मुंबई : राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केला. परंतु या निर्णयाला मराठा समाजाच्या नेत्यांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अशावेळी राज्यात पोलीस भरतीचा निर्णयाविरुद्ध मराठा समाजातून संतापाची भावना व्यक्त होत असून विरोधी पक्ष भाजपनेही महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका करणारे ट्विट केले. ते लिहितात,"राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती.मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ?आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटमधून केला आहे.
राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एवढी मेगाभरती राज्यात पहिल्यांदाच होत आहे. राज्यात सध्या पोलीस शिपायांची संख्या ९७ हजार इतकी आहे. शिपायांमधून पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक ४२ हजार, हेड कॉन्स्टेबल ४३ हजार आणि एएसआय २० हजार अशी संख्या आहे. नव्या भरतीमुळे सध्याच्या यंत्रणेवरील भार हलका होईल. २०१९ आणि २०२० या वर्षांत साडेबारा हजार पदे भरण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे. २०१९ मध्ये ५२९७ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. मात्र, राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच प्रकारच्या शासकीय नोकर भरतीस मनाई करण्यात आली होती.