ठाण्‍याच्‍या पत्रकारितेतील गुरूजी हरपले! श्रीकांत नेर्लेकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2020
Total Views |
Shrikant _1  H



ठाणे (प्रतिनिधी) : वयाच्‍या ऐंशीव्‍या वर्षांपर्यंत संयत आणि सौज्‍वळ पत्रकारिता करणारे व ठाण्‍यातील असंख्‍य तरूणांसाठी पत्रकारितेचे आधारस्‍तंभ असलेले ज्‍येष्‍ठ पत्रकार श्रीकांत वामन नेर्लेकर तथा गुरूजी यांचे आज अल्‍पशा आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मुंबई तरूण भारतच्‍या स्‍थापनेपासुन ते दैनिक 'मुंबई तरूण भारत' परिवाराशी जोडलेले होते.
 
 
दैनिक मुंबई तरूण भारतच्‍या स्‍थापनेनंतर दिर्घकाळ ज्‍यांनी मुंबई तरूण भारतमध्‍ये पत्रकारीता केली, असे श्रीकांत नेर्लेकर यांचे रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी ठाण्‍यातील खाजगी रूग्‍णालयात निधन झाले. घरात पडून मेंदुत रक्‍तस्‍त्राव झाला व त्‍यात करोनाची लागण झाल्‍याचे समोर आल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होत होती मात्र अखेर आज त्‍यांची प्राणज्‍योत मावळली.
 
 
श्रीकांत नेर्लेकर यांनी १९५४ पासून हाती घेतलेले पत्रकारितेचे व्रत तब्बल ६६ वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवले होते.विविध वर्तमानपत्रात त्‍यांनी पत्रकारिता केली मात्र 'मुंबई तरूण भारत' व 'महाराष्‍ट्र टाईम्‍स' सोबत त्‍यांचे ऋणानुबंध जास्‍त जुळले. अत्‍यंत संयत, सोज्‍वल पत्रकारिता करत त्‍यांनी ठाण्‍यातील विविध विषयांवर सातत्‍याने लिखाण केले. त्‍यांच्‍या लेखणीचा नैतिक दबाव नेहमी राजकारण आणि प्रशासनावर असत.
 
 
शहरातील अखंख्‍य विषयांवर ते अभ्‍यासपुर्ण लेखन करत. नेर्लेकर गुरूजी म्‍हणजे ठाणे शहराचा चालता बोलता इतिहास म्‍हणून ओळखले जात असत. पत्रकारिते सोबत त्‍यांनी व्‍यास क्रिएशनचे मार्गदर्शक म्‍हणूनही दिर्घकाळ काम केले. तरूणांना लाजवेल असे त्यांचे अफाट व्यक्तिमत्त्व होते.
 
 
अखंड ज्ञानसेवक, अजातशत्रू. स्थितप्रज्ञ, ध्येयवादी, समन्वयवादी, निरलस पत्रकार, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व , चिंतनशील पत्रकार आणि बहुआयामी लेखक अशा बिरुदांनी ते ओळखले जात. ते मूळचे कुरडुवाडी, सोलापूरचे. विद्यार्थीदशेत रामभाऊ म्हाळगी, काका महाजनी यांच्या सानिध्यात संस्करांचे धडे घेतले.
 
 
पत्रकारिता ही विधायकच असली पाहिजे यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता आणि या वाटेवरूनच त्यांनी अखंड पत्रकारिता केली. दैनिक 'मुंबई तरुण भारत'चे ठाणे वार्ताहर म्हणून त्यांनी पत्रकरितेला सुरुवात केली. 'महाराष्ट्र टाईम्स', 'तरुण भारत', 'पुण्यनगरी', 'सन्मित्र', 'नवशक्ती', 'ठाणे वैभव', 'सागर', अशा विविध दैनिकातून त्यांची पत्रकारिता बहरली.
 
 
प्रसंगोदभव लिखाण हा त्यांच्या लेखनाचा पैलू होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अनेक वर्षे सदस्य व पदाधिकारी या नात्याने काम केले. येथील व्यास क्रिएशन्स् प्रकाशन सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. 'व्यास क्रिएशन्स् प्रकाशित' 'प्रतिभा दिवाळी अंक', 'चैत्रपालवी विशेषांक' यांचे संपादकत्व त्यांनी भूषवले. 'धगधगते यज्ञकुंड' (चार भाषांत अनुवाद), 'नाना शंकरशेठ', 'अनादि अनंत सावरकर', 'नावात काय दडलंय', 'ठाणे नगरपालिका ते महापालिका' ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. ठाण्यातील सेवाभावी संस्थांवरील पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
 
 
ठाणे भूषण, विविध संस्थांचे उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ’काळ’कर्ते कै. शि.म. परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा कोकण विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, विश्वसंवाद केंद्रातर्फे नारद जयंती निमित्त दिला जाणारा ’उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यांनी ते सन्मानित होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. समस्त पत्रकारांचे ते महागुरु अशा श्री. वा. नेर्लेकर यांच्या निधनाने ठाण्याच्या सांस्कृतिक, राजकीय, पत्रकारिता आदि क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
 
सज्जन,सच्चा, हाडाचा पत्रकार गेला – आमदार संजय केळकर
 
ठाण्याचे भूषण ,अजातशत्रू श्रीकांत नेर्लेकर उर्फ गुरुजी म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व .५०वर्षे पत्रकारिता म्हणजे,५तप पत्रकारीता त्यांनी सचोटीने ,प्रामाणिकपणे केली अखेरपर्यंत ते कार्यरत होते.माझा त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संमंद होता.माझ्या सारख्या अनेकांचे ते विश्वासू मार्गदर्शक होते.विविध मुद्दे विविध समस्या निदर्शनास आणून आमच्याकडून ते करून घेत,वडीलकीच्या नात्याने आमच्यावर संस्कार करत होते.त्यांना सर्व क्षेत्रात आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनाने हक्काचं छत्र हरपले आहे त्यांची पोकळी आम्हाला नेहमीच जाणवत राहील .
 
ठाण्याच्या पत्रकारितेतले सन्मार्गी " गुरूजी " गेले.. : सुधीर जोगळेकर
 
 
मुंबई तरूण भारत १९७९ साली सुरू केला तेव्हापासूनचे आदरणीय ज्येष्ठ सहकारी श्री. वा. नेर्लेकर तथा गुरूजी अखेर आज गेले. पडल्याचे निमित्त होऊन ते गेले काही तास रूग्णालयात मृत्युशी झुंज देत होतेच, आज दुपारी ते गेले आणि ४० वर्षांचा मैत्रीअध्याय संपला. मुंबई तरूणच्या पहिल्या दिवसापासूनचे जे सहकारी सोडून गेले त्यात आणखी एकाची भर पडली. त्यातले विद्याधर अभ्यंकर, नरेंद्र पाठक, पद्माकर कार्येकर, मुरलीधर खैरनार, अशोक शिंदे, गोपाळराव सरदेसाई, मुझफ्फर हुसेन, विसुभाऊ देवधर, चित्तरंजन पंडित, वसंतराव उपाध्ये आधीच गेले होते. पण वयाची ऐंशी ओलांडूनही गुरूजी सक्रीय होते.. संपर्कात होते.
'मुंबई तरूण भारत' आणि 'महाराष्ट्र टाईम्स'शी त्यांचा प्रदीर्घ घरोबा होता.. गेली काही वर्षे ते आणि व्यास क्रिएशन्स हे समीकरणच झालं होतं.. नीलेशच्या सगळ्या उपक्रमात ते खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे असायचे. ठाण्याच्या वृत्तपत्रसृष्टीने एक सन्मार्गी, सव्यसाची, सकारात्मक व नितीमूल्याधिष्ठीत पत्रकारिता करणारा मार्गदर्शक पत्रकार गमावला आहे.. ठाण्याच्या पत्रसृष्टीचे, पण त्याचबरोबर व्यास क्रिएशन्सचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. व्यक्तिश: माझी साश्रू आदरांजली.. नेर्लेकर कुटुंबीय व व्यास परिवाराप्रती सहवेदना..


@@AUTHORINFO_V1@@