उपमुख्यमंत्र्यांनी का डिलीट केलं पं.दीनदयाळ यांच्या अभिवादनाचे ट्विट?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020
Total Views |
Pandt dindayal upadhyay_1


मुंबई : उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी आज २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनाचे ट्विट केले होते. मात्र, काही वेळातच हे ट्विट त्यांनी डिलीट करून टाकले आहे. याची चर्चा आता राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे. एकात्म मानववाद देशाला देणाऱ्या राष्ट्रपुरुषांना अभिवादन केल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ट्विट डिलीट करण्याची वेळ का यावी, याबद्दल खुद्द अजित पवारांनीच उत्तर दिले आहे.
 
 
 
अजितदादा म्हणाले, "ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलून मला राजकारण करायचं नाही. जे आपल्यात नाहीत त्यांच्याबद्दल आपण चांगलं बोललं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. परंपरा आहे. त्यानुसार मी ते ट्विट केले होते. परंतू समाजकारण राजकारण करत असताना वरिष्ठांच्या सूचना ऐकाव्या लागतात."
 
 
 
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असे ट्वीट अजित पवारांनी सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी केले होते. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राष्ट्रपुरुषांना अभिवादन करणे अपेक्षितही होते. मात्र, काही काळानंतर लगेचच हे ट्विट डिलीट करण्यात आले.
 
 
 
यापूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनानंतर अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी जय श्रीराम म्हणत ट्विट केले होते. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर सत्यमेव जयते ! हे ट्विट पार्थ यांनी केले होते. त्यानंतर त्यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या मताला कवडीचीही किंमत नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र, पार्थ यांनी ट्विट कायम ठेवत आपली भूमीकाही ठाम ठेवली होती.
 
 
 
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करतानाचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम देशभर आखण्यात आले आहेत. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी यानिमित्त संवाद साधला.




@@AUTHORINFO_V1@@