धोक्याची घंटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020
Total Views |


BESt_1  H x W:

 
 


मुंबईच्या लोकसंख्येची घनता एवढी दाट होत चालली आहे की, कितीही सुविधा दिल्या तरी त्या अपुर्‍याच पडताना दिसतात. राहायला जागा अपुरी पडते म्हणून तीन ते पाच मजल्यांच्या इमारती पुढे सात-आठ मजल्यांच्या झाल्या. त्याही लोकसंख्येच्या मानाने कमी पडू लागल्या. म्हणून जागाच नसल्याने टप्प्याटप्प्याने इमारतींच्या उंचीत वाढ होत गेली. आता त्या आता ६०-६० मजल्यांच्या बांधल्या जात आहेत. माणसाला त्याच्या कर्मानुसार मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक मिळतो, असे म्हणतात. पण, अवकाशाचा वेध घेणारी इमारतींची उंची पाहिली की ‘स्वर्ग दोन बोटे शिल्लक’ याची जीवंतपणीच प्रचिती येते. झोपड्याही तीन-तीन मजल्यांच्या उभ्या राहत आहेत. लोकांची राहण्याची व्यवस्था होतेय. पण, त्यांच्या प्रवासाची, दळणवळणाची व्यवस्था काय, हा प्रश्न आवासून उभा राहिला. त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहतुकीचे उड्डाणपूल उभे राहिले. डोक्यावरून जाणार्‍या रेल्वेचे मार्ग (मोनो रेल-मेट्रो) तयार करण्यात आले. तेही अपुरे पडू लागले म्हणून भूगर्भात खोदकाम करून मार्ग तयार करण्यात येत आहेत. त्याचवेळी समुद्रात भराव टाकून कोस्टल रोड तयार करण्यात येत आहे. इतर बांधकामेही वाढविण्यात येत आहेत. मात्र, या सर्व सुविधा तयार करताना शहरातील पाण्याच्या निचर्‍याचा कसा होणार, याचा मात्र विचार करण्यात आला नाही. एकतर सात बेटांची मुंबई पाण्यात उभी आहे आणि हे सत्य विसरूनच सर्रास बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे पाणी आपला मार्ग शोधतेच. त्यावेळी मग तंत्रज्ञानही कुचकामी ठरते. निसर्गापुढे माणूस पालापाचोळा ठरतो, हे मुंबईत परतीच्या पावसाने दाखवून दिले. तासाला ५० मि.मी. पाऊस पडला तरी मुंबईची दैना होते. पण, २२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरला या २४ तासांत पडलेल्या २२६ मि.मी. पावसाने मुंबईची ‘तुंबई’ झाली. गाड्या होड्यांसारख्या तरंगल्याच; पण भूमिगत मेट्रो मार्गाचीही नदी झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या एका तलावात असणार्‍या पाण्याइतका उपसा करण्यात आला असेल तर या पाण्याने जावे कुठे? २६ जुलैच्या पुरापासून आपण काही बोध घेतला नसल्यानेच परतीच्या पावसाने धोक्याची घंटा वाजविली आहे.

 
बेवारस?
 

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे; अर्थात एसटीचे कर्मचारी आणि मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’चे कर्मचारी सध्या बेवारस असल्याचे त्यांच्या एकूणच अवस्थेवरून दिसते. एसटीचे राज्यभरात सुमारे एक लाख कर्मचारी आहेत, तर ‘बेस्ट’चे मुंबईभरात सुमारे ३५ हजार कर्मचारी आहेत. मात्र, अडीअडचणीत जनतेच्या सेवेसाठी धावूनही त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळत नाही, ही त्यांची मोठी खंत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये ‘बेस्ट’ आणि ‘एसटी’ कर्मचार्‍यांमुळे महाराष्ट्राचा कारभार सुरू राहिला, हे कोणीही नाकारू शकणार नाही. यावेळी ‘बेस्ट’ आणि ‘एसटी’चे कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित झाले. त्यापैकी काहींचा दुर्दैवाने मृत्यूही झाला. पण, मृत्यूला घाबरून ‘बेस्ट’ व ‘एसटी’ कर्मचार्‍यांनी त्यांची सेवा थांबविली नाही की, मुंबईसह राज्यभराच्या कारभारात व्यत्यय आणू दिला नाही. ते खरे तर जनसामान्यांचे सेवासैनिक आहेत. त्यांचा मानसन्मान तर दूरच. पण, त्यांना त्यांचे वेतन वेळेवर मिळू नये हे केवढे त्यांचे दुर्दैव. ‘बेस्ट’च्या कर्मचार्‍यांचे वेतन आता कुठे दरमहा होत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. प्रवीणसिंह परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आणि ते ‘बेस्ट’चे तारणहार ठरले. परदेशी यांनी काही अटी आणि शर्तींवर ‘बेस्ट’ उपक्रमाला २,१०० कोटी रुपयांहून अधिक मदत केली. त्यातून भाड्याच्या गाड्या आणणे, कामगारांची पगाराची तारीख नियमित राखणे, सेवानिवृत्तीची रक्कम अदा करणे आदी कामे ‘बेस्ट’ उपक्रमाने केली. मात्र, तसा तारणहार अजून एसटीला मिळालेला नाही. ऑगस्ट २०२० मध्ये एसटी कामगारांच्या रखडलेल्या पगारासाठी शासनाने ५५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एसटी कामगारांचा रखडलेला पगार काही अंशी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असे वाटले होते. पण, गेल्या चार महिन्यांत त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. एसटी महामंडळ हा शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. या दिवसात त्यांनी पगारासाठी संपाचे हत्यार उगारले तर ते नक्कीच सामान्यांसह शासनालाही परवडणारे नाही.

  
 
- अरविंद सुर्वे
 
 
@@AUTHORINFO_V1@@