एकसंघ समाजासाठी काम करताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020   
Total Views |
Ravindra Patil _1 &n



ध्येयपथावरून विचलित करणार्‍या घटनांमुळे आपले ध्येय सोडून देणार्‍यांपैकी रवींद्र पाटील नाहीत. त्यांनी आयुष्यात कितीही वादळं आली तरी एकसंघ समाजासाठी कार्य करणे सोडले नाही. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
 
रा. स्व. संघातर्फे जळगाव येथील भडगावमध्ये ‘अखंड भारत आणि काश्मीर’ विषयावर व्याख्यान होते. गावातले अभाविप कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक रवींद्र पाटील भाषण करत होते-
 
 
‘जब भी तीर कमानोवाले तीर हमारा खिचेंगे
जैसे ढाका तोड दिया, लाहोर कराची तोड देंगे’
 
असे त्यांनी म्हणताच नजीकच्या मुस्लीम वस्तीतील काही समाजकंटकांनी दंगल करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभेच्या बंदोबस्ताला असलेले पोलीस रवींद्रजवळ येऊन म्हणाले, “चांगल्या घरचा दिसतोस, इथे थांबलास तर तुला धोका आहे आणि दंगल अजून चिघळेल. तू माझ्या गाडीत बस आणि घरी जा.” रवींद्र विचार करत होता की, मी असे काय म्हणालो. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे बस..
 
 
त्यात यांना राग येण्यासारखे काय होते? रवींद्र घरी आला, तर घरात आईबाबांनी निक्षून सांगितले, “गावात दंगल झाली, तुला काय गरज होती काश्मीरबद्दल, अखंड भारताबद्दल बोलायची, तू तुझं बघ.” घरचा दरवाजा बंद झाला. रवींद्रचे नुकतेच लग्न झाले होते. नवविवाहित पत्नीचेही म्हणणे, “तुम्ही हे सगळे समाजकार्य वगैरे सोडा, आपला संसार सुरळीत चालेल इतक कमवा, मगच मी सोबत येईन.” रवींद्र यांनी पत्नीला तिच्या मर्जीने माहेरी सोडले. आपण नक्कीच संसाराला आवश्यक असे अर्थार्जन करू तेव्हा पत्नीला आपल्या सोबत नेऊ, असे त्याने मनाशी ठरवले, ते साल होते १९९९.
 
गाव सोडल्यानंतर ते जळगावला आपल्या दुसर्‍या घरी पाचोरा इथे एकटे राहू लागले. सुरुवातीला सेल्समनची नोकरी केली. एकटेपणाच्या काळात रवींद्र यांना वाटे की, ध्येयपथावर चालण्यासाठी इतका एकटेपणा यावा? त्यापेक्षा मरून जावे. पण, या काळात अभाविपचे दिलीप पाटील यांनी खूप धीर दिला. दिलीप पाटील हे रवींद्र यांचे अभाविपमधले आदर्शस्थान. दिलीप पाटील, धनंजय चंदात्रे यांच्यामुळेच तर रवींद्र अभाविपमध्ये सामील झाले होते, तर पुढे रवींद्र निष्ठापूर्वक कष्टाने काम करत करत ते एका मोठ्या कंपनीत मॅनेजर झाले. दोन वर्षांत पत्नी परत आली आणि आईबाबांनीही परत घराची दारे उघडली.
 
 
अर्थात कुणाला वाटेल की, ही काय घर घर की कहाणी आहे. पण, या कहाणीला वेगळे आयाम आहेत. मूळचे चाळीसगावचे पाटील कुटुंब. मराठा समाजाचे तुकाराम आणि लता पाटील हे पती-पत्नी दोघेही शासकीय सेवेत. सामाजिक आर्थिक संपन्नता. त्यांचा एकुलता एक मुलगा रवींद्र. वयाच्या चौथ्या वर्षापासून रवींद्र रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. तिथे राष्ट्रनिष्ठा आणि समाजशीलतेचे बाळकडू त्यांना मिळाले. या सर्व काळात आईबाबांचेही त्यांच्यावर कळत-नकळत संस्कार होत होते. याच काळात रा. स्व. संघाच्या शाखेत बाळासाहेब कुलकर्णी शिक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला त्यांनी एक उपक्रम राबवला. ‘छत्रपतींचे जीवनचरित्र’ लिहिलेले साहित्य गावात घरोघरी द्यायचे. ही जबाबदारी रवींद्र यांनी घेतली.
 
 
छत्रपतींचे जीवनचरित्र वाचून, त्याबद्दल चर्चा करून रवींद्र यांचे जीवनच बदलले. अशा वातावरणात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. एका मोठ्या महाविद्यालयात त्यांना प्राध्यापकाची नोकरीही मिळणार होती. मात्र, तिथे तीन लाख भरा मग नक्की नोकरी देऊ, अशी आडून आडून अट होती. तुकाराम यांचे म्हणणे, ‘बचत केलेले पैसे आहेत, शेती विकू, त्यातून पैसे उभे करू.’ पण, रवींद्र यांनी नकार दिला. त्यांचे म्हणणे, ‘शेती विकून नोकरी विकत घ्यायची? हाही एक भ्रष्टाचार. शिल्लक पैशांची नोकरी विकत घेण्यापेक्षा चाळीसगाव आणि जळगावला असलेली घरे आणखी चांगली बांधू.’ याच काळात अभाविपचे प्रचारक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली.
 
 
घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. मात्र, रवींद्र हे आईवडिलांच्या पैशावर जगावे या मताविरुद्ध होते. या काळात त्यांनी सायकलवर अगरबत्ती विकण्याचाही व्यवसाय केला. पुढे भडगावच्या दंगलीमुळे घर सोडावे लागले आणि संघर्ष करून ते मॅनेजर झाले. आज उत्तर महाराष्ट्रात प्रमुख वक्ता, विचारवंत, अभ्यासक म्हणून रवींद्र पाटील यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. ‘इतिहास प्रबोधन’ संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ‘किल्ले रायगड एक ऐतिहासिक मीमांसा’, ‘राजा माझा सांगून गेला’, ‘शंभू हत्या, शोध, तथ्य आणि मिथ्य,’ ही त्यांची तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. इतिहासाचा मागोवा घेताना त्यांनी २६० किल्ल्यांचे भ्रमण आणि ऐतिहासिक अभ्यास केला आहे. २००५ सालचा त्यांना राज्य सरकारचा ‘कविभूषण’ पुरस्कारही मिळाला आहे. समाजविघातक शक्तींशी वैचारिक लढा देण्यासाठी नवीन पिढी तयारी करावी, यासाठी ते प्रयत्न करतात. देशभक्ती आणि समाजनिष्ठा युवकांमध्ये रुजावी यासाठी ते उपक्रम राबवितात. थोडक्यात, रवींद्र पाटील आजही समाजासाठीच कार्यरत आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@