मॅडम आशू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020
Total Views |


lalita desai_1  



मराठी व हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे वयाच्या ७५व्या वर्षी पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांचे सहकलाकार, मित्रवर्य श्रीप्रकाश सप्रे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
 


दि. १६ सप्टेंबरची दुपार. फोन आला, “आशू मॅडम गेल्या.” दीनानाथ हॉस्पिटल, पुणे येथे उपचार घेत असतानाच गेल्या. डोळ्यासमोर अंधारी आली. जवळजवळ ३५ वर्षांहून अधिक काळ आमचे मैत्रीचे नाते होते. सर्व चित्रपट डोळ्यांसमोर फ्लॅशबॅकसारखा येत होता. त्या मूळच्या मुंबईच्या, गिरणगावात राहायच्या. गिरगाव म्हणजे कलावंतांचे माहेरघरच. नाटकात काम करण्याची आवड, वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी अभिनय केला. तर्‍हेतर्‍हेच्या भूमिका केल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्वही सुंदर होते. सुरुवातीला ‘असा नवरा नको गं बाई’ आचार्य अत्र्यांचे ‘ब्रह्मचारी’ यामध्ये फॅशनेबल कपडे त्यांनी परिधान केले. बिनधास्त म्हणून त्या ओळखल्या जायच्या, त्या वेळेस धाडसच होते. नंतर अत्रेंचेच, ‘लग्नाची बेडी’ यामधील ‘रश्मी’पण त्यांनी गाजवली. त्याआधी अनेक अभिनेत्रींनी ‘रश्मी’ केली होती, त्यांसारखीच भूमिका वठवली. त्यामध्ये त्यांनी शॉर्ट, टी शर्ट व हातात कुत्रा अशी स्टेजवर एन्ट्री घेतली. दर प्रयोगात त्या एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. शॉर्टमध्ये स्टेजवर येणे हेसुद्धा धाडसच होते. याबरोबरच मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपटसुद्धा त्यांनी केले. भूमिका गाजवल्या. ‘कामापुरता मामा’ या चित्रपटातील ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणे त्यांच्यावरच चित्रित झाले आहे, अजूनही हिट गाणे आहे. तसेच ‘पुत्र व्हावा ऐसा’मधील ‘जेथे सागरा धरणी मिळते’ हे गाणंसुद्धा त्यांच्यावरच चित्रित झालेले आहे. अशी अनेक गाणी आहेत.
 
हिंदी चित्रपटातसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘कहानी किस्मत की’, ‘जुगनू’, ‘यादोंकी बारात’, ‘कब क्यू और कहा’ या अर्जुन हिंगोरानी दिग्दर्शित चित्रपटात धर्मेंद्र, बबिता, प्राण, आशू यांच्या भूमिका होत्या. त्यात प्राणबरोबर व्हिलनची भूमिका त्यांनी साकारली होती. त्या भूमिकेचे कौतुकही झाले होते. अनेक हिंदी चित्रपटांत त्या चमकल्या. नाटकाची घोडदौड सुरू होती. काही हिट अ‍ॅण्ड हॉट नाटकात त्यांनी कामे केली. अशावेळी ‘गुंतता हृदय हे’, ‘तुझे आहे तुजपाशी’ ‘मवाली’, ’सूर राहू दे’ ही नाटके पण जोरात चालली होती. काही दिवस एका दिवसात तीन-तीन प्रयोगसुद्धा केले. दोन प्रयोग मुंबईत व रात्रीचा प्रयोग पुण्याला दुसर्‍या नाटकाचा असायचा.त्यावेळी टॅक्सी ठेवली होती. पिंपरी-चिंचवड ओलांडले की बालगंधर्वला फोन यायचा, पहिली घंटा द्या, नंतर तिसर्‍या बेलपर्यंत किंवा नंतर त्या एन्ट्रीच्या वेळेस बरोबर यायच्या. ही गोष्ट ४०-४५ वर्षांपूर्वीची आहे. तो एक विक्रमच आहे. साधारण १९८५च्या सुमारास त्यांचा माझा परिचय झाला. त्याआधी मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झाल्या होत्या. ‘लालित्य’ नावाची मालकीची नाट्यसंस्था होती. कंपनीच्या दोन लक्झरी बसेस होत्या. अनेक दौरे केले. ‘बायको पळाली माहेरी’ या नाटकासाठी मला त्यांनी बोलावले होते. एका दौर्‍यामध्ये हिरोची अडचण आली व त्यांनी मला ती भूमिका करण्यास सांगितले. पुढे अनेक प्रयोगात मीच तो रोल करत असे. या नाटकाचे जवळजवळ १२००च्या वर प्रयोग झाले आहेत.
 
‘लालित्य’तर्फे ‘अभिलाषा’, ‘आंटी’, ‘मॅडम’ असे अनेक नाटकांचे प्रयोग केले. तसेच पोलीस कल्याण निधीसाठी नाटकांचे प्रयोग केले. मी माझ्या ‘अक्षय थिएटर’तर्फे ‘जोडी हिंदुस्थानी’ या नाटकाचे प्रयोग करण्याचे ठरवले. तीन पात्रांचे नाटक होते, एकच स्त्री कलाकाराची भूमिका होती. मी त्यांना विचारले अन् एका क्षणात मला ‘हो’ म्हटले. व्यवहाराचे काही बोलणे नाही. “तालीम कधीपासून करायची ते सांगा,” त्यांना मी भीतभीतच विचारले. व्यवहाराचे... त्या म्हणाल्या, “बघू, काही महत्त्वाचे नाही. तुम्ही करताय ना, बस..” इतके सहज सांगितले. आशूबाईंनी ती भूमिका खूपच सुंदर केली. नाच, गाणीदेखील होती. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काही वेळेस अंगात ताप असतानासुद्धा त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या व दुसर्‍या संस्थेच्या अनेक नाटकांत आम्ही एकत्र कामे केली. कलाकारांना त्या अतिशय आदरपूर्वक वागणूक देत असत. उत्कृष्ट निर्माती तर त्या होत्याच. आजपर्यंत कोणत्याही कलाकाराचे मानधन त्यांनी बाकी ठेवले नाही हे विशेष! रंगभूमीविषयी त्यांना नितांत श्रद्धा होती. अभिनयात प्रामाणिकपणा असलेली एकेकाळची ‘अभिनयसम्राज्ञी’ वयाच्या ७५व्या वर्षी कार्य काळाच्या पडद्याआड गेली आहे.
 
 
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
मराठी नाटके: लग्नाची बेडी, आंटी, मॅडम, जंगली कबूतर, गुंतता हृदय हे, मवाली, सूर राहू दे, वरचा मजला रिकामा, बायको पळाली बाहेरी, लागेबांधे, अभिलाषा. मराठी सिनेमा: आधी कळस मग पाया, कामापुरता मामा, पुत्र व्हावा ऐसा, सासरचे धोतर इत्यादी. हिंदी चित्रपट: कब क्यू और कहा, कहानी किस्मत की, यादो की बारात, जुगनू, इतनी सी बात, संतान, बंधे हात, सीता और गीता इत्यादी.
 
 

- श्रीप्रकाश सप्रे

 
@@AUTHORINFO_V1@@