विश्वकर्मा जयंती - भारतीय राष्ट्रीय श्रमिक दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
god-vishwakarma _1 &




आज दि. १७ सप्टेंबर ‘विश्वकर्मा जयंती.’ हा कन्या संक्रातीचा दिवस. याच दिवशी भगवान विश्वकर्माचा जन्म झाला. हा दिवस हजारो वर्षांपासून आपल्या देशातील श्रमिक ‘विश्वकर्मा जयंती’ म्हणून साजरा करतात. विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात. त्यानिमित्ताने...
 
 
 
श्रमिक म्हणजे श्रम करणारा, नवनिर्मिती करणारा. भारतीय संस्कृतीनुसार भगवान विष्णूने सृष्टीची निर्मिती केलेली आहे. या सृष्टीमध्ये मानवी जीवनास आवश्यक असणार्‍या विविध गरजांची निर्मिती भगवान विश्वकर्माने केलेली आहे. इंद्राची नगरी स्वर्ग, श्रीकृष्णाची द्वारका, अलंकापुरी, रावणाची लंका, भगवान शंकराच्या आज्ञेवरुन ॠषीच्या निवासासाठी आठ योजने व्यासाची नगरी, पांडावांचे इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर या नगरांची निर्मिती भगवान विश्वकर्माने केली. स्वयंचलित व संचालित आकाश व समुद्र यामध्ये लढण्यासाठी विविध अस्त्राची निर्मिती, रामायणातील पुष्पक विमान आदींची निर्मिती विश्वकर्माने केलेली आहे. त्यामुळेच विश्वकर्माला अनन्यसाधारण महत्त्व व मानसन्मान होता.
 
 
 
विश्वकर्माचा उल्लेख रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद, उपनिषद, स्कंदपुराण, भागवत आदी प्राचीन ग्रंथांत आढळतो. त्यामुळेच कालांतराने विश्वकर्मा ही एक व्यक्ती राहिली नसून विविध कामे म्हणजे स्थापत्त्य, अभियंता, कलाकुसर आदी कामे करणार्‍या व्यक्तींचा समूह म्हणून पुढे आलेला आहे आणि या सर्वांना त्यांच्या कलागुणांमुळे ‘विश्वकर्मा’ म्हणूनच संबोधले जाते. आपल्या देशात आजही विविध कामे करणारे कारागीर सुतार, लोहार, सोनार, चांभार आदी बारा बलुतेदार जे कोणाचेही नोकर नव्हते, नाहीत मात्र ते उत्तम शिल्पी आहेत, ते आजही विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात. अनेक राज्यात ‘विश्वकर्मा जयंती’ हा सुट्टीचा दिवस असतो. कामगारांना सन्मान म्हणून विश्वकर्मा सन्मान प्रमाणपत्र दिले जाते. अशाप्रकारे विश्वकर्माला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व आहे.
 
 
 
 
विश्वकर्मा केवळ कलागुणांमुळेच नव्हे, तर त्याच्या त्यागासाठीसुद्धा स्मरणात राहणारा आहे. आपला पुत्र वृत्रासूर जो शूरवीर होता, परंतु अहंकारामुळे समाजाला त्रासदायक ठरला होता. समाजहितासाठी त्याचा वध करणे आवश्यक होते. मात्र, त्याने शंकराच्या केलेल्या तपस्येमुळे त्याचा वध करणे सोपे नव्हते. म्हणून त्याच्या वधासाठी दधीची ऋषींनी आपला देहत्याग केला आणि विश्वकर्माने त्यांच्या अस्थींपासून शस्त्र बनविले आणि त्याद्वारे इंद्राने वृत्रासुराचा वध केला, अशी कथा आहे. विश्वकर्माने आपल्या कर्तृत्वाबरोबरच समाजहितासाठी पुत्राचा त्याग करुन, समाजापुढे आदर्श निर्माण केला. समाज तोडण्याचे नव्हे, तर जोडण्याचे काम केले. त्यामुळे श्रमिक समाज त्यांना आदर्श मानतो.
 
 
वर्षानुवर्षापासून ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस आपल्या देशात ‘श्रमिक दिन’ म्हणून पाळतात. तोच आपला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ असावा असा आग्रह भारतीय मजदूर संघाने धरलेला आहे. सन १९५५ या स्थापना वर्षापासून भारतीय मजदूर संघ ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणून साजरा करत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश आदी उत्तर भारतात या दिवशी सुट्टी असते. पश्चिम बंगालमध्ये अन्य दिवशी ‘विश्वकर्मा जयंती’ साजरी करतात. तिथी वेगळी असेल, मात्र भावना एकच असते. स्वयंरोजगार करणारा मोठा वर्ग भारतात आहे, त्याला ‘विश्वकर्मा सेक्टर’ असेच म्हटले जाते.
 
 
 
आज आपल्या देशात १ मे हा दिवस ‘कामगार दिवस’ म्हणून पाळला जातो. ४ मे १८९४ साली अमेरिकेतील शिकागो या शहरात कामाचे तास आठ करा, या मागणीसाठी कामगारांच्या निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात अनेक कामगार ठार झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणून पाळावा, असा ठराव १८९६ साली ‘इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस’च्या सभेत करण्यात आला. सन १८९८ पासून १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून अनेक ठिकाणी पाळला जात आहे.
मात्र, हा दिवस पाळण्याचे उद्देश वेगवेगळे आहेत. युरोपियन राष्ट्र साम्यवादाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी या दिवशी प्रतिज्ञा करतात, तर रशियाच्या गटातील देश भांडवलवाद्यांचे वर्चस्व नाहीसे करण्याचा संकल्प करतात. म्हणून दिवस एकच असला तरी उद्देश मात्र वेगवेगळे आहेत.
 
 
 
‘जगातील कामगारांनो एक व्हा’ अशी घोषणा दिल्यानंतरही जगातील कामगार एक झालेले नाहीत. महायुद्धानंतरही जगातील कम्युनिस्ट विचारांचे विविध तीन फेडरेशन एकत्र येऊ शकले नाहीत. जगात दुसर्‍या महायुद्धानंतर ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन’ ही संघटना निर्माण झाली. परंतु, लवकरच तिच्यामध्ये फूट पडली आणि ‘इंटरनॅशनल कॉन्फीडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन’ ही संघटना स्थापन झाली. अशा प्रकारे कामगारांमध्ये फूट ही पडतच गेली. ज्या अमेरिकेत शिकागो शहरात ही घटना घडली, त्या देशात १ मे हा दिवस ‘कामगार दिवस’ म्हणून पाळला जात नाही.
 
 
 
अमेरिकेसह विविध देशात विविध दिवस ‘कामगार दिन’ म्हणून पाळले जातात. ऑस्ट्रेलियात राजधानी आणि दक्षिण ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार, तर पश्चिम ऑस्ट्रेलियात मार्च महिन्याचा पहिला सोमवार हा दिवस कामगार दिन असतो. बांगलादेशामध्ये २४ एप्रिल हा दिवस, अमेरिका व कॅनडामध्ये १८८४ पासून सप्टेंबर महिन्याचा पहिला सोमवार हा ‘कामगार दिन’ असतो, तर जपानमध्ये २३ नोव्हेंबर हा दिवस ‘लेबर थॅक्स गिव्हिंग डे’ म्हणून पाळतात. न्यूझीलंडमध्ये १९९५ पासून ऑक्टोबर महिन्याचा चौथा सोमवार तर त्रिनिनाद व टोबॅगोमध्ये २४ जून आणि कजाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हे दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरे करतात. अशाप्रकारे जगात विविध दिवस ‘कामगार दिन’ म्हणून पाळले जातात. अनेक देशांमध्ये ‘कामगार दिन’च नसतो. फक्त दुसर्‍या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या विचाराने सोव्हिएत युनियनमध्ये सहभागी झालेल्या कम्युनिस्ट देशांमध्ये १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून पाळला जातो. अशाप्रकारे विविध देशांमध्ये त्यांचे ‘कामगार दिन’ वेगवेगळे साजरे केले जातात.
 
 
 
आपल्या देशात निसर्ग, प्राणी, पक्षी यांचादेखील सन्मान केला जातो. शेतकर्‍यांचा सहकारी असणार्‍या बैलाचीदेखील पोळ्याच्या दिवशी पूजा केली जाते. त्यामुळे रात्रंदिवस कष्ट करुन मानवी जीवन सुसाहाय्य करणार्‍या श्रमिकांचा सन्मान करणारा दिवस असणार नाही का? ‘विश्वकर्मा जयंती’ हा तोच दिवस. परंतु, परकीय आक्रमणाच्या काळात आलेल्या वैचारिक आक्रमणाने त्याचे महत्त्व व भूमिका कमी झालेले दिसते. साम्यवाद्यांची कामगार चळवळ वर्ग संघर्षाला प्राधान्य देते. ‘जगातील श्रमिकांनो एक व्हा,’ अशी घोषणा देऊन श्रमिकांना समाजापासून वेगळे करते, तर ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस श्रमिकांचा सन्मान करतो. त्यामुळेच ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, असा आग्रह भारतीय मजदूर संघाने धरलेला आहे. या विश्वकर्माच्या जयंती निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
 
 
 
- अ‍ॅड अनिल ढुमणे


 (लेखक सेक्रेटरी, भारतीय मजदूर संघ मुंबई एवं महाराष्ट्र प्रदेश,
संघटक - कोकण प्रांत आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@