शिवसेनेमुळेच अपमान आणि बदनामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |
Uddhav Thackeray_1 &


भारतच काय, जगात कोणतीही उलथापालथ झाली तरी शिवसेनेला मुंबई-महाराष्ट्राचा अपमान, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्मे, मुंबईला खच्ची करण्याचे कारस्थान, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या षड्यंत्रावरून बोंबाबोंब करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण, सकारात्मक व शाश्वत काम करण्याची धमक नसल्याने असला कांगावा करण्याव्यतिरिक्त शिवसेनेचे अस्तित्वच नाही.


मुंबई आणि महाराष्ट्राच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर होत असल्याचा आरोप शिवसेनेने ‘सामना’तून केला. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती आर. बानुमथि यांच्या ‘ज्युडिशियरी, जजेस अ‍ॅण्ड द अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस’ या पुस्तकाचे शनिवारी नवी दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, वरिष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा आणि अन्यही वक्त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मात्र, माध्यमांत मथळ्यांसह वृत्ते आली ती न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या विधानांची.
 
 
ते पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी म्हणाले की, “न्यायाधीशांना आपल्या बचावात बोलण्यापासून रोखले जात आहे. आज न्यायाधीश टीकेला सहज बळी पडताहेत आणि विशेषतः सोशल मीडियामुळे न्यायाधीश विनोदवस्तू होऊन गेले आहेत.” न्या. व्ही. एन. रामण्णा यांच्या बोलण्याचा रोख तथाकथित उदारमतवादी आणि डाव्या कंपूविरोधात होता. कारण, केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून न्यायपालिकेवर तथाकथित लिबरल टोळक्याने सातत्याने टीका-टिप्पणी केली.
 
 
अयोध्येतील ‘श्रीराम मंदिराचा निर्णय’ असो वा ‘राफेल विमान खरेदी करार’ वा इतर कोणताही विषय असो, तथाकथित उदारमतवादी आणि डाव्यांनी त्यावरून न्यायपालिकेच्या विवेकबुद्धीवर, निर्णयक्षमतेवर बोट ठेवले. मनाजोगते निकाल न आल्याने न्यायपालिकेविरोधात अभियान चालवत तिला दुबळे करण्याचे प्रयत्न केले गेले. सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग करण्यात आला. त्यावरच आक्षेप घेत न्या. एन. व्ही रामण्णा यांनी आपले मत मांडले. अर्थात, यावरही चर्चा होऊ शकते. परंतु, कोणत्याही मुद्द्याचा संबंध मुंबई आणि महाराष्ट्रापुरता लावण्याइतकीच समज असलेल्या शिवसेनेने न्यायपालिकेतील एका वरिष्ठ न्यायमूर्तीच्या विधानांवरूनही तेच केले.
 
 
भारतच काय, जगात कोणतीही उलथापालथ झाली तरी शिवसेनेला मुंबई-महाराष्ट्राचा अपमान, मुंबई-महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्मे, मुंबईला खच्ची करण्याचे कारस्थान, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या षड्यंत्रावरून बोंबाबोंब करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण, सकारात्मक व शाश्वत काम करण्याची धमक नसल्याने असल्या कांगाव्याव्यतिरिक्त शिवसेनेचे अस्तित्वच नाही. आताही मुंबई-महाराष्ट्राबाबत गेल्या महिना-दीड महिन्यातील घडामोडींवरून शिवसेनेने अपमान व बदनामीच्याच आरोळ्या ठोकल्या.
 
 
सत्ताधार्‍यांची दिशा सालियान व सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाबाबतची भूमिका, मुंबई पोलीस व सीबीआय चौकशीवरून घातलेला गोंधळ, रिया चक्रवर्तीला पाठीशी घालण्याचा प्रकार, नंतर कंगना राणावतची मुंबई पोलिसांबाबतची टिप्पणी, ठाकरे सरकारच्या कारभारावरील टीका व तिला मिळणारा पाठिंबा, जनमताची राज्य सरकारविरोधातील अभिव्यक्ती आदी विविध मुद्द्यांवरून सर्वसामान्यांनी शिवसेनेला घेरले. सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट, लेख, मीम्स आणि व्यंगचित्रेदेखील प्रसारित करण्यात आली. तथापि, ठाकरे सरकारवरील टीका-टिप्पणीचा संबंध महाराष्ट्र वा मराठी मातीशी अजिबात नव्हता, उलट तो शिवसेनेने स्वतःहूनच जोडला होता.
 
 
तसेच, ठाकरे सरकार वा शिवसेनेवर सोशल मीडियातून होणार्‍या टीकेची तुलना न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या वक्तव्याशी होऊ शकत नाही. कारण, शिवसेना किंवा ठाकरे सरकार न्यायपालिका नाही. न्यायपालिकेवर टीका-टिप्पणी करू नये असा संकेत पाळला जातो. पण, शिवसेना राजकीय पक्ष असून सत्ताधारी आहे आणि त्यांचा कारभार चुकत असेल, काही संशयास्पद वाटत असेल, तर जनतेला त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे. म्हणूनच, शिवसेनेने सोशल मीडियावरून आपल्याविरोधातील टीका-टिप्पणीला बेलगाम, बेछुट वगैरे म्हणण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. जेणेकरून शिवसेनेला आपल्याविरोधात जनतेवर इतकी अनिर्बंध (सामनाच्या भाषेत) टीका करण्याची वेळ का आली, याचे उत्तर मिळेल.
 
 
दरम्यान, शिवसेनेने इतरांच्या कथित बेतालपणावरून आदळआपट करण्याआधी आपल्या मुख्य प्रवक्त्यांचा वाचाळपणाही पाहावा. ‘डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते,’ जागतिक आरोग्य संघटनेला उद्धव ठाकरे सल्ला देतात,’ ‘कंगना राणावत हरामखोर मुलगी आणि हरामखोर म्हणजे नॉटी,’ यासारखी कितीतरी बडबड संजय राऊत यांनी गेल्या काही महिन्यांत केली. तसेच ‘सामना’तून तर मागील पाच वर्षांत व आताही बेलगाम व बेछुट भाषाच वापरली जाते. तेव्हा शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्याला किंवा ‘सामना’च्या भाषेला कोण वेसण घालणार, कोण लगाम लावणार? की आपण काहीही बरळावे, काहीही मुक्ताफळे उधळावीत आणि जनतेने, विरोधी पक्षांनी त्याचे कौतुक करावे, असे शिवसेनेला वाटते?
 
 
तसे वाटतही असेल, म्हणून शिवसेनेच्या बेछुटपणाविरोधात प्रतिक्रिया आली की, कागदी वाघाला मुंबई-महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणूस वगैरे मुद्दे आठवतात. विरोधी प्रतिक्रियांना थेट भिडण्याची हिंमत नसल्याने शिवसेनेला भावनिक मुद्द्यांच्या आश्रयाला जावे लागते. ते करूनही भागले नाही तर शिवसैनिक हाती वस्तरा घेऊन संबंधितांचा हिरामणी तिवारी करतात किंवा नौदल अधिकारी मदन शर्मांना केलेल्या मारहाणीप्रमाणे भ्याड हल्ला करतात. त्यातून मुंबई महाराष्ट्राचा सन्मान वाढतो की मान?
 
 
उलट सोशल मीडियातून सरकारच्या कारभारावर टीका करण्यातून जितकी होत नाही, तितकी बदनामी शिवसेना व शिवसैनिकांच्या अशा राड्यातून होत असते. त्यामुळे शिवसेनेने किंवा ‘सामना’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई, महाराष्ट्राचा अपमान केला जात असल्याचा आरोप करण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्यांचा धुमाकूळ रोखावा, त्याला निर्बंध घालावा; अन्यथा देशभरातील मुंबई-महाराष्ट्राच्या अपमानाला, बदनामीला, नाचक्कीला शिवसेनेइतके जबाबदार अन्य कोणीही नसेल.

@@AUTHORINFO_V1@@