कोंबड्यांमुळे कोरोना या 'निव्वळ अफवा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
Chicken_1  H x

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई : कोरोना विषाणू कोंबड्या व त्यांच्याशी संबंधित उत्पादनामुळे होतो, या निव्वळ अफवा आहेत. नोव्हेल कोरोना विषाणूंचा कुक्‍कुट पक्षी व त्यांच्या उत्‍पादनाशी काहीही संबध नाही. कुक्‍कट मांस आणि कुक्‍कुट उत्‍पादने पूर्णत: सुरक्षित आहेत. समाज माध्‍यमांवरील अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन, मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


महाराष्‍ट्र राज्‍य कुक्‍कुटपालन व्‍यवसायामध्‍ये देशात अग्रेसर आहे. सन २०१९ च्‍या पशुगणनेनुसार राज्‍यामध्‍ये कोंबड्यांची एकूण संख्‍या सुमारे ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. ‘नोव्‍हेल करोना विषाणू’ प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने गेल्‍या काही दिवसांपासून समाज माध्‍यमावर (सोशल मिडीया) कुक्‍कुट मांस आणि इतर कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्‍त्रीय अफवा पसरविल्‍या जात आहेत. कुक्‍कुट पक्षी व कुक्‍कुट उत्‍पादने यांचा ‘नोव्‍हेल करोना विषाणू’ प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने मानवीय आहारामध्‍ये वापरण्‍यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करावे. याबाबत काही शंका असल्‍यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्‍या पुणे येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा व रोग अन्‍वेषण विभाग यांनी एका परिपत्रकान्‍वये केले आहे. त्यामुळे कोंबड्या, त्यांचे मांस (चिकन) आणि त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजे अंडी आहारात वापरण्यास सुरक्षित असल्याचे पालिकेने म्हटले आहे.


कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या सेवनामुळे मानवामध्‍ये ‘नोव्‍हेल करोना विषाणू’ संक्रमित झाल्‍याचे संदर्भ नाहीत. आपल्‍याकडे चिकन व मटन उकळून शिजवून सेवन केले जाते व त्‍या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहु शकत नाहीत. कोंबड्यांमधील कोरोना विषाणू मानवामध्ये संक्रमित होत असल्याबाबत शास्त्रीय संदर्भ नाहीत. ग्राहकांनी समाज माध्‍यमांद्वारे (सोशल मिडीया) प्रसारित होत असलेल्या किंवा फॉरवर्ड करण्‍यात येणाऱ्या चुकीच्‍या माहितीवर किंवा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आपल्‍याकडील कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने आहारात वापरण्‍यासाठी पूर्णत: सुरक्षि‍त आहेत, अशीही माहिती महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या पशुसंवर्धन आयुक्‍तालयाद्वारे देण्‍यात आली आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.



@@AUTHORINFO_V1@@