राष्ट्रभविष्याचा विचार करणारा ‘प्रकाश’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020   
Total Views |


Prakash Kolhe_1 &nbs


सरस्वतीची उपासना केल्यावर धनलक्ष्मी प्रसन्न होते, या धारणेवर विश्वास असणारे आणि राष्ट्रप्रगतीसाठी ‘आत्मनिर्भर’ विद्यार्थी घडविण्यासाठी कार्यरत नाशिकच्या प्रकाश कोल्हे यांचा जीवनसंघर्ष... 



भविष्यात कोणताही नागरिक हा सुशिक्षित बेरोजगार राहू नये, यासाठी नाशिक येथील ‘मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास’ संस्थेच्या माध्यमातून प्रकाश कोल्हे भावी पिढीच्या जीवनात प्रकाश निर्माण करीत आहेत. चांदवड तालुक्यात पाटीलकी असणार्‍या कुटुंबात कोल्हे यांचा जन्म झाला. १९७२च्या तीव्र दुष्काळाच्या झळा त्यांच्या कुटुंबाला बसल्याने पाटीलकीचे वैभव लयाला गेले. कालांतराने कोल्हे यांचे वडील सुखदेव यांनी सपत्नीक गाव सोडले. लासलगावनजीक निमगाव वाकडा येथे या दाम्पत्याने सालकरी म्हणून आपल्या उदरनिर्वाहास सुरुवात केली. लहानपणापासून आईवडिलांचे काबाडकष्ट, प्रामाणिकपणाच्या छत्रछायेखाली त्यांचे बालपण गेले. पण, परिस्थिती ही ठरवली तर बदलता येते, हा आत्मविश्वास मनी असल्याने जिद्दीने कोल्हे यांनी अभियांत्रिकीच्या पदवीला गवसणी घातली. यासाठी इयत्ता चौथीपासूनच कोल्हे यांनी ‘कमवा आणि शिका’ या धर्तीवर आपल्या शिक्षणाचा प्रवास केला, हे विशेष. एका प्रथितयश कंपनीत ‘सर्व्हिस इंजिनिअर’ या पदावर कोल्हे यांनी कार्यारंभ केला. या कार्याच्या माध्यमातून कोल्हे यांना भारतभ्रमणाची संधी मिळाली. या दरम्यान भारताचे भविष्य प्रत्यक्ष कृतीतून नवनिर्माण करावे लागेल, हे कोल्हे यांनी जाणले. त्यामुळे देशाचे भविष्य असलेली पिढी घडविण्याची संधी मिळावी, यासाठी कोल्हे यांनी प्राध्यापकाचा पेशा अंगीकारला. त्याचवेळी नाशिकमधील राणेनगर परिसरात रस्ता अपघातात विद्यार्थी दगावल्याची घटना घडली होती. त्यामुळे पाथर्डी परिसरात शाळा असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही, याची गरज प्रतिपादित होत होती. ही गरज कोल्हे यांनी नेमकी हेरली आणि पाथर्डी परिसरात सुरु झाले धनलक्ष्मी विद्यालय.सरस्वतीची उपासना केल्यावर धनलक्ष्मी प्रसन्न होत असते, याची खात्री असल्याने कोल्हे यांनी शाळेसाठी ‘धनलक्ष्मी’ हे नाव निवडले. 
 
 
केवळ पाच हजारांसाठी स्वतःचा भविष्य निर्वाह निधी मोडून कोल्हे यांनी या शाळेची सुरुवात केली. शाळेचा बोर्डदेखील नसताना कोल्हे यांची तळमळ पाहून या शाळेत पहिला प्रवेश त्यावेळी झाला. ‘क्वालिटी बेस्ड एज्युकेशन’ दिल्याने सहा महिन्यांत शाळेला ती जागा कमी पडू लागली. तेव्हा एक बंगला घेतला व तेथून पुढे मोडकळीस पडलेली जागा घेत तेथे शाळा भरवली. २००९ मध्ये शाळेसाठी जागा मिळवली. खिशात १५ हजार व प्लॉटची किंमत ४२ लाख अशी स्थिती होती. २००९-१२ या काळात प्रचंड आर्थिक समस्या आल्या. आत्महत्येचे विचारदेखील कोल्हे यांच्या मनात आले. मात्र, जीवनात अनेक समस्या असलेले लोक यशस्वी होतात, हे पाहून कोल्हे यांनी उभारी घेतली. राहते घर विकून आर्थिक समस्या सोडवित शाळा मात्र सुरु ठेवली. आज या शाळेत तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे सात युनिट मोठ्या दिमाखात अविरत कार्यरत आहेत. धनलक्ष्मी ही नाशिक जिल्ह्यातील मराठी माध्यमाची ‘आयएसओ’ नामांकन प्राप्त असणारी पहिली शाळा आहे. या शाळेत विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठराज जोशी यांसारख्या १५ शास्त्रज्ञांनी भेट देत आपले मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. ’How to develop Nation through education' या संकल्पनेसाठी हे संशोधक संस्थेसोबत आपले कार्यरत आहेत. या शाळेत वीजबचतीचा प्रकल्प राबविला जात असून त्या माध्यमातून १ कोटी २९ लाखांपेक्षा जास्त रुपयांची विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरात वीजबचत केली आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन २०२०’ समोर ठेवून हे सर्व उपक्रम शाळेत राबविले जातात. ‘महाऊर्जा’तर्फे शाळा पातळीवरचा पहिला पुरस्कार संस्थेला मिळाला आहे. या कार्याबद्दल डॉ. कलाम यांनीदेखील संस्थेची व कोल्हे यांची विशेष प्रशंसा केली आहे. तसेच मागील सात वर्षांपासून ऑनलाईन परीक्षा घेणारी ही राज्यातील पहिली शाळा ठरली आहे. रोबोटिक पद्धतीने ध्वजारोहण करणारी, विनाअनुदानित तत्त्वावरील अटल टिनकरिंग लॅब मिळालेली राज्यातील पहिली शाळा, असे कितीतरी विक्रम कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि दुर्दम्य आशावादातून संस्थेने साकारले आहेत.
 
 
‘सेव्ह इलेक्ट्रिसिटी’, ‘जय भारत महारॅली, १५ हजार सीडबॉल रोपण, विश्वशांतीसाठी नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव या उपक्रमांची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे. या शाळेतील मुले शिक्षणाबरोबरच हॅण्डवॉश तयार करणे, मोबाईल रिपेअरिंग, कपडे शिवणे, कॉम्प्युटर रिपेअरिंग आदी कामातदेखील कुशल आहेत. ‘छोटा पोलीसही संकल्पना वाहतूक नियम जनजागृतीसाठी कोल्हे यांनी राबविली. त्यामुळे शाळेच्या लहानग्यांच्या माध्यमातून सुमारे ७० ते ८० लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. भारताची भावी पिढी ‘आत्मनिर्भर’ व्हावी, यासाठी कोल्हे यांनी आपल्या जीवनातील संघर्ष लक्षात घेत, देशाच्या भावी पिढीच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.
 
 

@@AUTHORINFO_V1@@