संधीचे सोने करणारा देवदत्त पडिक्कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2020
Total Views |


Devdutta padikkal_1 



आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानंतर पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून संधीचे सोने करणार्‍या देवदत्त पडिक्कलच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
 
‘आयपीएल’ स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अनेक खेळाडूंना आपले कौशल्य जगासमोर दाखवण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर काही खेळाडूंनी पदार्पणाच्या सामन्यांतच संपूर्ण जगासमोर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (आरसीबी) संघामधील सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘सनरायझर्स हैदराबाद’ (एसआरएच) संघाविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात देवदत्त पडिक्कलने आपल्या कर्तबगार खेळीने सर्वांवर छाप पाडण्यात यश मिळविले. पडिक्कल याने सलामीलाच येत ताबडतोब अर्धशतक ठोकले. पदार्पणातच त्याने केलेली ही कामगिरी महत्त्वाची ठरली असून त्याने निवड समितीवर आपली छाप पाडण्यात यश मिळवले आहे.


‘आरसीबी’ हा ‘आयपीएल’मधील एक नावाजलेल्या संघापैकी एक संघ. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या संघाचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. विराट कोहली हा क्रिकेट विश्वात आक्रमक फलंदाज म्हणून समजला जातो. भारतीय क्रिकेट संघात कोहली हा तिसर्‍या स्थानावर (वन डाऊन) फलंदाजीस येतो. मात्र, ‘आयपीएल’मधील सामन्यांदरम्यान विराट कोहली अनेकदा सलामीलाच फलंदाजीसाठी येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत असे. परंतु, ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात वेगळेच घडले. कर्णधार विराट कोहली हा सलामीला खेळण्यासाठी आलाच नाही. त्याच्याजागी २० वर्षीय नवखा खेळाडू देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात आली. कोहलीच्या जागी फलंदाजीस येणारा हा खेळाडू नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला. कोहली आक्रमक फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करतो. मात्र, कोहलीच्या जागी आलेला हा नवखा फलंदाज ही भूमिका योग्यरित्या पार पाडेल का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र, देवदत्त पडिक्कलने पर्दापणाच्या सामन्यातच ताबडतोब अर्धशतक झळकावत निवड समितीसह प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला. आजघडीला देवदत्त पडिक्कल याच्यावर सर्व स्तरांतून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. मात्र, येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने आपल्या जीवनात मोठा संघर्ष केला आहे. अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी देवदत्त पडिक्कलने कोहलीच्या जागी फलंदाजीला येत सर्वांवर आपली छाप पाडण्यात यश मिळवले आहे.


देवदत्त पडिक्कल हा मूळचा केरळचा. २७ जुलै, २००० साली केरळमधील एडापल्ली या गावात त्याचा जन्म झाला. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला या देवदत्तच्या आईवडिलांनी आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आपल्या आईवडिलांचे हे स्वप्न देवदत्तने पूर्णही करून दाखवले. देवदत्तची आई पंबीनी पडिक्कल यांनी आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्माआधीच ठरवले होते की, जर पुन्हा मुलगा झाला तर त्याला क्रिकेटपटू करायचे. यासाठी लहानपणापासूनच त्यांनी देवदत्तला क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. वडील बाबूना पडिक्कल हे भल्या पहाटे त्याला दररोज क्रिकेटच्या सरावासाठी मैदानावर नेत. केरळमधील एका क्लबमध्येही त्यांनी देवदत्तला क्रिकेटचे प्रक्षिशण मिळवून देण्यासाठी नोंद केली होती. सर्व काही व्यवस्थित सुरु होते. मात्र, वडील बाबूना यांची कर्नाटकात बदली झाल्याने पडिक्कल कुटुंबीय बंगळुरु येथे स्थलांतरित झाले. मात्र, याही परिस्थितीत आपल्या मुलाचे क्रिकेट प्रक्षिक्षण सुरुच ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला. बंगळुरुतील नामांकित क्रिकेट क्लबचे सदस्यत्व स्वीकारत त्यांनी देवदत्तला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून दिले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता याचा खर्च पडिक्कल कुटुंबीयांना परवडेनासा होता. मात्र, अनेक बाबींमध्ये पदरमोड करत त्यांनी देवदत्तला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून देणे सुरुच ठेवले. यात कोणताही खंड पडू दिला नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवत देवदत्तनेही कसून तयारी सुरु केली. ऊन, पाऊस, वारा आदी कशाचीही पर्वा न करता त्याने आपला क्रिकेट सराव सुरुच ठेवला. दिवस असो वा रात्र, जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी पडिक्कल क्रिकेटचे धडे गिरवत असे. क्रिकेटचा सराव सुरु असला तरी अभ्यासाकडे त्याने दुर्लक्ष होऊ दिले नाही. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याला ‘कर्नाटक प्रीमिअर लीग’ स्पर्धेतून खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर देवदत्त याची निवड रणजीसाठी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी करण्यात आली. कर्नाटकातील रणजी सामन्यामधून खेळताना महाराष्ट्राच्या विरोधात ७७ धावा केल्या. त्यानंतर २०१९ साली विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध ५८ धावा केल्या. त्याच वर्षी सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने उत्तराखंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात नाबाद ५३ धावांची खेळी केली. क्रिकेटमधील चारही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला फलंदाज आहे. देवदत्त पडिक्कलने २०१९-२० मध्ये विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ डावांत ६७.६६च्या सरासरीने ६०९ धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचे हे कौशल्य पाहून त्याला ‘आयपीएल’मध्ये संधी देण्यात आली. ‘आयपीएल’च्या पहिल्याच सामन्यात त्याने या संधीचे सोनेही केले. त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
 
 

- रामचंद्र नाईक

 
@@AUTHORINFO_V1@@