सुंठीवाचून जातोय खोकला… ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020   
Total Views |

akali_1  H x W:

सुंठीवाचून जातोय खोकला… ?

 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : कृषीसुधारणा विधेयकांवरून भाजपचा सर्वांत जुना सहकारी असलेल्या शिरोमणी अकाली दलाने विरोधी सूर लावला आहे. हरसिमरतकौर बादल यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजिनामाही दिला आहे. यामागे पंजाबच्या राजकारणात घटता जनाधार सांभाळण्याचे अकाली दलाचे प्रयत्न आहेत. अद्याप अकाली दल एनडीएतून बाहेर पडले नसले तरीही तसे झाल्यास भाजपसाठी सुंठीवाचून खोकला गेला, अशी स्थिती होणार आहे.


शिरोमणी अकाली दल हा भाजपचा एनडीएमधील सर्वांत जुना सहकारी. पंजाबमध्ये कायम अकाली दलाचे बोट धरूनच भाजपने आपले राजकारण केले. त्यामुळे सत्तेत वाटा मिळाला असला तरी राज्यात पक्ष रुजविण्यासाठी त्याचा फारसा लाभ झाला नाही. अन्य राज्यांमध्येही भाजपने यापूर्वी दुय्यम भूमिका स्विकारली असली तरी तेथे पक्षाची पाळेमुळे रुजविण्यात आणि नेतृत्व उभे करण्यात भाजपला यश आले होते. मात्र, पंजाबमध्ये तसे होऊ शकलेले नाही. मात्र, आता कृषीसुधारणा विधेयकांवरून भाजप – अकाली दलामध्ये निर्माण झालेला दुरावा हा राज्य भाजपच्या नेत्यांसाठी मात्र एका अर्थाने आनंदाची घटना ठरला आहे.


पंजाबमध्ये आता स्वतंत्र लढावे, अकाली दलाच्या सोबत राहून झाले तेवढे नुकसान पुरे झाले असा सूर आता भाजपमध्ये उमटू लागला आहे. त्यासाठी भाजपने सुरू केलेल्या काही उपक्रमांमुळे अकाली दलाने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामध्ये आता कृषीसुधारणा विधेयकांविषयी भाजपने आता राज्यभरात अभियान राबवून शेतकऱ्यांपर्यंत विधेयकाची खरी माहिती पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपच्या केडरला सक्रिय केले जाणार असून अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये कृषीसुधारणा विधेकांविषयी जागृती केली जाणार आहे. भाजपने यापूर्वी ज्या गावांमध्ये, मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढविली नाही, त्या सर्व ठिकाणी भाजप या विधेयकांच्या निमित्ताने पोहोचणार, असा निर्णय पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी भाजपने विधेयके आणि त्यामुळे होणारे लाभ यांचे पंजाबीमध्ये अनुवाददेखील करून घेतला आहे. यावरून भाजपने आता स्वतंत्र लढायचे, याची पूर्ण तयारी केली असल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलानेही कृषीसुधारणा विधेयकांच्याविरोधात राज्यातील शेतकरी संघटना आणि अन्य पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दोन्ही पक्षांमधल्या मतभेदांची दरी वाढली आहे. त्यामुळे आता एनडीएमध्ये रहायचे की नाही, हा निर्णयही अकाली दलाला घ्यायचा आहे. अकाली दलाने एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला तर वरवर पाहता त्यास एनडीएमध्ये फूट असे पाहता येईल. मात्र, पंजाबच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहिल्यास भाजपच्या ते पथ्यावरच पडणार आहे.
 
 

तर तीन वर्षांपूर्वीच युती तुटली असती

 

modi and badal_1 &nb 
 

पंजाबच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीतच स्वतंत्र लढावे, असा आग्रह पंजाब भाजपने राष्ट्रीय नेतृत्वाकडे धरला होता अशी माहिती खात्रीलायर सूत्रांनी दिली आहे. कारण त्यावेळी अकाली दलाविरोधात पंजाबचे जनमत एकवटले होते. भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा राज्यात झालेला अतिरेक यासाठी मतदार अकाली दलास जबाबदार धरत होते. त्याचप्रमाणे अकाली दल हा पूर्णपणे बादल परिवाराचा पक्ष झाल्याने घराणेशाहीविरोधातही राग वाढला होता. त्याचवेळी काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे खच्चीकरण चालविले होते. त्यासाठी नवज्योतसिंग सिद्धू याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देऊन काँग्रेसमध्ये आणले होते. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडायची, स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा आणि दुसरीकजे भाजपने अकाली दलाची साथ सोडून अमरिंदर सिंग यांच्यासोबत यायचे, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, त्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यास नकार दिला. अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल हयात असेपर्यंत युती तोडायची नाही, असा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रकाशसिंग बादल यांच्याशी अत्यंत मधुर संबंध आहेत, मोदी त्यांना अतिशय आदरही देतात हे विशेष !. मात्र, तीन वर्षांत आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये भाजप वेगळा विचार करण्याची सर्वोच्च शक्यता आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@