‘एकात्म मानवतावादा’चे वैश्विक चिंतन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020   
Total Views |


Din Dayal Upadhyay_1 


आज २५ सप्टेंबर, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. त्यानिमित्ताने ‘एकात्म मानवतावादा’ चे वैश्विक चिंतन पाहूया...


इंग्रजाचे परकीय राज्य गेले. मात्र, ते गेल्यावरही त्यांचे अंधानुकरण करणे हीसुद्धा एक गुलामीच. त्यांचे अंगभूत संस्कार-संस्कृती त्यांच्या भौगोलिक आणि इतर परिस्थितीनुसार आहे. त्यांची तशी भौगोलिकता आणि इतर परिस्थिती आपल्याकडे नाही. मग आपल्याकडील परिस्थितीतून आलेली संस्कृती आणि संस्कार यातूनच आपण प्रगती करायला हवी. याच विचारातूंनच पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी १९६५ साली ‘एकात्म मानवतावादा’ची संकल्पना मांडली. त्याकाळी जगभरात भांडवलवाद किंवा कम्युनिस्टवादाचा प्रभाव होता. मात्र, या दोन्ही संकल्पना भारतीय मातीतल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही संकल्पनांवर भारतीय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था आधारित असू नये, तर अस्सल भारतीय संस्कृती आणि विचारप्रणालीवर भारताचे आणि जगाचेही उत्थान व्हावे, यासाठीच पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानवतावाद’ संकल्प मांडला. आज २५ सप्टेंबर, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. त्यानिमित्ताने ‘एकात्म मानवतावादा’ चे वैश्विक चिंतन पाहूया.
 

मानवतावादावर जगभरात अनेक सिद्धांताचा जन्म झाला. प्रत्येक सिद्धांत माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या मर्यादा दाखवतो. पाश्चात्त्यांचा भांडवलवाद असो की, समाजवाद असो की कम्युनिस्टवाद असो, या सगळ्या वादांनी माणसामध्ये काही ना काही कारण आणि भेद शोधून वादच निर्माण केले. भांडवलवादामध्ये कुणीतरी एक मालक आणि बाकी त्याचे आश्रित, तर कम्युनिस्टवादामध्ये उघड उघड वर्ग संघर्षांची चिथावणी; नव्हे ‘उलथून टाका आणि विनाश करा’ची द्वेषबीजेच! थोडक्यात, बहुतेक मान्यताप्राप्त मानवतावाद हे माणसाला व्यक्तिकेंद्रित करून त्या त्या आर्थिक, सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीशीही संघर्ष किंवा विन्मुख होण्याच्या गोष्टी करतात. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावादमात्र संघर्ष नव्हे, तर समन्वयाची प्रेरणा देतो. विभिन्नतेतून एकतेचा मंत्र देतो.
 


‘एकात्म मानवतावादा’वर टीका करताना काही लोकांचे म्हणणे आहे की, संघर्ष हा माणसाचा स्थायी भाव आहे. संघर्षानेच माणूस यश मिळवतो. हवे ते मिळवतो. इतिहासही संघर्षावर आधारित आहे. हे लोक असेही म्हणतात की, भारतात तर जातीय संघर्ष आणि त्याद्वारे होणारे इतर संघर्ष अंगभूतच आहेत आणि अटळ आहेत. यावर पं. दीनदयाळजींनी फार पूर्वीच एक विधान केले आहे की, “ज्याच्या हाती लाठी, त्याची म्हैस किंवा बलवानच सर्व सुखसंपत्तीवर ताबा मिळवतील, ही धारणा नष्ट करण्यासाठीच तर जगभरात मानवी सभ्यता उदयास आली. या सभ्यतेमध्ये संघर्ष नव्हे, तर सगळ्या जणांनी गुण्यागोविंदाने जगावे हे अंतर्भूत आहे.” पं. दीनदयाळजी असे म्हणतात, कारण संघर्षामध्ये एकाचा विजय, तर दुसर्‍याचा पराजय होतोच. मग पराजित व्यक्तीचे पुढे काय? की पुन्हा विजयी झालेल्या व्यक्तीला पराजित करण्यासाठी पराजित व्यक्तीचा संघर्ष. यात माणसाचे आंतरिक समाधान जगणे कुठे असेल? त्यापेक्षा संघर्ष टाळून समन्वयाची भूमिका घ्यावी. ‘एकात्म मानवतावाद’ सर्वच काळात सर्वच स्तरांत परस्पर संघर्ष टाळत परस्पर समनव्य शिकवतो. निसर्गही परस्पर समन्वय सहकार्यावरच अवलंबून आहे, हे सांगताना दीनदयाळजी म्हणतात, “पर्यावरणामध्ये सर्वच घटकांचा एकमेकांशी समन्वय आणि परस्परावलंबन आहे. माणूस श्वासोच्छवास करताना कार्बनडायॉक्साईड बाहेर टाकतो तर वनस्पती ऑक्सिजन.
 
 
काही लोकांचे म्हणणे की, ‘एकात्मता’ आणि ‘समानता’ यामध्ये काय फरक आहे? समानता आली की माणसातील संघर्ष संपेलच की. मग ही समानता आधीची फे्रंच राज्यक्रांती ते रशियन राज्यक्रांतीने सांगितली आहे. त्यात ‘एकात्म मानवतावादा’चे नावीन्य काय किंवा गरज काय? तर पं. दीनदयाळ म्हणतात की, “समानता कशामध्ये? कसली? कितीही समानता आणली तरी दोन सख्ख्या भावांमध्येही १०० टक्के समानता आणता येणार नाही. मात्र, त्या दोघामंध्ये जेव्हा एकात्मता निर्माण होते, आपण दोघे एकच शक्तीचे वारसदार आहोत, ही जागृती असते, त्यावेळी त्यांच्यामध्ये जी मानसिक, आत्मिक एकता निर्माण होईल, ती सर्वच समानतेला पूरक असेल.” काही लोकांचे म्हणणे असते की, जगात भाराभर आदर्शवादाच्या संकल्पना आहेत. त्यापैकीच एक ही एकात्म मानवतावाद’ का? तर तसेही नाही. कारण, इतर संकल्पना माणसाला आदर्श देतात, पण त्या आदर्श सिद्धांतावर मार्गक्रमण करण्याचा मार्ग सांगत नाहीत. एकात्म मानवतावादामध्ये आदर्श सिद्धांत आणि माणसाचे जगणे या दोघांच्याही परिक्रमा एका वर्तुळात येतील, अशी बांधणी केली आहे. माणसाला काय हवे, याबाबतही दीनदयाळजींचे विवेचन उद्बोधक आहे. ते म्हणतात, “कम्युनिस्टांचा विचार आहे की, माणसाला अन्न-वस्त्र-निवारा हवा. प्रत्येक माणसाला तो मिळाला की झाला माणूस सुखी. पण, असे मानणार्‍या व्यक्तीलाच जर दररोज सुग्रास अन्न दिले, चांगले कपडे दिले आणि आलिशान घरही दिले, मात्र दररोज त्याला तुला दोन थप्पड दिले तर मग चालेल का?” अर्थात, त्या कम्युनिस्ट मित्रालाच काय, कुणालाही हे चालणार नाही. कारण, मानवी जगणे या सगळ्यापलीकडे व्यवहार करते. पं. दीनदयाळ म्हणतात, “भाकरीसाठीचा किंवा संपन्न भौतिकतेचा संघर्ष हा भारतीय जीवनशैलीचे चिंतन नाही. कारण, भारतात आजही भाकरी खायला मिळत नाही किंवा अमुकच गोष्ट घरात नाही म्हणून दु:खी आहेत, असे लोक अभावानेच दिसतात. सुख मानण्यावर आहे. ते मानणे परिस्थितीजन्य आहे.


 
पं. दीनदयाळजींचे हे म्हणणे आजच्या युगात तंतोतंत जुळते. सर्वकाही असूनही कायमच नैराश्यात किंवा समस्यांमध्ये गुंतलेले अनेकजण आपण पाहतो. सुख म्हणजे काय? पं. दीनदयाळ उपाध्याय त्यांच्या ‘एकात्म मानवातावाद’मध्ये म्हणतात, “माणसाच्या जीवनाची परिपूर्ती कशात आहे? माणसाच्या जीवनाचे मापन करताना नुसते शारीरिक सुख अपेक्षित नाही, तर त्याचसोबत मनाचे सुख, बुद्धीचे सुख आणि सर्वात शेवटी आत्म्याचे सुख आवश्यक आहे. या सर्व सुखांचे परस्परबंधच माणसाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. यापैकी एकही सुख नसेल, तर माणसाचे जीवन परिपूर्ण आहे, असे म्हणू शकत नाही.आज त्यांच्या या विचारांची आठवण होते. सध्या बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन संदर्भातल्या बातम्या चर्चेत आहेत. प्रसिद्ध अभिनेते, नेते वा त्यांचे वारसदार ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. हे सगळे पाहून वाटले, काय कमी आहे यांना? सौंदर्य, संपत्ती, लोकप्रियता यांच्यापुढे हात जोडून उभी आहे, आणखी काय हवे होते? या सगळ्याचे उत्तर काय? तर ‘एकात्म मानवतावादा’मध्ये सुखाच्या चार चक्रांपैकी शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याच्या सुखाचा अभाव हेच कारण आढळते. आज अमेरिका किंवा युरोपमध्ये श्वेत-कृष्ण वर्णसंघर्षाचा वणवा पेटला आहे. आर्थिक आणि त्यामुळे भौतिक संपन्नतेच्या कळसांवर असणार्‍या या देशांमध्ये माणूस माणसाच्या रंगावरून अत्याचाराचा बळी ठरतो. का? याचे उत्तरही ‘एकात्म मानवतावादा’चे चिंतन करताना मिळते. कारण, इथे सांस्कृतिक संपन्नतेला टाळून आर्थिक संपन्नतेला स्वीकारले आहे. सांस्कृतिक म्हणजे काय, तर माणसाला माणूस म्हणून जगू देणारी, त्याची प्रगती करणारी परिस्थिती.


 
पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा मानवतावाद हा व्यक्ती, व्यक्तिसंबधांतून कुटुंब, कुटुंब संबंधातून समाज, समाज संबंधातून राष्ट्र आणि राष्ट्र संबंधांतून ‘विश्व’ या संकल्पनेवर आधारित आहे. आज संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्य किंवा विचारही ‘एकात्म मानवतावदा’च्या याच भूमिकेवर आधारित आहेत, असे वाटल्याशिवाय राहत नाही. पं. दीनदयाळ भारतीय संस्कृतीला अनुसरून विश्वाला आशादायक असणारा ‘एकात्म मानवतावाद’ मांडतात. मात्र, संस्कृतीचा सन्मान करताना दीनदयाळजी स्पष्ट म्हणतात की, “आपण संस्कृतीचे रक्षक नाही, तर संस्कृतीला सध्याच्या जगण्यात गतिमान करणारे व्हायला हवे. कारण, संस्कृती गतिमान, प्रवाहित राहिली तरच ती टिकेल.” संस्कृतीचा विषय निघालाच आहे, तर आणखी एका बाबतीत बहुतेकांना प्रश्न पडतो की, जुने ते सोने मानावे की, नव्याची झळाळी स्वीकारावी. पं. दीनदयाळजी याबाबत ‘एकात्म मानवतावादा’मध्ये सांगतात, “जुने कालबाह्य झाले तरी कवटाळून बसू नये, तर आजच्या परिक्षेपात जुन्या मूल्यांची धारणा कशी करता येईल, त्याचा विचार व्हावा. धर्म म्हणजे धारण करणे, ती धारणशीलता त्या त्या काळात माणसाच्या जगण्याशी निगडित होती. कालचक्र पुढे सरकत असताना धारणा बदलत जाते. तो बदल त्या त्या काळातल्या माणसाच्या कल्याणकारी जगण्यासंदर्भातला असतो. त्यामुळे नवा चांगला बदल टाळू नये, तर जुने आणि नवे दोन्ही चांगल्यामध्ये समन्वय साधावा.”

 
भारतीय समाजाबाबत बोलताना तिच्या विशिष्ट जडणघडणीबाबत अनेकदा बोलले जाते. पं. दीनदयाळ म्हणतात, “एखादी व्यवस्था निर्माण का होते? तर त्या काळाचे तिचे काही गणित असते. जोपर्यंत ती व्यवस्था चांगल्या व्यक्तीकडे असते, तोपर्यंत ती चांगलीच असते, पण ती व्यवस्था वाईट व्यक्तीकडे गेली, तर ती वाईट होणार. याचा अर्थ ती व्यवस्था वाईट नसते, तर ती चालवणारी व्यक्ती वाईट असते.दीनदयाळजींचे हे विचार आज अगदी तंतोतंत लागू होतात. याच अनुषंगाने जातीयवादावर ते बोलतात की, जातीयवादाची प्रथा कशी आणि कोणी निर्माण केली, हा मुद्दा जरी असला तरी जातीयवाद नष्ट कसा होईल, याकडे आपला अग्र दृष्टिकोन असायला हवा. कारण, एकात्म समाजात कुणीही उच्च-नीच नाही. सर्वजण समरस आत्मियतेने जोडलेले आहेत. आज ‘आझादी आझादी’ म्हणत राष्ट्राला तोडू पाहणारे काही विध्वसंक आपण पाहतो. काही दशकांपूर्वीच दीनदयाळजी म्हणतात की, “राष्ट्रीयत्वाच्या ओळखीशिवाय स्वतंत्रता व्यर्थ आहे.


 
भांडवलवाद किंवा कम्युनिस्टवादाला विरोध म्हणून नाही, तर स्वतंत्र सक्षम पर्याय म्हणून ‘एकात्म मानवतावाद’ चिरंतन शाश्वत मानवी मूल्यांची गाथा गातो. सामाजिकतेसोबतच आर्थिकतेवरही ‘एकात्म मानवातवादा’मध्ये चिंतन आहे. स्वदेशी आर्थिकता असावी, असे यात मांडले गेले आहे. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा मार्ग या मानवतावादामध्ये आहेे. स्वदेशी म्हणजे स्वेदशी मानव संसाधन, प्रकृती संसाधन, प्रतिभा संसाधन, उत्पादन आणि उपभोक्ताही स्वदेशीच होय. असे का, तर कितीही स्वदेशी उत्पादने तयार केली, मात्र त्याचा उपभोग स्वदेशी जनतेलाच घेता आला नाही, तर उपयोग काय? श्रीकृष्णाने मथुरेच्या बाजारी जाणार्‍या गोपिकांना अडवून दही-दूध स्थानिक गोपाळांना वाटले. का? कारण जो बनवतो, जो पिकवतो तोच त्याचा उपभोग घेऊ शकत नसेल, तर उपयोग काय त्या संपन्नतेचा? आर्थिक विकेंद्रीकरणावर भर देत अंत्योदयाची संकल्पना मांडणारा असा हा ‘एकात्म मानवतावाद.’ कोरोनाच्या आपत्तीमध्ये विश्वाला निराशा आणि निराशेसोबतच सर्वच नकारात्मक परिणामाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय जगण्याला परिपूर्ण बनवेल असा अस्सल भारतीय सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा असलेला दृष्टिकोन म्हणजे ‘एकात्म मानवतावाद’ आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्म मानवातावाद’च आज जगाला प्रेरक आहे, तो जगाला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतो. नाहीतरी पं. दीनदयाळ उपाध्याय म्हणतातच की, “विश्वाला भार होण्यापेक्षा आमच्या समृद्ध संस्कृतीचा आध्यात्मिक वारसा घेऊन आपण विश्वाच्या प्रगतीसाठी एकात्मतेसाठी योगदान द्यायला हवे...

 
@@AUTHORINFO_V1@@