ध्येयशील उद्योजक घडवण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2020   
Total Views |


Uday Wankavala_1 &nb



सर्व सुखं हात जोडून उभी असताना, त्या आयुष्याला वळसा देऊन दुसर्‍यांच्या स्वप्नांना पंख मिळवून देणारा एक ध्येयशील अवलिया म्हणजे उदय वांकावाला. त्यांच्याविषयी...



“ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्षमता असते, कष्टाळू वृत्ती असते, एक प्रकारची संस्कारशीलताही असते. त्यांच्यात जर आत्मविश्वास जागृत केला, त्यांच्या स्वत:च्या शक्तीचा परिचय करून दिला आणि जागृत झालेल्या शक्तीसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले, तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण होऊ शकतात,” रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘अटल इन्क्युबेशन सेंटर’चे सीईओ उदय वांकावाला सांगत होते.


उदय यांनी आजपर्यंत ५० हजारांच्यावर होतकरू युवा उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे. शेकडो संस्थांना त्यांच्या कार्यात आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी साहाय्यदेखील केले आहे. युवा उद्योजकांच्या दुनियेत उदय वांकावाला हे नाव आदराने आणि तितकेच आपलेपणाने घेतले जाते. उद्योजक म्हणजे जास्तीत जास्त धोका पत्करून जास्तीत जास्त नफा मिळवणारा व्यावसायिक असे समीकरण मांडले. पण, उदय यांनी स्टार्टअप क्षेत्रात उद्योजक म्हणून पुढे येणार्‍या हजारो उद्योजकांना एक तत्त्व दिले की, “उद्योजक म्हणजे केवळ नफा कमावण्यासाठी धोका पत्करणारा कोणी व्यावसायिक नव्हे, तर तुम्ही असे संशोधक उद्योजक व्हा, जे समाजातील विभिन्न स्तरातील प्रश्न शोधून त्या प्रश्नांवर उत्तरं तयार करतील. ते उत्तर तुम्हाला आणि समाजालाही प्रगतिपथावर नेईल.” अशा प्रकारचे उद्योग करायला व्यक्तीकडे एक संवेदनशील, संशोधनशील उद्योगी नजर हवी. नेमकी हीच नजर उदय वांकावाला उद्योजक बनू पाहणार्‍या ध्येयवादी युवक-युवतींना देतात. उदय यांनी ठरवले की, आपल्या देशामध्ये उद्योगशील आणि भव्य सकारात्मक स्वप्न पाहणार्‍या व्यक्तींची कमी नाही. अशा व्यक्ती आजही गाव-खेड्यांत आहेत. अशा लोकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचवायचे.


उदय यांचा हा संकल्प कठीणच होता. पण, संकल्पपूर्तीसाठी उदय यांनी विविध सरकारी आणि मोठ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. अगदी ‘मिनिस्टरी ऑफ स्किल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एंटरप्रिन्युर डिपार्टमेंट’पासून गुरुकुल ऑनलाईन, वाधवान संस्था ते पवई आयआयटीसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. याच माध्यमातून त्यांनी पूर्व ते पश्चिम भारतातील दुय्यम आणि तृतीय दर्जाच्या शहरांमध्ये लक्ष केंद्रित केले. या शहरातील तरूणांना उद्योजकांची दृष्टी देणे, संशोधनपर उद्योग-व्यवसाय करण्याची संधी देणे अशा प्रकारचे कार्य ते करू लागले. त्यासाठी वेळकाळाचे बंधन पाळले नाही की, आपल्याला यातून भरपूर अर्थार्जन होत नाही, याचाही विचार केला नाही. उदय यांनी अक्षरश: हजारो उद्योजकांना प्रशिक्षित केले. समाजशील, संशोधनशील उद्योजक घडवण्याचे हे उदय यांचे कार्य वेगळेच म्हणावे लागेल. पुढे ‘अटल इन्क्युबेशन सेंटर’मध्ये ते सीईओपदावर कार्यरत झाले. गेल्या १८ महिन्यांत ३० होतकरू उद्योजकांना प्रशिक्षित करून त्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. हे करत असतानाच नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेत उदय यांनी वेगळा प्रयोग केला. ज्या मुलांनी स्वत:हून शिक्षण सोडले, पण त्यांना काहीतरी नावीन्यपूर्ण उद्योग करण्याची उमेद आहे, अशा शाळा सोडलेल्या मुलांना उद्योजक बननण्याची संधी आणि प्रशिक्षण देणे, या माध्यमातून नागपूरच्या शहरी आणि ग्रामीण भागात असे अनेक उद्योजक निर्माण झाले.


असो, उदय यांच्या ध्येयशील जीवनाचा मागोवा घेतला तेव्हा वाटले की, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’ वांकावाला कुटुंब मूळ मुंबईचेच. खार येथे रजनीकांत आणि दक्षा वांकावाला या दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यापैकी एक उदय. रजनीकांत हे चार्टर्ड अकाऊंटट! सचोटी, प्रामाणिकता आणि नीतिमत्ता याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे रजनीकांत. दक्षाबेन या आदर्श गृहिणी. मुलांवर चांगले संस्कार घडावेत, याबाबत दक्ष. वडिलांचे उच्च शिक्षण आणि त्याचबरोबर संवेदनशीलता, व्यवहारचातुर्य, प्रामाणिकता यामुळेच वडिलांना सर्वत्र मानसन्मान मिळतो, ही बाब उदय यांच्या लहानपणीच लक्षात आली. उदय यांची आत्या सुशीला या शिक्षिका होत्या. त्याही उदय यांच्या संगोपनात विशेष लक्ष देत असत. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या उदय यांनी चार्टर्ड अकाऊंटट व्हावे, असे घरच्यांना वाटे. त्यामुळे उदय यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. पण, पुढे उदय यांना वाटले की, आपण लोकाभिमुख संपर्काची कामे चांगली करू शकतो. त्यातूनच मग त्यांनी ‘सीएटी’ आणि ‘सीईटी’ परीक्षा दिली. सीईटी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी एमबीए केले. शैक्षणिक परिपूर्णतेसाठी जमिनीस्तरावरचे ज्ञान असावे, यासाठी त्यांनी सेल्समेनचेही या दरम्यान काम केले. पुढे मॅनेजर पातळीवर कामेही केली. पण, लोकांशी संवाद साधताना त्यांच्या लक्षात येत होते की, लोकांमध्ये प्रचंड सकारात्मक आणि यशनिर्मिती करणारी योजना आहे. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी संधी द्यायला हवी. उदय म्हणतात,


परिवर्तन की पावन आँधी
लाकर ही हम लेंगे दम
चलो जलाएँ दीप वहाँ,
जहाँ अभी भी अंधेरा हैं...!
 
 

@@AUTHORINFO_V1@@