सच कडवा होता है...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020   
Total Views |

Jaya Bacchan _1 &nbs
 
 
 
भाजपचे खासदार आणि भोजपुरी-बॉलीवूड सिनेसृष्टीतील अभिनेता रविकिशन यांनी संसदेतील पावसाळी अधिवेशनात बॉलीवूड आणि ‘ड्रग्ज कनेक्शन’चा मुद्दा उपस्थित केला. त्यावर समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी आक्षेप घेत, रविकिशन यांना खडे बोल सुनावले. “ज्या थाळीत खाता, त्याच थाळीत छेद करता,” असे म्हणत जया बच्चन यांनी रविकिशन यांचे नाव न घेता त्यांना धारेवर धरले. त्यावरून सध्या सोशल मीडियावरही चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले दिसते. बॉलीवूडमधील सगळेच कलाकार ड्रग्ज घेतात, असे रविकिशन यांचे म्हणणे मुळीच नव्हते. त्यांनी गेल्या काही महिन्यांत उजेडात आलेल्या घटनांचा हवाला देत, हे प्रकार थांबले पाहिजेत, एवढीच अपेक्षा व्यक्त केली. पण, मिरची झोंबली ती बच्चन बाईंना. रविकिशन यांचा हा दावा म्हणजे संपूर्ण सिनेसृष्टीचा घोर अपमान या अर्थाने जयाबाई पेटून उठल्या. कारण, यापूर्वी कधीही बॉलीवूडची ही काळी बाजू संसदेच्या पटलावर आलीच नव्हती. बॉलीवूडमधील कित्येक अभिनेता-अभिनेत्री खासदार, आमदार झाले. पण, आतली इत्थंभूत माहिती असूनही त्यांनी कधीही तोंडातून ‘ब्र’ काढला नाही. हा मुद्दा संसदेत, विधानसभेत उपस्थित करणे तर दूरच. कारण, त्यांनी तसे केले असते तर त्यांचे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे उरलेसुरले सिनेकरिअरही सुरू होण्यापूर्वीच पडद्याआड गेले असते. पण, आता विषय निघालाच आहे, तर तो दूरवर जाईल, हे निश्चित. खरं तर जया बच्चन आणि बॉलीवूडमधील बहुतांश सेलिबे्रटींना ड्रग्जचे सेवन करणे, माफियांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणे यात मुळातच काही गैर वाटत नाही. कारण, गेली कित्येक वर्षं हे असेच सुरू आहे. बॉलीवूड आणि राजकारण असेच हातात हात घालून एकमेकांना सावरत, सांभाळतच सुरू होते. पण, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाने बॉलीवूडमधील राजकारण आणि राजकारणातील बॉलीवूडच्या धाग्यांना पुरते उसवून टाकले. त्यातच जयाबाईंना बॉलीवूडची इतकीच काळजी असती, तर त्यांनी या क्षेत्रात छोटे-मोठे काम करणार्‍या आणि सध्या बेरोजगार झालेल्यांविषयी संसदेत आवाज का उठवला नाही? त्यांच्यासाठी मदतीची मागणी का बरं केली नाही? याची उत्तरं त्यांनी जरूर द्यावी आणि बॉलीवूडला ‘ड्रग्ज’च्या, ‘कास्टिंग काऊच’च्या विळख्यातून मुक्त करण्यासाठीही सक्रिय पुढाकार घ्यावा.
 
 
 

जनता की अदालत...

 
 
 
बॉलीवूडमधील आपला मनपसंत अभिनेता, अभिनेत्री कुठल्या का गुन्ह्यात अडकेना, त्याच्या सिनेमावर किंवा ‘फॅनफॉलोईंग’वर फारसा फरक पडल्याचे ऐकिवात नाही. मग तो मुंबई दंगलीच्या वेळी हत्यारे बाळगणारा संजय दत्त असेल; अथवा वांद्य्राच्या फूटपाथवर झोपलेल्यांना भरधाव गाडीखाली चिरडणारा सलमान खान. पोलीस, न्यायालयीन खटले सगळे सोपस्कार झाले. पण, यांचा कामधंदा आणि फॅन्सची संख्या ‘जैसे थे’च राहिली. पण, आज जमाना बदलला आहे. एखाद्यावेळी मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून या सेलिब्रिटींची कातडी वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसा तो वेळोेवेळी झालाही; पण आता जमाना आहे सोशल मीडियाचा. त्यामुळे आपण काहीही केले, कसेही वागलो तरी आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, या भ्रमात बॉलीवूडने राहू नये. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर महेश भट यांच्या ‘सडक’ चित्रपटाच्या युट्यूबवरील ट्रेलरवर नेटकर्‍यांच्या नापसंतीचा अक्षरश: पाऊस पडला. तसेच सलमान खानचा ‘बिग बॉस’चा सीझनही धसका घेऊन पुढे ढकलल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमांतून या सेलिब्रिटींना थेट प्रेक्षकांच्या प्रेमाबरोबरच रोषालाही सामोरे जावे लागते, याची उदाहरणे आपण वाचत असतो, पाहत असतो. तेव्हा, सेलिब्रिटींवरील ‘ब्लाईंड ट्रस्ट’चा जमाना आता गेला. लोक हुशार आहेत. ते अधिक जागरूक आणि सजग झाले आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या पलीकडचे विश्व आणि त्यातील घडामोडींचा त्यांच्यावर जास्तीत जास्त परिणाम होताना दिसतो. सुशात सिंह राजपूत प्रकरणाचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच. सुशांतच्या जगभरातील चाहत्यांनी एकत्र येत त्याच्या मृत्यूची ‘सीबीआय’ चौकशी व्हावी म्हणून डिजिटल मोहीम राबविली आणि त्याला यशही आले. एवढ्यावरही काही नेटकरी थांबले नाहीत, तर एक प्रकारची समांतर चौकशी आणि या प्रकरणातील संबंधितांचा पदार्फाश करणारे व्हिडिओ, पुरावे हेही या निमित्ताने समोर आणले. भारताच्या डिजिटल विश्वाची पकड अधिक घट्ट करणारी आणि अनेकांचे डोळे खाडकन उघडणार्‍या अशा काही घटना गेल्या महिन्यांत घडल्या आहेत. यामध्ये विशेषत्वाने बॉलीवूड पूर्णत: ढवळून निघाले असून ‘कोविड’पश्चात सगळे काही सुरळीत झाले तरी बॉलीवूडला जनतेला, प्रेक्षकाला अजिबात गृहित न धरता, सावधपणे एक एक पाऊल टाकावे लागेल, हे नक्की!
@@AUTHORINFO_V1@@