कोरोनाचा कहर (भाग - २६) - ‘कोरोना’ व्हायरस आणि मानसिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2020
Total Views |


Corona_1  H x W


कोरोना विषाणूचा संसर्ग जसजसा वाढत गेला तसे तसे लोकांच्या लुबाडणुकीचे धंदेदेखील सुरू झाले. केंद्र व राज्य सरकारनेसुद्धा या हॉस्पिटलच्या फसवणूक व लुबाडणुकीच्या दुष्कृत्यांची दखल घेतली. कोरोनाने बाधित झालेला सामान्य माणूस हा मुख्यत: आता कोरोनाला घाबरत नाही. कारण, त्याला माहीत आहे की, आठवडाभरात हा आजार बरा होतो. सामान्य माणूस मुख्यत्वे घाबरत आहे, तो ट्रिटमेंटला म्हणजेच औषधोपचाराला. कारण, हॉस्पिटलला दाखल व्हायचे म्हटले की, सर्वप्रथम त्याचे लक्ष बँकेच्या पासबुककडे जाते व त्याच्या डोळ्यासमोर त्याचे रिकामे झालेले बँकखाते येऊ लागते. त्याचबरोबर विलगीकरणालासुद्धा सामान्य माणूस घाबरु लागला आहे. प्रचंड अशा आर्थिक संकटात तो सापडला आहे.


सुरुवातीच्या काळात होमियोपॅथीच्या उपचारांना काही हॉस्पिटलमध्ये परवानगी देण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होऊ लागले व तेसुद्धा अतिशय माफक दरात. सामान्यांना परवडतील अशा किमतीत ‘कोविड-१९’ पूर्ण बरा होऊ लागला. पण, अचानकपणे होमियोपॅथीच्या या प्रभावशाली व सर्वसामान्यांना परवडेल अशा उपचारांना हॉस्पिटलमध्ये बंदी घातली गेली, याचे कारण, काय ते खरोखर विचार करण्यासारखे आहे. असो. कोरोनाच्या साथीचा सर्वात मोठा फटका हा नुसत्या सरकारलाच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीला बसला. कीत्येक लोकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेक लोकांचे पगार बंद झाले, हजारो लोकांचे व्यवसाय बंद पडले. अर्थव्यवस्था डबघाईला आली. कुठल्याही गोष्टीसाठी पैसा हा गरजेचा असतो. पैसाच हाताशी नसल्यामुळे, तसेच व्यवसाय व नोकर्‍या गेल्यामुळे अनेक लोकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली.


काही महिन्यांपासून माझ्या क्लिनिकला येणार्‍या नवीन केसेसमध्ये Anxiety, डिप्रेशन, भयगंड, उदासिनता अशा केसेस जास्त येऊ लागल्या. एकदा का भय व ताण आला की, त्या मागोमाग शारीरिक तक्रारीही सुरु होतात. त्यानुसार उच्च रक्तदाब, थायरॉईडचे रुग्ण, तसेच मधुमेह, कोलेस्टेरॉल, तसेच निद्रानाश इ. तक्रारी वाढू लागल्या. सततच्या असुरक्षित भावनेमुळे मानसिक ताण फार वाढीस लागला आहे. सततच्या मास्क लावण्यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाला त्रास होऊ लागला आहे. सतत मास्क लावल्यामुळे आपण बाहेर फेकलेला अपायकारक असलेला कार्बनडाय ऑक्साईड आपण परत शरीरात घेत राहतो व परिणामी लोकांची शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली येत राहते. कित्येक लोकांना ‘पॅनिक अटॅक्स’ येत आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी लोकांच्या संभ्रमात अजून भर घालत आहेत. दर काही दिवसांनी नवीनवीन घोषणा केल्या जात आहेत व त्यामुळे सामान्य जनता पूर्णपणे भय व संभ्रमावस्थेत वावरते आहे. विलगीकरणामुळेही लोकांच्या मानसिकतेवर फार विपरित परिणाम झाला आहे. त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊ...

 
 

- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

 
@@AUTHORINFO_V1@@