असा असावा विश्वनेता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2020
Total Views |


Leader_1  H x W



आता उत्तम नेता बनण्याकरिता वेदमंत्र कोणकोणते उपयुक्त उपाय सुचवितो, ते आपण पाहू. सर्वात अगोदर म्हटले आहे, ‘यत्रा नियुद्भि सचसे शिवाभि:।ज्याच्यामध्ये कल्याणकारक नीतितत्त्वे असतील, तो नेता बनू शकतो. नेतृत्व असेल तर त्या व्यक्तीने सर्वप्रथम आपले आचरण शुद्ध ठेवावयास हवे. तो नैतिक दृष्टीने प्रगत असावा. कारण, चारित्र्यसंपन्न नेता हाच आपल्या जनतेला सदाचार शिकवू शकतो. त्यामुळे शीलयुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते.


भुवो यज्ञस्य रजसश्च नेता यत्र नियुद्भि: सचसे शिवाभि:।
दिवि मूर्धानं दधिषे स्वर्षां जिह्वामग्ने चकृषे हव्यवाहम्॥


(यजुर्वेद-१५/२३)


अन्वयार्थ


हे राजा ! तू (यज्ञस्य) विश्व, राष्ट्ररूपी यज्ञाचा (च) आणि (रजस:) जगाचा (नेता) नेता, पुढारी (भुव:) हो, (यत्र) जिथे की तू (शिवाभि:) कल्याणकारी (नियुद्भि:) नीतितत्त्वांशी, विचारांशी (सचसे) जोडला जाशील! तसेच तू (मूर्धानम्) मस्तकाला (दिवि) द्युलोकात, प्रकाशात (दधिषे) धारण करशील. त्याचबरोबर तू (स्वर्षाम्) उत्तम गती असणार्‍या, मधुर (जिह्वाम्) जिभेला (हव्यवाहम्) भोगसामग्रीने प्राप्त करणारी (चकृषे) बनवशील!

विवेचन


खरोखरच तो देश भाग्यशाली समजला जातो, ज्याला की नेतेमंडळी चांगली लाभतात; अन्यथा सुयोग्य नेत्यांच्या अभावी तो देश व तेथील समाज दिशाहीन बनतो. खरेतर कर्तृत्वसंपन्न माणसांतून नेतृत्व उदयास येत असते. प्रजेची काळजी वाहण्यात ज्याचा प्रत्येक श्वास आणि सततचा ध्यास हा त्या व्यक्तीस आपोआप नेता बनण्यास प्रवृत्त करतो. जनता जनार्दनाची सेवा हाच एकमेव उद्देश नेत्यांकडे असावयास हवा. नेता म्हणजेच राजा हा परमेश्वराचा प्रतिनिधी असतो. ‘राजृ’ या दीप्त्यर्थक धातूपासून ‘राजा’ हा शब्द तयार होतो. ज्याच्यामध्ये दीप्ती म्हणजेच कांती व प्रकाशगुणांचा अंतर्भाव असतो, तो ‘राजा’ होय. म्हणूनच ‘राजा प्रकृति रंजनात्।अर्थात जो प्रकृती म्हणजेच प्रजेचे रंजन करतो, सर्वांना नेहमी सुखी, आनंदी व प्रसन्न ठेवतो तो ‘राजा’ होय. यासाठी राजा हाच त्या देशाच्या प्रगतीचे मूळ कारण असतो. त्याच्यामध्ये काळालाही बदलण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच शास्त्रात ‘राजा कालस्य कारणम्।’ असे म्हटले आहे. आपल्या देशात पूर्वीचे रघू, दिलीप, दशरथ, राम यासारखे रघुवंशीय राजे प्रजेच्या कल्याणासाठीच आपल्या राज्यसत्तेचा उपयोग करीत असत. एक आदर्श व उत्तम राजाच आपल्या नेतृत्वगुणांमुळे प्रजेला सुखी ठेवू शकतो. पण, वाईट व स्वार्थी राजा किंवा नेता मात्र जनतेला दु:खाच्या खाईत लोटून देतो. ‘नेता’ शब्दाचे निर्वचन ‘नयति इति नेता।असे होते. म्हणजेच जो प्रजाजनांना नेहमीच प्रगतीच्या दिशेने (पुढे) नेतो, तो ‘नेता’ होय. तसेच जो नीतीने परिपूर्ण असतो तो देखील ‘नेता’ होय.


सदरील मंत्रात समग्र विश्वाचा नेता किंवा राजा हा एकच असावा. अनेक राजे कदापि नको, असा संकेत मिळतो. तसेच त्याची पात्रता कोणती असावी, यासंदर्भात विवेचन केले आहे. खरेतर यज्ञाचे विविध अर्थ आहेत. सृष्टीमध्ये अनादी काळापासून पवित्र यज्ञ कार्य सुरु आहे. समग्र विश्व किंवा राष्ट्ररूप यज्ञाचा संचालक कोण, तर राजा! पूर्वीच्या काळी सारे भूमंडळ हे एकच राष्ट्र होते व या सर्वांचा राजादेखील एकच होता. अगदी महाभारतापर्यंत आपला समग्र विश्वावर एकछत्री अमल होता. एकाच राजाच्या अधिपत्याखाली सार्‍या जगाचे मांडलिक राजे व प्रजा अगदी सुखा-समाधानाने राहत असत. याचा उल्लेख करताना थोर वेदज्ञ महर्षी दयानंद आपल्या ‘सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथात म्हणतात, “सृष्टीच्या प्रारंभापासून ते अगदी पाच हजार वर्षांपूर्वींच्या महाभारत काळापर्यंत आर्यजनांचे समग्र भूमंडळावर सार्वभौम चक्रवर्ती राज्य होते. इतर छोटे-छोटे देश व त्यांचे राजे आपल्याच राज्यव्यवस्थेत चालत होते. चीनचा राजा भगदत्त, अमेरिकेचा बब्रुवाहन, युरोपचा विडालाक्ष, इराणचा शल्य इत्यादी सर्व राजे हे महाराजा युधिष्ठिराच्या राजसुय यज्ञात व महाभारत युद्धात सहभागी झाले होते... थोडक्यात, स्वयंभूव राजापासून ते पांडवांपर्यंत आर्य राजांचे चक्रवर्ती राज्य होते.यावरून आपल्याला लक्षात येते की, वेदमंत्रानुसार सार्‍या जगाचा एकच आदर्श राजा असला पाहिजे. याचप्रमाणे म्हणजेच वरील मंत्रांश होय.


नेत्यांनी कोणकोणत्या गुणांना धारण करावे, जेणेकरून तो जनतेमध्ये प्रिय होईल, यासंदर्भात पुढील मंत्रांशात उत्तम विवेचन केले आहे. खरेतर सद्यस्थितीत शासकीय पद असो की अशासकीय नोकर्‍या, या सर्वांकरिता शैक्षणिक पात्रता व आचारप्रणाली लागू करण्यात आलेली असते. नियुक्त झालेल्या अधिकार्‍यांसाठी काही दिवसांची प्रशिक्षण शिबिरे पण आयोजित केली जातात. पण, राजकारणात प्रवेश करू इच्छिणार्‍यांसाठी मात्र कोणत्याही प्रकारची पात्रता किंवा गुणवत्ता, मग ती शैक्षणिक असो की सच्चारित्र्याची, अजिबात ठेवली जात नाही. म्हणूनच आपण कधी-कधी उपहासाने म्हणतो, “ज्याला काहीच करता येत नाही, त्याने सरळ राजकारणात जावे...!” स्वातंत्र्यानंतर अलीकडील काळात असेच काही विचित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी प्रचंड पैसा, गुंड प्रवृत्ती, जात, धर्म (पंथ) आणि परंपरागत राजकारणी घराणे या गोष्टीच नेता बनण्यास प्रवृत्त करीत आहेत.


आता उत्तम नेता बनण्याकरिता वेदमंत्र कोणकोणते उपयुक्त उपाय सुचवितो, ते आपण पाहू. सर्वात अगोदर म्हटले आहे, ‘यत्रा नियुद्भि सचसे शिवाभि:।ज्याच्यामध्ये कल्याणकारक नीतितत्त्वे असतील, तो नेता बनू शकतो. नेतृत्व असेल तर त्या व्यक्तीने सर्वप्रथम आपले आचरण शुद्ध ठेवावयास हवे. तो नैतिक दृष्टीने प्रगत असावा. कारण, चारित्र्यसंपन्न नेता हाच आपल्या जनतेला सदाचार शिकवू शकतो. त्यामुळे शीलयुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. राजा किंवा नेत्यामध्येच जर चारित्र्यहीनता असेल, तर तो आपल्या देशात मूल्यसंस्कारांची रूजवण कशी काय करू शकणार? म्हणूनच नेता किंवा राजा हा कल्याणकारी नीतितत्त्वांशी सुसंगत असावा. आपल्या प्रजेला सुखाने न्हाऊ घालण्याकरिता नेत्याचा व्यवहार सर्वसमावेशक, नि:स्वार्थी व करूणा, दया, प्रेमाने भरलेला असावा. जो नेता नेहमी आदर्श तत्त्वांनुसार वागतो, त्याचा जनतेवर चांगलाच प्रभाव पडतो. त्या नेत्याच्या मागोमाग तिथली जनता चालते. यासाठीच म्हटले आहे, ‘यथा राजा तथा प्रजा!’ आपल्या पुत्रसम प्रजेला ‘प्रेयस’ (भौतिक उन्नती) मार्गाबरोबरच ‘श्रेयस’ (आध्यात्मिक) मार्गाने नेणारा व्यक्तीच ‘नेता’ असते.


त्यानंतर दुसरी गोष्ट येते ती राजाच्या मानसिक सामर्थ्यवृद्धीची! या संदर्भात वेदमंत्र म्हणतो - ‘दिवि दधिषे मूर्धानम्।’ म्हणजेच नेत्याने आपले डोके (मस्तक) हे नेहमी द्युलोकात ठेवावे. याचाच अर्थ आपल्या बुद्धीला प्रकाशमार्गावर आणावे. ज्ञानाचा प्रकाश हा दु:खाचा अंधार नाहीसा करणारा असतो. नेत्याने ज्ञानयुक्त प्रकाशाने आपली राजकीय वाटचाल करावयास हवी. अज्ञानी नेता जनतेला ज्ञानाचा मार्ग दाखवूच शकत नाही. तसेच नेत्याने विविध प्रकारचे ज्ञानकौशल्य हस्तगत करावे. भौतिक व आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण असलेला नेता खर्‍या अर्थाने स्वत: सुखी व समाधानी राहतो. त्याचबरोबर निवडणुकीतील जय-पराजयाला समदृष्टीने पाहण्याची धैर्यदृष्टी नेत्यामध्ये येऊ शकते. आजच्या एकांगी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे व लोकशाही मूल्यांकरिता संविधानाने निश्चित केलेल्या विविध कलमांच्या व अधिनियमांच्या पुढे जाऊन वैदिक तत्त्वज्ञानाने परिपूर्ण होणे, ही आजच्या नेत्यांकरिता अतिशय मोलाची ठरते.


उत्तम नेता बनण्याकरिता तिसरी व शेवटची गोष्ट म्हणजे सर्वसमावेशक अशी गोड व सत्य वाणी. याकरिता मंत्रात म्हटले आहे - स्वर्षा जिह्वामग्ने चकृषे हव्यवाहम्।’ अर्थात, नेत्याने आपल्या वाणीला सर्व प्रकारच्या भोग वस्तूंना प्राप्त करणारी बनवावे. बोलणे असे असावे की, तो नेता किंवा राजा आपल्या देशातील सर्व प्रजाजनांना प्रेरणादायी व प्रभावी वाणीच्या माध्यमाने त्यांच्या त्या-त्या गरजा व आवश्यक उपभोगी वस्तू उपलब्ध करून देण्यास समर्थ ठरावा. म्हणजेच राजाने आपल्या मुखातून असे शब्द उच्चारावेत की, प्रजा पुरुषार्थ, कष्ट, श्रम व उद्योग करण्यास प्रवृत्त होत राहावी आणि त्याद्वारे जनतेला त्या-त्या वस्तू, पदार्थ, साधने व साहित्य घेता यावे. नेत्याच्या जिभेवर सतत गोडवा असावा. बोलणे विचारपूर्वक व विवेकाच्या चाळणीतून चाळलेले असावे. दुर्दैवाने आजकालच्या नेत्यांची भाषणे व त्यांच्याकडून दिली जाणारी वक्तव्ये ही जनतेत आग लावणारी ठरत आहेत. विवेकहीन बरळणे राष्ट्रासाठी घातक ठरते. याकरिता मंत्रातील सत्य व मधाळ असा सर्वगुणसंपन्न नेता हाच त्या राष्ट्राचा बनू शकतो, असे प्रतिपादित केले आहे.


मंत्रातील उदात्त भाव राजकीय मंडळींच्या अंत:करणात रुजो, हीच कामना!

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
@@AUTHORINFO_V1@@