उदयनराजेंनी मराठा आरक्षण लढाईचे नेतृत्व करावे : विनायक मेटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
udayan raje_1  

राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा; विनायक मेटेंचा राज्य सरकारला इशारा


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापू लागले आहे. एकीकडे मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, राजकीय नेतेही संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. मराठा समाजाला परत आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना, अनेक राजकीय पक्ष मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. मात्र या मागणीमध्ये एकवाक्यता बघायला मिळत नाही. “या जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे १३ वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावे, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे,” असे विनायक मेटेंनी म्हटले आहे.


यासंदर्भात लवकरच मराठा आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घ्यावी आणि त्याचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार केवळ पोकळ आश्वासन देत आहे. अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांना एकाच मंचावर आणून आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मेटे यांनी केले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व पक्षनेत्यांसोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांकडून फक्त पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार हेदेखील कधीही मराठा आरक्षणावर कधीही बोलले नाहीत.


समाज त्यांना मानतो, मात्र समाजासाठी ते बोलायला तयार नाहीत, असा आरोप विनायक मेटे यांनी पवारांवर केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यात अनेक संघटना, राजकीय पक्ष आणि नेते वेगवेगळ्या आंदोलनाची हाक देत आहेत. मात्र मराठा आरक्षण परत मिळवण्यासाठी एका नियोजनबद्ध आंदोलनाची गरज असून यासाठी सगळे मराठा समाजातील नेते, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करावे, असे आवाहनही मेटे यांनी केले.





@@AUTHORINFO_V1@@