अभिनंदन आणि अपेक्षा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2020
Total Views |
prakash ambedkar_1 &




प्रकाश आंबेडकर स्वतःहून पुढाकार घेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करण्यासाठी उभे ठाकले व यामुळे समाजकंटकांनी जाती-धर्मात तेढ माजवून आपला-परका असा कृत्रिम भेद निर्माण केल्याने उद्भवलेली कोंडी फुटण्यास नक्कीच मदत झाल्याचे म्हणता येते. मात्र, प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका भावी काळातही राहायला हवी, जेणेकरुन भारतीय समाज एकरस, समरस होण्यात हातभार लागेल.


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन केले. सर्वप्रथम प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरे व धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आणि अभिनंदन करायला हवे. कारण, कोरोनाचे भीषण संकट आणि ते रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे जवळपास पाच महिन्यांपासून मंदिरे व धार्मिक स्थळे बंदच आहेत. पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही तेव्हापासून बंदच असून महामारी व अन्य आर्थिक संकटामुळे खचलेल्या समाजाला मानसिक आधाराची नितांत गरज आहे.


भारताच्या सनातन संस्कृतीनुसार इथे ध्यान-धारणा, चिंतन-मनन, जप-तप वगैरे वगैरे मार्गांबरोबरच मंदिरात किंवा धार्मिक स्थळांत जाऊन मानसिक आधार शोधण्याचीही हजारो वर्षांची परंपरा रुजली. आता कोरोनाचा जीवघेणा प्रभाव कमी होत असून ‘अनलॉक-४’ टप्पा सुरु झाला आणि ‘अनलॉक-१, २, ३’ मध्ये टाळे लावलेल्या अनेक आस्थापना, कार्यालये व त्यांच्या गतिविधी खुल्या झाल्यात. अशा परिस्थितीत केवळ मंदिरे व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यातून नेमके काय साधले जाणार, मंदिरावर अवलंबून असलेल्यांच्या रोजीरोटीचा सवाल व संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या उपासना स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याची भूमिका घेतली. वस्तुतः दरवर्षी आषाढी वारीसाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करत लाखो भक्त विठुरायाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी वा मंदिराचा कळस तरी दिसावा, या ओढीने पंढरपुरात येतात. यंदा मात्र, कोरोनामुळे नेहमीप्रमाणे वारी झाली नाही व संतांनी, ‘विठु माझा लेकुरवाळा, संगे भक्तांचा मेळा’ असे वर्णन केलेल्या विठ्ठलाची नगरी सुनीच राहिली. त्याच नगरीत प्रकाश आंबेडकरांनी मंदिराचे दार उघडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या साथीने सरकारला इशारा दिला, जेणेकरुन यापुढे तरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह अन्य मंदिरेही कुलुपबंद राहणार नाहीत. तत्पूर्वी भाजपनेही शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले होते. दोन्ही आंदोलनांचा परिणाम म्हणून आता राज्य सरकारने आठ-दहा दिवसांत मंदिरे उघडण्याबाबत नियमावली जारी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, ते त्यांनी पाळावे.


दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनाकडे व घेतलेल्या भूमिकेकडे सामाजिक क्रांतीचा आरंभ या दृष्टीनेही पाहता येईल. एक राजकारणी आणि आतापर्यंत ज्यांचे नेतृत्व केले त्यांच्याव्यतिरिक्त इतर समाजही आपल्या मागे उभा राहावा, अशी आशा असली तरी प्रकाश आंबेडकरांनी मंदिरे खुली करण्याची मागणी करत समाजकंटकांना धक्का दिला आहे. कारण, गेल्या दोन-तीन दशकांत महाराष्ट्रात पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू देवी-देवता व उपासना पद्धती तसेच मंदिरांवर अतिशय विषारी व विखारी भाषेत टीका-टिप्पणी करण्यात आली. अजूनही कित्येकांकडून हा प्रकार सुरूच असून सामाजिक वातावरण गढूळ करणार्‍या जातीय-धार्मिक विद्वेषाच्या माध्यमातून एका समाजाला दुसर्‍या समाजापुढे उभे करण्याच्या नादातून शत्रुत्वाची भावना वाढीस लावली जात आहे. त्यातच आपल्या जाती-धर्मात महापुरुष तर इतरांमध्ये केवळ खलपुरुषच निपजल्याचे चित्र रंगवण्याचा प्रकारही होत आहे. मात्र, यातून एकाच भारतमातेच्या पुत्रांमध्ये, संविधानातील तरतुदींनुसार जीवन जगणार्‍यांमध्ये फूट पडत आहे, भेदभाव वाढीस लागला आहे. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर स्वतःहून पुढाकार घेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर दरवाजा उघडण्यासाठी उभे ठाकले व यामुळे समाजकंटकांनी जाती-धर्मात तेढ माजवून आपला-परका असा कृत्रिम भेद निर्माण केल्याने उद्भवलेली कोंडी फुटण्यास नक्कीच मदत झाल्याचे म्हणता येते.


दरम्यान, ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’ ही भारतीय परंपरा राहिली आणि संविधानानेदेखील प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य-उपासना स्वातंत्र्य देत त्याचेच निर्वाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील धर्म नाकारला नव्हता, तर धर्माची गरज सर्वांना असते, असे प्रतिपादन केले होते. असे असले तरी धर्मविध्वंस किंवा भारतीय संस्कृती-वारशाला उद्ध्वस्त करणे म्हणजेच पुरोगामित्व, म्हणजेच अंधश्रद्धामुक्ती वगैरे चाळे गेल्या काही वर्षांत फोफावले. त्यातून प्रामख्याने हिंदू श्रद्धास्थानांवर आघात करण्यात आला, त्यांचा अवमान केला गेला. त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील, तसेच समाजमाध्यमांवरही असा प्रकार होताना दिसून येतो. पण, प्रकाश आंबेडकरांनी मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी व त्यासाठी आंदोलन करत समाजाला संदेश देण्याचे कामही केले. उपासना करताना कोणत्याही प्रकारची आडकाठी व अडथळा नको, तसेच कोणालाही हीन लेखण्याचे कारण नाही, आपली उपासना पद्धतीच श्रेष्ठ व इतरांची कनिष्ठ असे मानण्याचेही कारण नाही, हेही या आंदोलनातून सांगितले गेले. आताच्या काळात विद्वेषाचे राजकारण करत त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजणार्‍यांमध्ये अशी समन्वयाची भूमिका घेणारे कमीच आढळतात. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेत सामाजिक वीण घट्ट करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे.


आगामी काळात कोरोनाचा प्रभाव आणखी कमी कमी होत जाईल व आधीच सहिष्णु व नियमपालनाला प्राधान्य देणारा हिंदू समाज मंदिरातही माहामारीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवेश करेलच. पण, प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून ते होत असेल तर त्याचे वेगळे महत्त्व आहे. कारण, एकाच हिंदू समाजाचे घटक असलेल्या दोन समाजांना परस्परांपासून तोडून टाकण्याचे डाव भारतविखंडन शक्तींकडून अनेकदा आखले गेले. पण, संविधानाने सर्वांनाच समान मानले असून प्रकाश आंबेडकरांनी मंदिरप्रवेशाची मागणी करत आपण भारतविखंडन शक्तींपैकी नाहीत, हेही दाखवून दिले. मात्र, प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका केवळ आतापुरती न राहता भावी काळातही राहायला हवी, हीच सर्व भारतीयांची अपेक्षा. जेणेकरुन भारतीय समाज एकरस, समरस होण्यात त्यांचाही हातभार लागेल.





@@AUTHORINFO_V1@@