गरजू श्रमिकांसाठी उपयुक्त अ‍ॅप्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020
Total Views |


Jobs_1  H x W:


विविध क्षेत्रातील नोकर्‍यांसाठी शेकडो संकेतस्थळे, अ‍ॅप्स यापूर्वीही कार्यरत होती. पण, आता ‘लॉकडाऊन’नंतर मोठ्या संख्येने हातचा रोजगार गमावलेल्या श्रमिकवर्गासाठी त्यांच्या गरजांनुरुप अशीच काही उपयुक्त अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्याची थोडक्यात माहिती आणि उपयुक्तता विशद करणारा हा लेख...



‘लॉकडाऊन’मुळे नोकरी गमावलेले वा कोरोना काळात अखेरचा उपाय म्हणून लाखो श्रमिक आपल्या मूळ गावी नाईलाजाने परतले. गावात त्यांना सहारा-निवारा तर मिळाला, मात्र नोकरी व सर्वस्व गमावल्यानंतर रोजगार आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला. ‘मनरेगा’पासून विभिन्न राज्य सरकारांकडून या गरजू कामगारांना आवश्यक ती मदत व रोजगार पुरविण्याचे प्रयत्नही सुरु झाले. मात्र, हे प्रयत्न पुरेसे नव्हते. तुटपुंज्या शेती उत्पन्नासह गावी राहणार्‍या व प्रदीर्घ ‘लॉकडाऊन’नंतरही या श्रमिकांची कोरोना काळातील बेरोजगारीने साथ सोडली नाही. अशा निराशाजन्य प्रसंगी गरजू श्रमिकांना रोजगाराची दिशा दाखविण्याचे नेमके व महनीय काम काही ग्रामीण रोजगार अ‍ॅप्सनी कसे केले. त्यांचीच ही यशोगाथा...


‘आंतराष्ट्रीय श्रमिक संघटना’ अर्थात ‘आयुलओ’च्या एका अभ्यासानुसार, कोरोनानंतरच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात भारतातील सुमारे ४१ लाख नागरिक बेरोजगार झाले. त्यापैकी अधिकांश गरजू कामगार ग्रामीण भागातील आहेत. मोठे प्रकल्प, महानगरे सोडून गावी गेलेल्या या श्रमिकांपुढे ‘लॉकडाऊन’च्या दोन-तीन महिन्यांनंतर पुन्हा रोजगारक्षम होणे ही एक मोठी गरज ठरली. कारण, गावातील उपलब्ध तोकड्या रोजगारांनी त्यांचे काम भागणारे नव्हते. त्यामुळे पुढे कायहा प्रश्न मात्र कायम होता. अशा कठीण व आव्हानत्मकप्रसंगी या श्रमिकांना नोकरी शोधण्याचा मार्ग दाखविला तो विविध रोजगार अ‍ॅप्सनी.
ग्रामीण, गरजू, अनुभवी आणि कौशल्यपूर्ण कामगारांसाठी रोजगार, नोकरीविषयक जी अ‍ॅप्स प्रामुख्याने कार्यरत आहेत, त्यांचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे –


Jobsagaar.com - ग्रामीण क्षेत्रातील व उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा यांसारख्या राज्यांमधील श्रमिक उमेदवारांसाठी हे अ‍ॅप असून विशेषत: या अ‍ॅपवर उमेदवारांना त्यांची माहिती हिंदी-इंग्रजी म्हणजेच ‘हिंग्लिश’ या व्यवहारी भाषेत देण्याची सुविधा असल्याने या अ‍ॅपची उपयुक्ता वाढली आहे.


Jobs.delhi.gov.in - राजधानी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गरजू श्रमिकांना दिल्ली आणि परिसरातील गरजू उमेदवारांना रोजगार संधीविषयक मार्गदर्शन या अ‍ॅपवर उपलब्ध आहे.


Labouradda.com - उत्तर प्रदेशातील रोजगार शोधणार्‍या श्रमिकांसाठी विशेषत्वाने तयार केलेले हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप व संवादशैलीसह वापरता येत असल्याने मर्यादित शिक्षण झालेल्या उमेदवारांनाही त्याचा लाभ घेता येईल. हा या व्यवस्थेचा मोठाच फायदा आहे.


Apna - मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू यांसारख्या महानगरातील नोकरी-रोजगार सोडून आपल्या गावी परतलेल्या श्रमिकांना कुठे, केव्हा आणि कशाप्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत अथवा उपलब्ध होणार आहेत, त्याची माहिती देऊन त्यानुसार त्यांना या अ‍ॅपवर मार्गदर्शन केले जाते, हे विशेष.


Pravasi Rojagar - राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या या अ‍ॅपद्वारे कामगारांना कोरोना काळात नवे कौशल्य प्रदान करुन त्यांची नोकरी-रोजगारविषयक उपयुक्तता वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विविध प्रांतांमधील गरजू कामगार ‘प्रवासी रोजगार’चा लाभ घेत आहेत.


Kaam Wapsi - हे अ‍ॅप विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड यांसारख्या राज्यातील श्रमिकांसाठी कार्यरत आहे. या अ‍ॅपवर संबंधित उमेदवाराच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वरील उपलब्ध माहितीच्या आधारे त्याला नोकरीसाठी अधिक चांगल्याप्रकारे अर्ज कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले जाते.


Nokari - देशातील विविध महानगरांमध्ये उपलब्ध रोजगारांची माहिती या अ‍ॅपवर संकलित-एकत्रित केली जाते. त्यानुसार संबंधित उमेदवार आपली पात्रता- कौशल्य व अनुभवाच्या आधारे पात्रताधारक उमेदवार कोरोना नंतरच्या रोजगार संधी शोधू शकतात.


या नोकरी-रोजगारसंबंधित अ‍ॅप्सची अन्य प्रमुख वैशिष्ट्यं सांगायची म्हणजे, ‘अपना’ अ‍ॅपचे उद्दिष्ट कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे आहे. ‘अपना’ अ‍ॅपचे संस्थापक निर्मित परिख यांच्या मते, कौशल्य काम करणार्‍या कामगारांना ते वर्षानुवर्षे करीत असलेल्या कामाची संपूर्ण माहिती असते. मात्र, ते त्यांचे कौशल्य आणि पात्रता याची योग्य शब्दांत मांडणी करु शकत नाहीत. नेमके हेच हेरुन ‘अपना’ अ‍ॅपने कोरोना काळानंतर अनेक वर्षांनी नोकरीसाठी आवश्यक असणारा अर्ज कसा लिहावा, हा उपक्रम हाती घेतला व त्याला चांगला प्रतिसादही लाभला.


यासंदर्भातील आकडेवारीसह सांगायचे म्हणजे, फेब्रुवारी २०२० पासून म्हणजेच नव्याने कार्यरत झालेल्या ‘अपना’ अ‍ॅपवर १५ लाख उमेदवारांनी नोकरी-रोजगारासाठी नोंदणी केली असून त्यातील सुमारे 12 लाख उमेदवारांना मुलाखतीची संधी पहिल्या सहा महिन्यांत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतरच्या टप्प्यात ‘अपना’ अ‍ॅपवर मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरुसह श्रमिकांसाठी उपलब्ध असणार्‍या सुमारे एक लाख जागांची नोंदणी उपलब्ध आहे. ‘लिंक्डईन’च्या धर्तीवर काम करणार्‍या ‘अपना’ अ‍ॅपचे हे मोठेच यश ठरले आहे.


‘जॉबसागर’ हे अ‍ॅप पण फेब्रुवारीमध्येच सुरु झाले. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे, या अ‍ॅपद्वारे कामाच्या म्हणजेच उपलब्ध रोजगार संधीच्या ठिकाणी पात्रताधारक उमेदवारांचा थेट संपर्क करुन दिला जातो. यासाठी उमेदवाराच्या निवासापासून सुमारे १०० किलोमीटर परिसरातील नोकरी संधींचा त्या-त्या क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्रामुख्याने विचार केला जातो. या संदर्भात ‘जॉबसागर’चे संस्थापक अतुल प्रताप सिंह यांच्या मते, ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यानंतर मुंबई, पुणे, सुरत, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या महानगरांतील श्रमिकांनी गावची वाट धरली. मात्र, दीर्घकालीन ‘लॉकडाऊन’ व कोरोनाचा वाढता प्रकोप यामुळे नोकरी-रोजगारासाठी पुन्हा परतताना या मजुरांनी मोठ्या महानगरांत जाण्यापेक्षा प्रगत औद्योगिक पट्ट्यातील शहरी रोजगाराला प्राधान्य दिले. श्रमिकांच्या या अपेक्षा ‘जॉबसागर’च्या माध्यमातून पूर्ण झाल्याच, शिवाय हिंदी-इंग्रजीतून तयार झालेल्या व प्रचलित ‘हिंग्लिश’चा वापर केल्याने ‘जॉबसागर’ची उपयुक्तता अल्पावधीतच वाढली.
‘प्रवासी रोजगार’ अ‍ॅपच्या माध्यमातून साध्य झालेली विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे, तयार कपडे व्यवसायात असणार्‍या ‘ट्रायडँट’ या कंपनीचे ‘लॉकडाऊन’ काळात पंजाब व मध्य प्रदेशातील सुमारे 200 बेरोजगार कामगारांना रोजगार मिळवून दिला. या अ‍ॅपमुळे कंपनीला गरजू व पात्रताधारक उमेदवारांशी थेट संपर्क साधता आला व त्यामुळे उमेदवारांतून योग्य कर्मचार्‍यांची निवड कंपनीला अल्पावधीत करता आली, हे विशेष.


‘लॉकडाऊन’नंतरच्या काळात श्रमिकांना रोजगार मिळण्याच्या प्रमाणात सुमारे आठ ते दहा टक्के वाढ झाल्याचे ‘टीमलीज’च्या रोजगार सर्वेक्षणात दिसून आले आहे. सप्टेंबरपासून कामगारांना रोजगार संधी अधिक प्रमाणात मिळतील व त्याचा फायदा उद्योग-व्यवसाय व कामगार या उभयंतांना होईल, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.


सोनू सूद या अभिनेत्याचे नाव आणि काम गाजले ते ‘लॉकडाऊन’नंतर मुंबई आणि महानगर परिसरातील गरीब आणि गरजूंना आधार देऊन त्यांना त्यांच्या मूळगावी प्रवास करण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणून. आता ‘लॉकडाऊन’नंतरच्या काळातही सोनू सूदचे या श्रमिकांसाठीचे प्रयत्न सुरुच आहेत. अर्थात, यामध्ये झालेला बदल म्हणजे सोनू सूद या श्रमिकांना नोकरी-रोजगार अ‍ॅपचा अधिकाधिक वापर करुन नोकरी-रोजगार शोधण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. अशा या ‘कल्पक’ अ‍ॅप्समुळेच हे शक्य झाले.

- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर- व्यवस्थापन सल्लागार आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@