पुणे : कोट्यावधींचे कोविड सेंटर उभारलं, पण एकही कार्डियाक अॅम्ब्युलन्स नाही? रायकर यांच्या बहिणीचा राज्य सरकारला सवाल केला आहे. घरचा डबा दादापर्यंत पोहोचलाच नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला सर्वस्वी व्यवस्थाच जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. “रुग्णालयाने तुम्ही रुग्णाला घरचे जेवण देऊ शकता, असे सांगितले. दादाला भूक लागली होती, त्याने घरचा डबा आणायला सांगितला, मी काल रात्री आठ वाजता डबा दिला, पण शेवटपर्यंत तो त्याला मिळालाच नाही, दुपारी तीन वाजता दिलेली औषधंही मिळाली नाहीत. तो ना त्याला मिळाला, ना आमच्यापर्यंत रिटर्न पोहोचला. मी २०-२५ वेळा डॉक्टरांना विचारले” असेही पांडुरंग रायकर यांची बहीण म्हणाली. तसेच कोविड रुग्णालयात दोनवेळचे जेवण, नाश्ता व चहा दिला जातो असे सांगितले जाते तर हे सर्व जाते कुठं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला केवळ सरकारी व्यवस्थाच जबाबदार असल्याचा संताप देखील त्यांनी व्यक्त केला.