ये कंपनी नही चलेगी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020   
Total Views |
1_1  H x W: 0 x


शोहरत की बुलंदी भी
पल भर का तमाशा हैं,
जिस डाल पे बैठे हो
वो टूट भी सकती हैं
 
बशीर बद्र यांची ही शायरी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सद्यस्थितीचेच जणू अचूक वर्णन करते. पाकिस्तानी लष्कराच्या फांदीवर बसूनच खान ‘शोहरत की बुलंदी’पर पोहोचले. पण, आता त्या फांदीलाही खान यांचे वजन पेलवेनासे झाले असून फांदीसकट ही ‘खान-ए-शोहरत’ कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
 
 
कारण, सध्या ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या टांगत्या तलवारीने खान अस्वस्थ आहेत. कारण, ‘ग्रे’ लिस्टमधून पाकिस्तान काळ्या यादीत गेल्यास, आधीच डबघाईला आलेल्या या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरणे जवळजवळ अशक्यप्राय ठरेल, म्हणूनच पाकिस्तानी संसदेत विरोधकांच्या हातापाया पडत देशहिताच्या नावाखाली ‘एफएटीएफ’ संबंधी विधेयके खान यांनी कशीबशी पारितही करून घेतली.
 


पण, लष्कराच्या तालावर कदमताल करणारे इमरान खान एवढ्यावरही थांबले नाहीत. आपल्यावर आणि लष्करावर सातत्याने होणारे टीकेचे वार थोपवून टाकण्यासाठी त्यांनी एक काळा कायदाच पारित केला. त्यानुसार पाकिस्तानी लष्कराविरोधात कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी आढळल्यास संबंधित व्यक्तीला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड अथवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानमधील अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा हा अश्लाघ्य प्रकार म्हणावा लागेल.
 
पण, पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या तालावर नाचणार्‍या पंतप्रधानांना असा कायदा का करावा लागला, ते गेल्या काही दिवसांत तिथे घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. पाकिस्तानी पत्रकार सुहेल वारियाच यांचे ‘ये कंपनी नही चलेगी’ नावाचे पुस्तक पाकिस्तानात प्रदर्शित झाले. हे पुस्तक म्हणजे सुहेल यांच्या उर्दू वर्तमानपत्रांतील प्रकाशित स्तंभांचे एक संकलन. पण, पुस्तकांच्या स्टॉलवरून हे पुस्तक प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांतच गायब करण्यात आले. वरील छायाचित्रावरून पुस्तकाला विरोध का, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
 
एवढेच नाही, तर या पत्रकाराला त्याच्या पुस्तकाविषयीच्या सोशल मीडियावरील पोस्टसही हटविण्याची तंबी देण्यात आली. कारण, पुस्तकात काय आहे, त्यापेक्षा पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील खुर्चीवर बसलेल्या लष्करप्रमुख बाजवांच्या पायाशी चेंडू घेऊन खेळणारे इमरान खान पाहूनच खान आणि लष्काराची ‘कंपनी’ भडकली. गेल्यावर्षीही खालिद हुसेन यांचे ट्रम्प मोदींशी चर्चा करताना आपल्या हातातील काश्मीरचे गाजर इमरान खान यांना दाखवतानाचे व्यंगचित्र वादग्रस्त ठरवून हटविण्यात आले होते. एवढेच नाही तर गेल्या आठवड्यात लष्करावर टीका केल्यामुळे तीन पत्रकारांना अटक करण्यात आली, तर ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’चे संपादक बिलाल फारुखी यांना गायब करून नंतर गुपचूप सोडण्यातही आले.
 
खरं तर पाकिस्तानात माध्यमांची मुस्कटदाबी नवीन नाही. अजूनही पाकिस्तानी चर्चासत्रांमध्ये अतिशय सावधपणे, घाबरून, शब्द जपून वापरून पाकिस्तानी लष्करावर टीका केली जाते. पण, आता या नवीन कायद्यामुळे पाकिस्तानी माध्यमांचे तोंड कायमचेच दाबले जाणार आहे. शिवाय, कराचीमध्ये उसळलेल्या शिया-सुन्नी दंगली, त्यामागील लष्कराचाच सहभाग, लष्कराची भ्रष्टाचाराची प्रकरणं काही धाडसी पत्रकारांनी गेल्या काही काळात चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारसह लष्करही धास्तावले आणि परिणामी, हा काळा कायदा. आज पाकिस्तान आतून-बाहेरून अनेक उलथापालथींनी पिचला आहे. त्यामुळे पत्रकार सुहेल यांचे ‘ये कंपनी नही चलेगी’ हे भाकित खरे ठरण्याचीच शक्यता नाकारता येत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@