पुन्हा ‘लॉकडाऊन’च्या दिशेने?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |
Mumbai_1  H x W





मुंबईत कालपासून ‘जमावबंदी’चा आदेश जारी करण्यात आला आहे आणि ते योग्यही आहे. कारण, कोरोनाची सुरुवात होती, तेव्हा आपण दक्षता घेतली आणि आता तो परमोच्च बिंदू गाठण्याच्या दिशेने धाव घेतो आहे, तर आपण गाफील आहोत. आज कोठेही बाहेर फिरलो तरी मुंबईवर जागतिक महामारीचे संकट आहे, असे भासत नाही. सर्व व्यवहार नित्यनेमाने चालले आहेत. या आजाराचा शिरकाव झाला, तेव्हा शत्रू आपल्या दारापर्यंत आला आहे, असे समजून प्रत्येक जण खबरदारी घेत होता. पण, आता लोक स्वतःहून शत्रूच्या गोटात शिरत आहेत, याला पायबंद बसला पाहिजे होता. त्यासाठी ‘जमावबंदी’ची कडक नियमांची अंमलबजावणी आवश्यक होती, ती पोलिसांनी पुन्हा सुरू केली. ‘जमावबंदी’चा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत नव्हे, तर कोरोनाचा निप्पात होईपर्यंत पुढे चालू राहील, असेही आदेश निघणे आवश्यक आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने आतापासूनच विचार करायला हरकत नाही. पोलीस मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस येतीलच, असे होणार नाही. त्यामुळे आपणच आपली काळजी घेणे प्रत्येकाचे ‘परम’कर्तव्य ठरते. गल्लोगल्ली भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेतली आणि नाक्यानाक्यांवर मास्कचा वापर दाढीसारखा करत, गाफील राहत गप्पा छाटणारी तरुणाई पाहिली की, कोरोना लवकर जाईल, असे वाटत नाही. तो जाईल; पण आपणा सर्वांना घेऊन जाईल. ती वेळ यायला नको असेल तर कामाशिवाय बाहेर न पडणे, बाहेर पडल्यास तोंडावर मास्कचा वापर करणे आणि दोघांच्या मध्ये जास्तीत जास्त अंतर राखणे, बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे, हे मूलभूत नियम पाळणे आवश्यक आहे; अन्यथा ‘जमावबंदी’च्या आदेशाचे रूपांतर कोणालाच न परवडणार्‍या ‘लॉकडाऊन’च्या दिशेने कधी होईल, हे सांगता येणार नाही. मागील पाच महिने सर्वांनी ‘लॉकडाऊन’च्या झळा सोसल्या आहेत. पुन्हा ‘लॉकडाऊन’ झाल्यास हाता-तोंडाची गाठ पडणे मुश्कील होईल. पुन्हाचे ‘लॉकडाऊन’ आपणा सर्वांना परवडणारे नक्कीच नसेल.

विरोधाभासाचा निर्णय


मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णवाढीने उच्चांक गाठला आहे. मुंबईत २६००च्या आसपास, तर राज्यात २६ हजारांपर्यंत रुग्णसंख्या गेल्यानंतर नागरिकांसह शासनस्तरावर सर्वांनी खबरदारी बाळगली पाहिजे. पण, या आकस्मिक संकटाने राज्य यंत्रणा हादरून गेल्याचे आणि संभ्रमित झाल्याचे दिसते. कोणत्या वेळी काय निर्णय घ्यावा, हे सूचत नसल्याने अयोग्य निर्णय घेतले जात आहेत. मुंबईत रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी ‘जमावबंदी’चा आदेश जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी ‘अनलॉक-४’ जाहीर झाल्याने कामाधंद्यानिमित्त बसस्टॉपवर लोक ५०-१००च्या घोळक्याने एकत्र जमलेले दिसत आहेत. ‘बेस्ट’ बसेस अपुर्‍या असल्याने त्या घोळक्यात प्रवाशांची भरच पडत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘बेस्ट’चे अधिकारी पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यासाठी चालक-वाहकांवर दबाव आणत आहेत. हा त्या चालक-वाहकांवर अन्याय आहे. अपुर्‍या साधनांअभावी धावणार्‍या ‘बेस्ट’ बसमध्ये त्यांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. ‘बेस्ट’ने २९ ऑगस्टला जाहीर केल्यानुसार १,६५८ कर्मचारी कोरोनाबाधित होते, त्यापैकी १,६५६ बरेही झाले. रिकव्हरी रेट ९० टक्के होता. त्याचवेळी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ११८ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. शिवाय, तोपर्यंत ११ मृत्यू होते. कामगार संघटनांच्या मते मृत्यू जास्त आहेत. म्हणजे आकडेवारीत विरोधाभास दिसतो आहे. तरीही ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी त्यांची अवस्था आहे. तीच अवस्था एसटी कर्मचार्‍यांची आहे. एसटी महामंडळातील ३०३ जणांना लागण झाली असून, १६० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सात जणांचा मृत्यू झाला होता. यात आता निश्चितच वाढ झाली असणार. एकीकडे कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून रेल्वे सुरू करण्याबाबत दीर्घ विचार करण्यात येत आहे, तर ‘एसटी’ आणि ‘बेस्ट’ बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. लोकसेवेसाठी शासनाने ‘बेस्ट’च्या ताफ्यात तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या जादा गाड्या पुरवाव्या. तसेच, एसटी गाड्या पूर्ण क्षमतेने न चालवता एक सीट पद्धतीने चालवाव्या ; अन्यथा एकीकडे ‘जमावबंदी’ आणि दुसरीकडे ‘गर्दी’ हा विरोधाभास ठरेल.
- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@