मनसे सविनय कायदेभंग : मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांवर गुन्हा

    22-Sep-2020
Total Views |

sandeep deshpande_1 



मुंबई :
लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आलेली लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करत मनसेने काल सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास केला होता. या आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांविरुद्ध कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली, मात्र सर्वसामान्य लाखो प्रवासी रोज धक्के खात रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत. एकीकडे राज्य सरकारने एसटी बसेस आणि इतर बसेस सुरु केल्या आहेत ज्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मग लोकल का सुरु करत नाही ? असा सवाल सरकारला विचारत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोमवारी सविनय कायदेभंग करुन लोकलने प्रवास केला. त्यानुसार, काल सकाळी संदीप देशपांडे यांच्यासह नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर दोघांनी शेळू ते नेरुळ असा लोकलने प्रवास केला. बसमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, अशी अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी केली होती. बसमधून प्रवास केल्यास कोरोना पसरत नाही. मात्र रेल्वेने प्रवास केल्यास कोरोना पसरतो असा सरकारचा समज आहे. त्यामुळे आज आम्ही सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आम्ही नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करत आहोत, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.


दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, मला अजून अटक करण्यात आलेली नाही. आम्ही स्वतः पोलिसांकडे जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक झाल्याची कदाचित ही देशातील पहिलीच घटना असेल. या कारवाईमधून सरकारचा आकस दिसून येतो आहे. आम्ही केलेले आंदोलन प्रतिकात्मक आहे. प्रवाशांच्या समस्यांबाबत सरकारने आमच्याशी बोलावे, किमान प्रवासी संघटनांशी बोलावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.