्हणजे या सगळ्या मानववंशशास्त्रीय संशोधनांचे करायचे तरी काय?


युरोपातही भारताचीच व्यथा


मागे एका लेखात आपण डॉ. पॉल ब्रोका या फ्रेंच डॉक्टरचे संशोधन पाहिले. त्याच्या संशोधनानुसार भारतीय टापूत मिळालेल्या प्राचीन मृतदेहांची निरीक्षणे घेतली आणि सध्याच्या भारतीय लोकांची तशीच निरीक्षणे घेतली, तरी ती अतिशय मोठ्या प्रमाणावर समान दिसतात. यातून अतिशय स्वाभाविकपणे फक्त एवढेच सिद्ध होते की, इथल्या भारतीयांचे अतिशय प्राचीन काळापासूनचे पूर्वज भारतीयच होते. कुणी परकीय आगंतुक भटके नव्हते. स्वत: पॉल ब्रोकाने युरोपातल्या नवाश्मयुगीन काळातल्या अनेक मृतदेहांची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. त्याच्या निष्कर्षानुसार नवाश्मयुगीन युरोपीय लोकच आजच्या युरोपीय लोकांचे पूर्वज आहेत. तिथेही मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातूनच (Steppes) भटक्या टोळ्या युरोपात येऊन स्थायिक झाल्याच्या कथा तेव्हा होत्याच. या युरोपीय कथाकारांना खुद्द एका युरोपीय संशोधकानेच उत्तर दिलेले होते. पण, असे घरचे आहेर घेऊन कधी त्यांचे समाधान झालेले नाही. जो निष्कर्ष ब्रोकाच्या काळी १९व्या शतकात युरोपाच्या बाबतीत निघाला, तोच निष्कर्ष त्यापुढे अर्ध्या शतकानंतर भारताच्या बाबतीतही निघाला. पण, हे सत्य स्वीकारून युरोप यातून पुढे कधीच निघून गेला आणि आपण मात्र परकीय आर्यांची आक्रमणे, स्थलांतरे, मूलनिवासींवर अत्याचार, या भाकडकथांमधून आजवर दुर्दैवाने बाहेरच निघालेलो नाही.


संशोधने शास्त्रशुद्ध आहेत काय?


मुळात इथे एक मूलभूत गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जगात मानवाचे विविध वंश अस्तित्वात आहेत, हे सिद्ध करण्यासाठी जगभरातून सर्व कानाकोपर्‍यातून असंख्य लोकांचे नमुने घ्यायला हवेत. एखाद्या लहानशा प्रदेशात काही लोक अनेक पिढ्यांपासून राहत असतील, तर त्यांच्यात घडून आलेल्या मर्यादित लग्नसंबंधांमुळे आनुवंशिकतेची काही वैशिष्ट्ये काही शतकांनंतर समान दिसणे शक्य आहे. पण, केवळ त्यावरून त्या लोकांचा एकच एक असा जीवशास्त्रीय ‘वंश’ सिद्ध होत नाही. अशा भौगोलिक परिस्थितीमुळे एकत्र आलेल्या लोकांच्या गटाला ‘वंश’ म्हणून म्हणायचे असेल, तर जगभरात असे हजारो वंश मानावे लागतील. त्यामुळे मग इथे आवश्यक अशा नमुन्यांचा आवाका (Sample Size) तुलनेने प्रचंड वाढतो. इतक्या आवाक्याचे कुठलेच संशोधन आजवर जगात झालेले नाही. तीच गोष्ट मानवी जनुकांच्या संशोधनाच्या बाबतीतही सांगता येते. जनुकांमध्ये आनुवंशिकता निश्चित करणारे असे सुमारे २०० घटक ज्ञात आहेत. यावरून मानवी वंशांची संख्या फक्त गणितानेच काढायला गेल्यास ती २ चा २००वा घात इतकी प्रचंड बनते. तितकी तर जगाची लोकसंख्यासुद्धा नाही. त्यामुळे आनुवंशिक वैशिष्ट्यांवरून वंशाची निश्चिती करणे तर्कसंगत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून मग कातडीचा रंग, नाकाची ठेवण, शरीराची उंची, इत्यादी गोष्टींवरून वंशाची निश्चिती करण्याचे प्रयत्न फोल ठरतात. ते तथाकथित आर्य लोक गोरे, उंच, धारदार आणि सरळ नाकाचे होते, हे सांगणे त्यामुळेच अगदी हास्यास्पद ठरते.


‘राखीगढी’च्या संशोधनाचे उदाहरण


हरियाणामधल्या हिसार जिल्ह्यात प्राचीन सरस्वती नदीच्या खोर्‍यात एक ‘राखीगढी’ नावाचे ठिकाण आहे. सन १९६३ पासून तिथे तीन-चार वेळा उत्खनने झाली. तिथे ज्या गोष्टी सापडल्या, त्यात काही दफन करण्यात आलेले अत्यंत प्राचीन मृतदेहसुद्धा होते. त्यांच्यापैकी एका मृतदेहातून डीएनएचा नमुना मिळवण्यात तिथल्या संशोधकांना यश आले. त्याची विविध प्रयोगशाळांमध्ये तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्यात आले. यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २५हून अधिक संशोधकांच्या चमूने सन २०१५पासून या अभ्यासात अथक परिश्रम घेतले. सप्टेंबर २०१९मध्ये यावरचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यातून काढण्यात आलेला प्रमुख निष्कर्ष असे सांगतो की, हा डीएनए असलेली व्यक्ती ही जीवशास्त्रीयदृष्ट्या प्राचीन काळी शेती करणार्‍या इराणी शेतकर्‍याच्या किंवा मध्य आशियाई गवताळ प्रदेशातल्या वंशाची म्हणावी, असे या डीएनएमध्ये काहीही नाही. तात्पर्य, इथे तो डीएनए धारण करणारी व्यक्ती इराणी वंशाची नाही, हे सिद्ध तर होतेच. पण, त्याच्याही पुढे जाऊन ‘तर मग त्या मृतदेहाचा वंश नेमका कोणता’ याचे उत्तर मात्र पाश्चात्त्य संशोधकांना जे सिद्ध करायचे असते, ते तर मिळत नाहीच, उलट भारत व भारतीयांची प्राचीनता आणि सार्वकालिकता सिद्ध करणाराच निष्कर्ष यातून निघतो.


मानववंशशास्त्रीय संशोधनांचे करायचे तरी काय?


हे संशोधन आणि मागे उल्लेख केलेली बाकीची सगळी संशोधने एकत्रपणे समोर ठेवली, तर उलट त्यातून ठसठशीतपणे सिद्ध होणारी एवढी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते की, इ. सनपूर्व १८००मध्ये इराणमधल्या परकीय आणि आगंतुक ‘आर्यांनी’ उत्तर भारतात आक्रमण करून तिथल्या मूलनिवासींना दक्षिणेत हाकलून दिल्याच्या आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या गोष्टी या खरोखरच भाकडकथा म्हणायच्या योग्यतेच्याच आहेत. या देशातले आजचे लोक जितके ‘भारतीय’ आहेत, तितकेच इ. सनपूर्व १८००च्या आधीचे आणि नंतरचे भारतातले प्राचीन लोकसुद्धा भारतीयच होते. ना कुणाही भटक्या लोकांच्या टोळ्या भारताच्या बाहेरून आल्याचे पुरावे मिळतात, ना कुणा मूलनिवासी जमातींवर अत्याचाराचे पुरावे मिळतात, ना त्यांच्या दक्षिणेतल्या स्थलांतराचे पुरावे मिळतात. अशी बहुतेक सगळी मानववंशशास्त्रीय संशोधने आजच्या भारतीयांचे पूर्वज हे परकीय आगंतुक भटके होते, हे सिद्ध करण्यात कुचकामी ठरतात. त्याच्या उलट ते गेल्या किमान ६० हजार वर्षांपूर्वीपासून भारतातच राहत आहेत - कुठून बाहेरून आलेले परकीय आगंतुक नव्हेत, हे मात्र निर्णायकपणे दाखवून देतात. माणसामाणसात फूट पाडून आणि संघर्षाची काडी टाकून त्या आगीत स्वत:ची पोळी भाजून घेणार्‍या समाजकंटकांना मात्र या मानववंशशास्त्र किंवा जनुकशास्त्र वगैरे ज्ञानशाखांचा तत्त्वत: काहीच उपयोग नाही.

(क्रमश:)



- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@