मना सर्वथा शोक चिंता नको रे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2020
Total Views |


Social Health_1 &nbs

 


एक सत्य आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे, कोरोना आजही आहे आणि या विषाणूचा धोका तितकाच तीव्र आहे. आपल्याला बेफिकीर राहून चालणारच नाही. अशा केविलवाण्या परिस्थितीत सूक्ष्म होऊन आपण आपलचं नुकसान करुन घेण्यापेक्षा काहीतरी नावीन्य आपल्या आयुष्यात आणायलाच हवे. नवीन छंद, नवीन कला, नवीन मित्रपरिवार आणि आपल्या आयुष्यवरचा नवा विश्वास या गोष्टी आपल्याला जगवतील.
 
 

आपण सगळेच, या जगातले जवळ जवळ सगळेच कोरोनाच्या महामारीत कल्पना करता येणार नाही अशा तर्‍हेने फसलो आहोत. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आपण अनेक अटी आणि नियम पाळले. कोरोनाची पहिली लाट तुफान होती आणि आजही ती मुळात गेलेली नाहीच. आपण आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यात आपले हात जितक्या वेळा धुतलेले असतील, त्याच्या चार पट धुतले आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये चार-पाच महिन्यांत घराच्या बाहेर पाऊल न टाकता स्वत:ला कोंडून घेतलेल्या अनेक व्यक्तींचे अनुभव ऐकण्यासारखे असतील. काहींना या वेळेचे वरदान वाटले, तर काहींना त्या वेळेचे काय करायचे हेच सुचलेले नाही. आपल्या सामाजिक आयुष्यात मिळून मिसळून ‘टाईमपास’ करणार्‍या व्यक्तींना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा जो एक वेगळाच एकटेपणाचा त्रास झाला. त्याचे वर्णन करायलाच नको. अनेकांना ‘लॉकडाऊन’मध्ये निराशा आली, चिंता वाटली, भावनिक क्षोभ झाला, तर काहींना प्रचंड मानसिक क्षीण आला. ‘क्वारंटाईन’चा मानसिक थकवा तर इतका की, तो काळ संपला, पण थकण्याची लाट काही कमी होत नव्हती. शिवाय या सगळ्यावर मात करणारा भयंकर अनुभव म्हणजे कोरोनाची लागण आपल्याला झाली तर, आपला मृत्यू झाला तर, आपल्यामुळे इतरांना आपल्या प्रियजनांना कोरोनाची लागण झाली तर, असे स्वत:ला अपराधीपणाच्या पिंजर्‍यात उभे करणारे अनेक संदेश. आता या सगळ्यांचा शेवटी आपल्या भावनांवर, विचारांवर आणि वर्तनावर परिणाम होणारच ना?


महामारीच्या थकव्यात होणारा हा परिणाम जर आपल्याला सकारात्मक दिशेने घेऊन जाणार असेल, तर काही समस्या नाही. पण, ही जी निराशा, भीती, राग आणि अनिश्चितता माणसाला सारासार विचार करता न येणार्‍या नकारात्मक मार्गावर घेऊन जाते. पुन्हा मागे वळून न पाहता येणारा मार्ग असतो तो. आजकालच्या काही घटनांमध्ये घरात धुसफूस वाढली आहे, चिडचिड जास्त होत आहे. आळस खूप वाढला आहे. विधायकता कमी झाली आहे. त्यात अजून चिंतेची गोष्ट म्हणजे, लोकांच्या रोगट सवयी वाढू लागल्या आहेत. आहार उगाचच जास्त झाला आहे. दारु-सिगारेट वाढली आहे. योग, व्यायाम कमी झाला आहे. वातावरणातल्या अनिश्चिततेमुळे मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. येणारा प्रत्येक दिवस आणखी किती प्रश्नचिन्ह आणणार आहेत, याची कोणाला कल्पनाच येत नाही. नवा दिवस, नवा भार, नवी समस्या असं प्रत्येकाच्या मनाला वाटू लागलं आहे. बरं आता कुणाला फोन करायचा म्हटलं, तर पूर्वीसारखी मजा येत नाही. टेलीसंवादात, खळखळ नाही, गॉसिप नाही सगळं कसे थंडगार झालं आहे. शिवाय विरंगुळा म्हणून बोलायचे ठरविले, तर आपल्याच मनातले नकारात्मक प्रश्न दुसर्‍याच्या मुखातून पुन्हा ऐकायला लागलं म्हणजे मोठी शिक्षाच. आपल्याला आपल्या प्रत्येक दिवसाच्या विश्लेषणात लक्षात यायला लागलं आहे की, आपली झोप बिघडली आहे. आपलं लक्ष केंद्रित करायला आपल्याला कष्ट पडत आहेत. आपल्याला सदैव नर्व्हस् वाटत आहे. आपण उगाचच वाद घालत बसलो आहोत. आपली ऊर्जा कमी होत आहे. मनात विचारांचा गदारोळ चालला आहे. आपण नेहमीच सामाजिक संवादातून दूर चाललो आहोत.


अलीकडे लोकं इतके कंटाळले आहेत की त्यांची सहनशीलताच कमी व्हायला लागली आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही सहन होत नाहीत. आता मनात पूर्णपणे निराशा यायला लागली आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, नियमांचे पालन जे लोकांना स्वतःचा आणि स्वतःच्या प्रियजनांचा कोरोनाच्या विषाणूपासून रक्षण करण्यासाठी वा बचावासाठी आवश्यक आहे, तेच लोकं करताना दिसत नाहीत. आज लोकं मास्क लावत नाही, सोशल अंतर पाळत नाहीत, हात स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक वेळा हात धुणे आवश्यक आहे, तेही ते करीत नाही. कोरोनाने आपल्याला त्रस्त केले आहे, हे मान्य आहे. मनावर निराशेचे काळे मळभ पसरले आहे, हेही खरे. भावना टोकाला पोहोचल्या आणि निश्चित दिशा समोर दिसली नाही की, मनाची ऊर्जा हळूहळू आटत जाते. जसं चावी देऊन खेळणारं खेळणं अचानक थांबतं, तशी काहीशी परिस्थिती खूप जणांची झाली आहे. वस्तुस्थिती नक्की काय आहे, आज आणि भविष्यात कशी असणार आहे, हे समजत नाही. अशावेळी एक सत्य आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे, कोरोना आजही आहे आणि या विषाणूचा धोका तितकाच तीव्र आहे. आपल्याला बेफिकीर राहून चालणारच नाही. अशा केविलवाण्या परिस्थितीत सूक्ष्म होऊन आपण आपलचं नुकसान करुन घेण्यापेक्षा काहीतरी नावीन्य आपल्या आयुष्यात आणायलाच हवे. नवीन छंद, नवीन कला, नवीन मित्रपरिवार आणि आपल्या आयुष्यवरचा नवा विश्वास या गोष्टी आपल्याला जगवतील. शिवाय मनाची उभारी तेव्हा कमी होते, जेव्हा मन मानत नाही. ते मनाचे बंडही असू शकेल किंवा मनाचा शक्तिपातही असू शकेल. पण, आपल्याला परिस्थितीचे भान ठेवायला पाहिजे. स्वतः जगायचे आणि जगाला जगवायचे, हाच विचार आपल्याला नक्की पुढे घेऊन जाईल.

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@