उत्तर प्रदेशात साकारणार नवी फिल्मसिटी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020
Total Views |

Filmcity_1  H x


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा!


नवी दिल्ली : देशात सध्या चांगल्या फिल्मसिटीची गरज आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश जबाबदारी घेण्यास तयार आहे. राज्यात नोएडा, ग्रेटर नोएडा अथवा यमुना एक्स्प्रेस वे येथे सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक अशी फिल्म सिटी उभारण्यात येईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केले आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबईतील चित्रपटसृष्टी सध्या नकारात्मक कारणांसाठी चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सध्या सीबीआय करीत आहे तर त्यामध्ये अंमली पदार्थाच्या वापराचा संशय असल्याने एनसीबीदेखील चौकशी करीत आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री कंगना रनौतसह अनेक जणांनी बॉलिवूड आणि ड्रग्ज माफिया यांच्या संबंधांविषयी आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशात आता चित्रपट निर्मितीची नवी केंद्रे तयार होण्याविषयीचे वातावरण तयार होत आहे.


त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात अत्याधुनिक फिल्मसिटी उभारण्याची तयारी केली आहे. त्याविषयी माहिती देताना त्यांनी ट्विट करताना म्हटले, सध्याच्या काळात देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज आहे आणि ती जबाबदारी घेण्यासाठी उत्तर प्रदेश तयार आहे. राज्यात नोएडा, ग्रेटर नोएडा अथवा यमुना एक्स्प्रेस वे या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक अशी फिल्म सिटी उभारण्यात येईल. या नव्या फिल्मसिटीमध्ये चित्रपटनिर्मात्यांना एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. त्याचप्रमाणे यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारदेखील निर्माण होतील, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.


अर्थात, केवळ घोषणा करून योगी आदित्यनाथ थांबलेले नाहीत. त्यांच्या सरकारने त्यासाठी आवश्यक के प्रयत्न सुरू केल आहेत. नवी अत्याधुनिक फिल्म सिटी उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या चित्रपट निर्मिती धोरणात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी चित्रपटक्षेत्रातील नामवंत दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांची मदत घेतली जात आहे. त्यामध्ये निर्माते सुभाष घई, बोनी कपूर, गायक उदित नारायण, अनुर जलोटा यांच्यासह अन्य व्यक्तींचा समावेश आहे. राज्यात २०० कोटी रूपये खर्च करून फिल्म इन्स्टिट्यूट आणि स्टुडिओ उभारण्यासाठी बोनी कपूर यानी सामंजस्य करार केला आहे. त्याचप्रमाणे अनेकांना राज्यात प्रॉडक्शन हाऊस, स्टुडीओ, प्रयोगशाळा उभारण्यास रस दाखविला आहे. त्यामुळे आता धोरणात बदल करून चित्रपट उद्योगाला सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याची तयारी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.



जागांचा शोध सुरू, लवकरच होणार ठिकाण निश्चित

फिल्म सिटी उभारण्यासाठी योग्य जागेचा शोध घेण्यास उत्तर प्रदेश प्रशासनाने प्रारंभ केला आहे. त्यासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा, यमुना एक्स्प्रेस वे यासह अन्य ठिकाणांचा विचार होत आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे २०० एकर जमिन निश्चित केली जात आहे. त्यापैकी योग्य त्या ठिकाणीविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या एका दशकात उत्तर प्रदेशात २००० हून अधिक चित्रपट, वेब सिरीज, सिरियल्सचे चित्रीकरण झाला आहे. त्याचप्रमाणे २० पेक्षा जास्त मेगा हिट ठरलेले चित्रपटही राज्यातच चित्रित झाले आहेत. राज्य सरकारने ५६ चित्रपटांना ३० कोटींहून अधिक अनुदानही दिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात चित्रपट उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे.





@@AUTHORINFO_V1@@