आजार दूर ठेवी आहार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |
Healthy diet_1  




नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक आहार हा आपल्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी शरीरस्वास्थ्य उत्तम राहाण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे. आपले स्वस्थ जगणे हे आपल्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे. जर आहार उत्तम असेल, तर कोणताही रोग होण्याची शक्यता नसते. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या आहारात वेगवेगळी पोषक तत्त्वे असतात आणि त्यांचे शरीरातील कार्यही वेगवेगळ्या प्रकारचे असते. आपल्या शरीराची गरज ओळखून आपण ते ग्रहण केले पाहिजे, अन्यथा त्याचाही विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते. म्हणून आहार घेतानाही योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात घ्यावा. जसं जेवणात तोंडी लावणे म्हणून डाव्या बाजूला चटणी-कोशिंबीर-लोणचे असते. परंतु, ते पदार्थ भाजीप्रमाणे खाल्ल्यास शरीरावर विपरीत परिणाम करतात. भाज्या या आपल्या शरीरावर औषध म्हणून काम करतात. त्यांच्यात रक्त शुद्ध करणे, दोष दूर करणे, ‘व्हिटॅमिन इ’ आदी अधिक प्रमाणात दिसून येते. आवळा, लिंबू, नारळ पाणी, भाज्यांचे-फळांचे रस, ताक इ. पदार्थ शरीर शुद्धीकरण करतात. म्हणून आजारी व्यक्तीला रसाहार सहज पचणारा आणि शरीराची शुद्धी व्हावी म्हणून दिला जातो. पचनातील बिघाड दूर होण्यास मदत होते आणि शक्ती, ताकदही मिळते.


आज आजारी व्यक्तीला रसाहार दिला जातो, पण तो फ्रोझन किंवा बाहेरून मिळणारा. त्याऐवजी घरात करून ताजा दिला तर उत्तम परिणाम दिसून येतील. कारण, त्यामागे आपल्या शुद्ध भावना असतात आणि त्या बरे वाटण्यासाठी उत्तम काम करतात. पूर्वी आजारी व्यक्तीला मोरावळा दिला जायचा. मोरावळा पित्त कमी करायला, तसेच ताकद वाढवायला, मन शांत ठेवायला, ऊर्जा निर्माण करायला मदत करतो. एक सांगावसे वाटते की, आवळा हा कोणत्याही स्वरुपात खाल्ला तरी तो अमृतासमान परिणाम करतो. पोट शांत तर सगळे शांत. त्यात थोडे आले घातल्यास (गरजेनुसार) अधिक उत्तम. जिरेही शरीरातील पित्त, उष्णता, गॅस कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. धने-गूळ कफासाठी छान काम करतात.


आजची परिस्थिती पाहिली तर सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कुटुंबात कोणाला काही प्रादुर्भाव होऊ नये या भीतीपोटी जो जे सांगेल ते सर्व उपचार विचार न करता केले जात आहेत. त्याचे दुष्परिणाम म्हणजे आज बहुतांश लोक मूळव्याध, अंगावर पुरळ येणे वगैरे दिसून येत आहेत. भीतीने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि अपुरी माहिती, तुटपुंजे ज्ञान याला कारणीभूत आहे. म्हणून विचार करुनच कोणतीही गोष्ट करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास ढळू देऊ नये.


आपल्या रोजच्या आहारात थोडे बदल करून आपल्याला होणार्‍या त्रासांना आपण सहज दूर करु शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर अनेक वेळा आपण ऐकतो ‘आमचा आजार हा आनुवांशिक आहे.’ ऐकतो ना? पण, आपण आपल्या आनुवंशिक आहारात बदल करतो का? किंवा तसा विचार तरी करतो का? पटतंय का? थोडा बदल करून बघायला काय हरकत आहे? आपणच वडीलधार्‍यांना म्हणतो ना अमुक अमुक गोष्टींनी त्रास होतो तर ती खाऊ नका, पण आपल्या बाबतीत ते अंमलात आणतो का? विचार करा! दुसरी गोष्ट म्हणजे आपल मन. आपल्याला सतत हेच बिंबवलं जातं ‘त्यांना आहे म्हणजे तुम्हाला होणारच.’ खरे आहे ना? आणि आपणही असेच मानतो. पटतंय का हे?

आपण आपल्या मनावर स्वयंसूचनेने संस्कार करु शकतो. कारण, सूक्ष्म मनाला तुम्ही जे जे सांगाल ते ते तसंच अंमलात येतं. विश्वास नसेल तर प्रयोग करून पाहा आणि सांगा. आपण सतत जे जे विचार करु ते घडतं.


निरोगी जीवन जगण्यासाठी आहार, विश्वास आणि संयम ही त्रिसूत्री आवश्यक आहे. कोणताही असाध्य आजार हा आहार आणि सकारात्मक विचार यांनी बरा करु शकतो. म्हणून जेवताना शांत मनाने जेवावे म्हणजे शरीरावर विपरीत परिणाम होत नाहीत. संतुलित, पोषक आहार हा निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. पारंपरिक पद्धतीने संतुलित आणि पचनास सुलभ असा आहार घ्यावा. आपण ज्या प्रदेशात राहतो त्याला अनुसरून असा असावा. आपण जे काम करतो त्याला अनुसरून असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, शरीराची गरज ओळखून असावा कसा. ते पुढील लेखात पाहू.



- सीता भिडे



@@AUTHORINFO_V1@@