अभिमानास्पद! असे असेल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |

agra _1  H x W:



नवी दिल्ली :
आग्रा येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरी मानसिकतेच्या प्रतिकांना कोणतेही स्थान नाही, आपल्या सर्वांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे ट्विट त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर केले आहे.


आग्र्यातील ताजमहालपासून अगदी जवळ असलेल्या ठिकाणी एका नव्या संग्रहालयाची उभारणी केली जात आहे. या संग्रहालयासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च केले जात असून त्यामध्ये मुघलकालीन इतिहास, वस्तु आणि दस्तऐवज, कागदपत्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. त्यासोबतच संग्रहालयात आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचाही समावेश संग्रहालयात करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता संग्रहालयात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित वस्तु, कागदपत्रे आणि संपूर्ण इतिहास मांडला जाणार आहे. त्याचप्रमाणे आग्र्याहून सुटकेचा आणि मुघलांच्या अपमानाचा प्रसंगदेखील संग्रहालयात उभा करण्यात येणार आहे.नोएडा येथील स्टुडीओ अर्कोहोमच्या सहकार्याने डेव्हीड चीपरफिल्ड आर्कीटेक्ट्स ही स्थापत्त्यक्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी या संग्रहालयाची उभारणी करीत आहे. ताजमहालपासून या संग्रहालयाचे अंतर साधारणपणे एक किलोमीटर आहे. अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संग्रहालय उभारणीचा निर्णय घेतला गेला होता. त्यासाठी ५.९ एकर जागा देण्यात आली आहे. संग्रहालयाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी जीवनाचा आग्र्याशी अगदी निकटचा संबंध आहे. मुघल बादशाह औरंगजेबाचा आग्र्याच्या भर दरबारातच शिवाजी महाराजांनी अपमान केला होता. त्यानंतर त्याच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून यशस्वी सुटकाही शिवाजी महाराजांनी केली होती. त्यामुळे मुघलांच्या अपमानाचे प्रतिक म्हणून या दोन घटनांकडे पाहिले जाते. आग्र्यातील मुघलांच्या किल्ल्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हा संपूर्ण देशाला राष्ट्रवादाची आठवण करून देणारा आहे. त्याच आग्र्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अधिक ठळकपणे पुढे आणण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@