'...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करणार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2020
Total Views |

amey khopkar_1  
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे 'आई माझी काळूबाई'च्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने निधन झाले. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी मालिकांचे चित्रीकरण सुरू असून टीममधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान मनसेने मालिकांचे निर्माते आणि सर्व मनोरंजन वाहिन्यांच्या संचालकांना इशारा दिला आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही त्यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की," टीव्ही मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह २७ जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र तरीही मालिकेचे चित्रीकरण सुरुच राहिले आणि त्याचाच परिणाम म्हणून ८३ वर्षीय आशालता यांचे निधन झाले. राज्यातील लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने मालिका तसेच सिनेमांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद होते. मनोरंजन सृष्टीतील अनेक नामवंतांनी चित्रीकरणास सशर्त परवानगी मिळावी अशी मागणी वारंवार केल्यामुळे अखेर राज्य सरकारने कोविड प्रोटोकॉलचे पालन करून शूटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती.



दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच, मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकालचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसंच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायलाच हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल." असे अमेय खोपकर यांनी पत्रात म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@