ही मुंबईच तुम्हाला बुडवेल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2020   
Total Views |

Mumbai Rains_1  

 


मुंबईची एका रात्रीच्या पावसात ‘तुंबई’ का होते, याची कारणं एव्हाना मुंबईकरांनीही अगदी तोंडपाठ झालेली. त्यामुळे एक-दोन तासांहून अधिक वेळ मुसळधार पाऊस कोसळायला लागला की, आपसुकच मुंबईकरांच्या छातीत धस्स व्हायचे. पण, हे इतके अंगवळणी पडले की आता त्याचेही अप्रुप नाहीच. ‘नेमेचि येतो पावसाळा आणि नेमेचि बुडते मुंबई’ अशी स्थिती. मुर्दाड मुंबई पालिका प्रशासनाच्या इतक्या वर्षांच्या गैरकारभारानंतर आता पावसाळ्यात मुंबई दोनदा-तीनदा तरी जलमय होणार, हे जणू विधिलिखित सत्यच मुंबईकरांनी मुकाट्याने स्वीकारलेले. नवीन पम्पिंग स्टेशन्स झालीत, प्लास्टिकबंदीही आली, नालेसफाई, रुंदीकरण, अनधिकृत बांधकाम हटविणे सगळे सगळे उपाय पालिकेच्या म्हणण्यानुसार झाले, तरी या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. मग दोष माथी मारायचा तो नऊ किमी उंचीच्या ढगांपासून ते अंदाधुंद बरसणार्‍या पावसावर आणि आपल्या प्रयत्नांना निसर्गाची साथ नाही, म्हणून खडे फोडायचे, हाच वार्षिक कार्यक्रम. अशा या सत्ताधार्‍यांनी स्वत:इतकेच मुंबईच्या पावसालाही देशात बदनाम करुन टाकले. पण, खरं सांगायचं तर मुंबईला बुडवणारा हा पाऊस नाहीच. या मुंबईला वारंवार बुडवले ते पालिकेतील सत्ताधार्‍यांनी. नियोजनशून्य कारभार आणि भ्रष्टाचाराची खोलवर पसरलेली कीड, यामुळे मुंबईचे 30 हजार कोटींहून अधिकचे बजेट असूनही त्याचा उपयोग मात्र शून्यच. जे पैसे खर्ची घातले तेही तात्पुरत्या उपाययोजनांवर, पण सत्ताधार्‍यांनी या समस्येवर कधीही कायमस्वरुपी उपाय का योजले नाहीत? देशविदेशातील तज्ज्ञांना सोबत घेऊन ही वेळ मुंबईवर दरवर्षी का ओढवते, नेमकी समस्या तरी काय, हे सत्ताधार्‍यांनी जाणून घेण्याचा किमान प्रयत्न तरी केला का? मुंबई बुडणार नाही म्हणून जे जे उपाय केले, त्याचा आजवर फायदा झाला का, याचा आढावा घेतला का? तर नाही. म्हणूनच मुंबई जलमय होऊन ठप्प होणे हा निसर्गाचा प्रकोप नाही, तर सत्ताधार्‍यांचा निकोप कारभारच याला सर्वस्वी जबाबदार आहे. दरवर्षी मुंबईला पुरात बुडवून पुन्हा वर काढण्याचा हा खेळ तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत पालिकेत सुशासन स्थापित होत नाही. तेव्हा, ज्यांनी आजवर मुंबईला वारंवार बुडवले, त्यांनाच जोपर्यंत मुंबईकर मतपेटीतून नाकारत बुडवत नाहीत, तोपर्यंत मुंबईची ‘तुंबई’ ही ओळख पुसली जाणार नाही.
 

‘जीवनवाहिनी’ ते ‘शवदाहिनी’


 
मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत करण्याबाबत सध्या दोन गट पडलेले दिसतात. एका गटानुसार ही लोकल लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुली करावी आणि दुसरा गट अजूनही याबाबत साशंकच आहे. नुकतेच मनसेनेही लोकल सुरु करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन झेडले, तर भाजपचे खासदार मनोज कोटक यांनीही लोकसभेत तशी मागणी केली. लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे चाकरमान्यांना किती त्रास सहन करावा लागतोय, त्यासंबंधीच्या बातम्या, व्हिडिओ आणि प्रवाशांचा उद्रेकही आपण गेल्या काही काळात बघितला. लोकलअभावी केवळ प्रवासाचा कालावधीच वाढला नाही, तर प्रवासखर्चातही भर पडली. अशात केवळ नोकरी टिकावी म्हणून हजारो चाकरमानी सात-आठ तास प्रवासात खर्ची घालताना दिसतात. एसटी, ‘बेस्ट’ने होणारा प्रवासही तसा सुरक्षित नाहीच. पण, म्हणून सरकारने लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवासाला परवानगी द्यावी, हा निकष लावणे सर्वथा चुकीचे ठरेल. लोकलमधील प्रवास आणि गर्दीच्या महापुराविषयी वेगळे सांगायला नकोच. त्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करुन लोकलप्रवास करणे हे अशक्यप्राय. मास्क वापरला तरी एकमेकांना खेटून, रेलून उभे असल्यावर सहप्रवाशांचा स्पर्श हा आपसुकच होणार. त्यात एवढ्या गर्दीत जेव्हा एरवीही श्वास गुदमरतो, तिथे मास्क लावल्यावर काय होईल? या सगळ्यांवरुन प्रवाशांमध्ये उद्भवणारे वादविवाद, खटके यांची डोकेदुखी ठरेल ती वेगळीच. शिवाय लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु केल्यास अनावश्यक प्रवास करणारे, कामाविना फिरणार्‍यांच्या संख्येवर निर्बंध लादणे प्रशासनाच्या आटोक्याबाहेरचे आहे. त्यात नवरात्री, दिवाळी यांसारख्या सणवारांना लोकल सुरु झाली म्हणून प्रवास करणार्‍यांची, खरेदीला गर्दी करणार्‍यांच्या संख्येतही एकाएकी भर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक गंभीर रुप धारण करु शकतो. तेव्हा, या महामारीचे मूळ स्वरुप लक्षात घेता, लोकल सुरु करण्याचा निर्णय म्हणजे जीवतंपणीच विषाची परीक्षा घेणारा ठरु शकतो. तेव्हा ‘जीवनवाहिनी’ सुरु करुन हा प्रवास ‘शवदाहिनी’पर्यंत नेण्यापेक्षा, सरकारने एसटी, ‘बेस्ट’च्या संख्येत अधिकच्या क्षमतेने वाढ करावीच, तसेच शक्य तितक्या खासगी कंपन्यांनीही ‘वर्क फ्रॉम होमलाच आणखीन काही काळ प्राधान्य देऊन कर्मचार्‍यांच्या जीवाचे मोल ओळखावे, हीच अपेक्षा.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@