बॉलीवूडचा ‘बाबूराव’ ते एनएसडीचा संचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

paresh rawal _1 &nbs


अभिनेता ते नेता, असा यशस्वी प्रवास करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे परेश रावल यांची ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...



'हेरा फेरी’मधले बाबूराव आपटे असो, ‘ओ माय गॉड’मधले कानजीभाई असो किंवा ‘उरी’मधले गोविंद भारद्वाज असो; अभिनेते परेश रावल यांनी प्रत्येक भूमिका ताकदीने सादर केली. अशा चतुरस्र अभिनेत्याची ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या (एनएसडी) संचालकपदी निवड होणे हे त्या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या पुढच्या पिढीसाठी आनंदाचाच क्षण आहे. ३० मे, १९५०रोजी परेश रावल यांचा मुंबईत जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘लायन्स जुहू महाविद्यालया’त झाले. वयाच्या ११ -१२व्या वर्षीच त्यांनी अभिनय करण्याचा निर्धार केला होता. शाळेत शिकत असताना त्यांची आवड पाहून शाळेचे मुख्याध्यापक इंदूबेन पटेल यांनी त्यांना प्रोत्साहन दिले व त्यासाठी ते त्यांचे नेहमी आभार मानतात. असेच प्रोत्साहन त्यांना ‘एन. एम. कॉलेज,’ मुंबईतदेखील मिळाले. आपल्या महाविद्यालयीन जीवनात परेश रावल यांनी अनेक नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला व विजय मिळविला. कालांतराने ते ‘इंडियन नॅशनल थिएटर’मध्ये रुजू झाले. त्यावेळी रावल यांनी भूमिका साकारलेले गुजराती नाटक हिट ठरले. ‘मांझी : द माउंटन मेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता हे परेश रावल यांच्या अभिनयाने प्रभावित झाले. त्यावेळी ते आमिर खान, ओम पुरी आणि नसीरुद्दिन शहा यांच्यासोबत ‘होली’चे चित्रीकरण करत होते. तेव्हा साहाय्यक अभिनेत्याच्या शोधात असणार्‍या मेहता यांनी वेळ न घालवता परेश यांची निवड केली व परेश यांची चित्रपट क्षेत्रातील मुहूर्तमेढ रोवली गेली.




१९८४साली आलेला ‘होली’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर १९८६साली राजेंद्र कुमार निर्मित ‘नाम’ चित्रपटातील भूमिकेमुळे रावल यांना चित्रपट जगतात एक नवी ओळख मिळाली. तेव्हापासून आजतागायत त्यांची अभिनय क्षेत्रातील यशस्वी घोडदौड सुरूच आहे. १९९४साली प्रदर्शित झालेला ‘सरदार’ हा चित्रपट परेश रावल यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे. केतन मेहता निर्मित या चित्रपटात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक वल्लभभाई पटेल यांची भूमिका पडद्यावर आणली. या चित्रपटात आपल्या दमदार अभिनय कौशल्याने केवळ राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. २०००साली प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ चित्रपटातील त्यांची ‘बाबूराव’ या पात्राची भूमिका इतकी गाजली की त्यानंतर कित्येक वर्षे प्रेक्षक त्यांना ‘बाबूराव’ याच नावाने ओळखत. यानंतर त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारण्यास सुरुवात केली. या चित्रपटांमध्ये ‘आवारा पागल दिवाना’, ‘हंगामा’, ‘फंटूश’, ‘गरम मसाला’, ‘दिवाने हुये पागल’, ‘मालामाल वीकली’, ‘भागमभाग’, ‘वेलकम’ आणि ‘अतिथि तुम कब जाओगे’ या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, परेश रावल यांनी ‘मिस इंडिया’ स्वरूप संपतशी लग्न केले. स्वरूप यांनी १९७९मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला आहे. त्यानंतर त्यांची अभिनय कारकीर्द सुरू झाली. परेश यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या लग्नाशी संबंधित एक घटना शेअर केली. जी खूप मनोरंजक आहे. स्वरूपचे वडील ’इंडियन नॅशनल थिएटर’मध्ये निर्माते होते. मी माझ्या मित्रांसह एक बंगाली नाटक पाहायला गेलो होतो. तिथे मी स्वरूपला पाहिले. मी माझ्या मित्राला सांगितले की, ही मुलगी माझी बायको होणार. तेव्हा त्यांनी विचारले, ती कोणाची मुलगी आहे हे तुला ठाऊक आहे काय? मी म्हणालो की, हीच माझी पत्नी होणार. आज स्वरूप आणि परेश या दाम्पत्यांना आदित्य रावल आणि अनिरुद्ध रावल अशी दोन मुले आहेत.



परेश रावल यांनी अभिनयाबरोबरच राजकारणातही आपला ठसा उमटविला. २०१४मध्ये त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथून भारतीय जनता पक्षातर्फे १६व्या लोकसभेची निवडणूक लढविली आणि विक्रमी मतांनी जिंकली. परेश रावल हे भारतीय जनता पक्षातील नामांकित राजकारणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. परेश रावल यांना आतापर्यंत तीन वेळा ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९९३मध्ये त्यांना ‘सर’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट खलनायकाचा’ पुरस्कार मिळाला. २००० साली त्यांना ‘हेरा फेरी’ या चित्रपटासाठी आणि २००२मध्ये ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटासाठी ‘सर्वश्रेष्ठ हास्यकलाकार’ म्हणून गौरविण्यात आले होते. परेश रावल यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. खर्‍या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या अभिनेते परेश रावल यांची ‘एनएसडी’च्या संचालकपदी निवड झाली. इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असूनसुद्धा त्यांच्याकडे ही जबाबदारी उशिरा देण्यात आली अशी खंत अनेकांना होती. पण रावल यांना स्वत:ला मात्र तसं वाटत नाही. ’लवकर, उशीर असं काही नसतं. योग्य वेळी योग्य ते होतंच यावर माझा विश्वास आहे. ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे,’ असे ते म्हणतात. अभिनयाचा दांडगा अनुभव, शिकण्याची आणि शिकवण्याची वृत्ती, नव्या पिढीसाठी काहीतरी करून दाखवायची तयारी या सगळ्यामुळे परेश रावल यांच्याकडे ‘एनएसडी’चे संचालक म्हणून फार अपेक्षेने बघितले जात आहे यात शंका नाही.
@@AUTHORINFO_V1@@