राज्य सरकारच अवैध निर्माणाचे प्रतीक- डॉ. विनय सहस्रबुद्धे

    16-Sep-2020
Total Views |

vs_1  H x W: 0

राज्य सरकारच अवैध निर्माणाचे प्रतीक- डॉ. विनय सहस्रबुद्धे 


नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : राज्यात काही दिवसांपूर्वी एक अवैध बांधकाम पाडण्यात आले. मात्र, खरे तर ते बांधकाम पाडणारे राज्य सरकारच अवैध निर्माणाचे मोठे उदाहरण आहे, कारण त्या सरकारची निर्मितीच ‘जोडतोड' करून झाली आहे. सरकारचा प्रशासनावर कोणताही वचक नसल्याने राज्यात आता ‘लॉकडाऊन अगेन’ची स्थिती निर्माण झाली आहे, अशी घणाघाती टिका करीत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ठाकरे सरकारचे अपयश राज्यसभेत बुधवारी अधोरेखित केले.

 

राज्यसभेत आरोग्यमंत्र्यांनी कोरोना स्थितीविषयी दिलेल्या निवेदनावर चर्चा झाली. यावेळी डॉ. सहस्रबुद्धे यांनी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांविषयी सांगतानाच महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आणि राज्य सरकारचे अपयश सभागृहासमोर मांडले.

 

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनारुग्ण असलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे. या तिन्ही शहरांमध्ये १ लाखांहून अधिक रुग्णसंख्या असून त्यात दररोज भर पडत आहे. असे असतानाही मुख्यमंत्री आणि राज्य सरकार परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून राज्यात ‘बिगीन अगेन’ होत असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात राज्याची वाटचाल ‘लॉकडाऊन अगेन’कडे होत आहे. काही दिवसांपूर्वी एक अवैध बांधकाम पाडण्यात आले, मात्र खरे राज्य सरकार हे अवैध निर्माणाचे मोठे उदाहरण आहे. कारण या सरकारची निर्मितीच जोडतोड करून झाली आहे, असा घणाघात डॉ. सहस्रबुद्धे यांनी केला.

 
 
 
 

सरकार स्थापनेत ज्यांची महत्वाची भूमिका होती, जे मोठे अनुभवी आहेत; त्यांनी आता आत्मपरिक्षण करावे असा टोला शरद पवारांचे नाव न घेता डॉ. सहस्रबुद्धे यांनी लगाविला. ते पुढे म्हणाले, राज्य सरकार आणि महानगरपालिका, स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही. ठाण्यात मोठा गाजावाजा करून जंबो कोव्हिड सेंटर उभारले, त्यात भाड्याने घेऊन खाटांची सोय केली. कदाचित त्यातही आर्थिक लाभाचा काही प्रश्न असू शकेल. मात्र, ते चालविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कारण आरोग्य सेवेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.

 

राज्य सरकारने कोरोनास्थितीचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्स बनवला होता, त्याचा अहवाल धुळ खात पडला आहे. कार्यालये सुरू केली असली तरी त्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही, परिणामी डोंबिवली ते मुंबई या प्रवासाला तब्बल ७ तास लागत आहेत. राज्यातील व्यापारी सरकारच्या धरसोड वृत्तीला कंटाळला आहे. मात्र, असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री घरातून काम करीत आहेत. राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पीपीई कीट घालून रुग्णसेवा करीत आहेत. भाजप कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर मदत करीत आहेत. मात्र, त्याचे कौतुक करण्याचे सौजन्यही विरोधक दाखवित नसल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.