बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020
Total Views |
aditya _1  H x

वरळीतील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला!


मुंबई : राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वरळीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसे प्रवेश केल्याने राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.


भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात दोन माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदारसंघात सामान्य लोक स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत”, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.







याआधी औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागात कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.


काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना राणावत वादावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साद घातली होती. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे सांगत राऊत यांनी राज ठाकरेंना साद घातली होती.




@@AUTHORINFO_V1@@