अन्नाची नासाडी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020   
Total Views |


Food_1  H x W:



‘फूड अ‍ॅण्ड न्यूट्रिशियन ऑर्गनायझेशन ऑफ युएन’ या संघटनेने जगाला आवाहन केले आहे की, ‘कोविड’च्या संकटकाळात अन्नाची नासाडी करू नका, गरजूंना अन्न वितरण करा. कारण, कोरोनामुळे कामधंदे ठप्प पडले आहेत. लोकांकडे पैसे नाहीत. नवा अन्नसाठा बाजारात उपलब्ध होण्यासाठीची परिस्थितीही आशादायक नाही. अन्नाच्या नासाडीसंदर्भातही या संस्थेने जागृती केली आहे. गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने आणि या संघटनेने मिळून १९ डिसेंबर, २०१९ रोजी एक ठराव केला. त्यानुसार २९ सप्टेंबर हा दिवस अन्न नासाडी विरोधात आंतरराष्ट्रीय जागृती दिन’ म्हणून घोषित केला. अन्न नासाडीची विदारकता खालील शब्दांतून व्यक्त होते.


‘एक तृतीयांश अन्नाचे
होते नुकसान या जगात,
अन्नधान्याच्या चिंतेपासून
सर्व कसे आहेत अज्ञात.


तसे पाहायला गेले तर अन्नाची नासाडी हा विषय केवळ वैयक्तिक स्तरावरचा नसून, त्याचा संदर्भ राष्ट्रीय अर्थकारण आणि राष्ट्रीय श्रमशक्तीसोबतच आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षिततेसाठीही आहे. ‘मोर प्लॅण्ट्स, लेस वेस्ट’ या पुस्तकाचे लेखकमॅक्स ला म्हणतात की, “पृथ्वीवरच्या नऊ अब्ज लोकांना अन्नटंचाईला सामोरे जावे लागते. 28 कोटी लोकांना धड खायलाही मिळत नाही. त्यामुळे अन्नाची नासाडी हा मानव प्रजातीसमोरचा मोठा प्रश्न आहे. तयार झालेल्या अन्नपदार्थांपैकी एक तृतीयांश अन्न वाया जातं, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. अन्नाची नासाडी म्हणजे केवळ अन्न वाया जातं असं नाही, तर ती पैशाची, पाण्याची, ऊर्जेची, जमिनीची आणि वाहतुकीची नासाडी असते. अन्न टाकून देणं, हवामान बदलाला कारणीभूत ठरतं. टाकून देण्यात आलेलं अन्न जमिनीत जातं आणि तिथे सडतं. त्यातून मिथेन गॅसची निर्मिती होते आहे. सर्वसामान्य माणूसच ही परिस्थिती बदलू शकतो.”


अन्नाची नासाडी होते, याला काही घटक कारणीभूत आहेत. जसे माणूस गरजेपेक्षा जास्त अन्न घेतो आणि टाकून देतो. तसेच जास्त कच्चे अन्न साठवतो आणि त्याचा वापर न करता फेकून देतो किंवा त्या अन्नाची योग्य न काळजी घेतल्याने ते सडते. तसेच मोठमोठ्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्येही मोठ्या प्रमाणात अन्नसोहळे असतात. यामध्ये लोक गरजेपेक्षा कितीतरी पट अन्न घेतात आणि काहींची केवळ चव घेऊन सरळ कचरापेटीत टाकतात. दुसरीकडे शेतमाल पिकला की, तो साठवण्याचा योग्य पर्याय नसल्यानेही तयार शेतमाल सडतो, नाश पावतो. यात फळे आणि फुले, दूध या नाशवंत अन्नमालाचे नुकसान खूप मोठे होते. उत्पादित अन्नाच्या जवळ जवळ ४० टक्के अन्न सांडून किंवा सडून जाते. आपल्या देशात वर्षाला ५० हजार कोटी रुपयांचे अन्नधान्य फेकले जाते. कारण, ते साठवून ठेवण्याची पुरेशी व्यवस्था देशात नाही. याशिवाय दिवसाला जवळपास २० टक्के शिजवलेले अन्न अक्षरश: कचरापेटींमध्ये जाते. सरासरी काढली तर संपूर्ण इंग्लंडमध्ये दिवसाला लोकांना जेवढे अन्न लागते, तेवढेच अन्न देशात वाया जाते. देशात वर्षाला २५ कोटी टन डाळी, १५ कोटी टन फळे आणि २१ कोटी टन भाज्या वितरण प्रणालीतील त्रुटींमुळे फेकल्या जातात.


काही वर्षांपूर्वी ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाया जाणार्‍या अन्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच नागरिकांनी अन्न वाया जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचाही सल्ला दिला होता. अर्थात आपल्या देशातच अन्नाची भयंकर नासाडी होते असे काही नाही. एका अभ्यासातून काही निष्कर्ष निघाले आहेत. त्यानुसार कॅनडामध्ये वर्षाला ५८ टक्के अन्न, फ्रान्समध्ये १.३ ते १.९ कोटी टन अन्न, नेदरलँड्समध्ये ९.५ टन अन्न, युनायटेड किंगडममध्ये सहा लाख ७०० हजार टन अन्न तर अमेरिकेमध्ये १०३ कोटी टन अन्न वाया जाते. हे वाया गेलेले अन्न कुणाच्याही उपयोगी पडत नाही. जर या टाकून दिलेल्या अन्नाचे योग्य नियोजन केले, तर जगभरातल्या कुपोषित बालकांना, अन्नाशिवाय तडफडून मरणार्‍या लोकांना अन्न मिळू शकेल. गरजेइतकेच कमी अन्न विकत घेतल्याने अन्नाची किंमतही योग्य प्रमाणात राहील. जगभरात दररोज २५ हजार लोक अन्न मिळाले नाही म्हणून मृत्युमुखी पडतात. ही भीषण परिस्थिती थांबविण्यासाठी तरी अन्नाची नासाडी थांबवायलाच हवी.

 
@@AUTHORINFO_V1@@